जिल्हा परिषदेतर्फे साडेतीन लाख वृक्षलागवड
By admin | Published: July 2, 2016 01:53 AM2016-07-02T01:53:06+5:302016-07-02T01:53:06+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती यंत्रणेमार्फत सायंकाळी ४ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार ३ लाख २७ हजार ५५३ वृक्षलागवड करण्यात आली होती.
पुणे : जिल्ह्यात शुक्रवारी सर्वत्र वृक्षलागवड करण्यात आली असून जिल्हा परिषद व पंचायत समिती यंत्रणेमार्फत सायंकाळी ४ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार ३ लाख २७ हजार ५५३ वृक्षलागवड करण्यात आली होती.
वनआच्छादन ३३ टक्के असणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी वन कमी आहेत तेथे पर्यावरणाचा समतोल ढासळतो व पाऊस कमी पडतो आणि पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यामुळे शासनाने शासनाने ३१ मार्च २०१६ रोजी आदेश काढून १ ते ७ जुलैदरम्यान वनमहोत्सव आयोजिण्यात येणार असून त्याअंतर्गत १ जुलै रोजी २ कोटी वृक्षलागवड करण्याचे ठरविले असल्याचे कळविले होते. जिल्हा परिषदेला शासनाने २ लाख ३८ हजार ७६९ इतक्या वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व कृषी अधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना सूचना देऊन वृक्षलागवडीचे आवाहन केले होते. त्यानुसार एकही शासकीय जागा वृक्षलागवडीतून शिल्लक राहू नये, अशा सूचना दिल्या होत्या. त्या जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, पशुसंवर्धन दवाखाने, लघुपाटबंधारे विभागाच्या सर्व जागांवर वृक्षलागवड करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी खरिपाच्या घेतलेल्या तालुकानुसार बैैठकांमध्ये वृक्षलागवडीसाठी आवाहन केले होते. (प्रतिनिधी)
।आज जिल्ह्यात शासकीय जागांवर सर्व ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली असून, ३ लाख २७ हजार ५३३ इतकी वृक्षलागवड केल्याचे जिल्हा परिषद कृषी अधिकारी सुनील खैरनार यांनी सांगितले. सायंकाळी ४ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार मावळ तालुक्यात सर्वाधिक ५९ हजार व सर्वांत कमी पुरंदर तालुक्यात १२ हजार वृक्षलागवड करण्यात आली होती.