जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शिष्टाईने मिटला रस्त्याचा वाद!
By Admin | Published: January 7, 2017 01:17 AM2017-01-07T01:17:11+5:302017-01-07T01:17:11+5:30
रस्ता अडवणुकीसाठी दोघा उपोषणकर्त्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी सामंजस्याने मिटविण्यात यश मिळविले आहे.
उरुळी कांचन : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी यशस्वी शिष्टाई करीत उरुळी कांचन येथील तांबेवस्ती रस्त्याचा १३ वर्षांपासूनचा वाद मिटवित रस्ता अडवणुकीसाठी दोघा उपोषणकर्त्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी सामंजस्याने मिटविण्यात यश मिळविले आहे. कंद यांनी तांबेवस्तीचा उच्च न्यायालयापर्यंत न्यायप्रविष्ट रस्त्याचा प्रश्न तब्बल पाच तासांची चर्चा करून उरुळीत ग्रामस्थांपुढे मिटवून कायदेशीर बाबी पूर्ण करण्याची खात्री करून सामंजस्याने मिटविला आहे.
उरुळी कांचन येथील तांबेवस्ती व साळुंखेवस्तीवरील जिल्हा परिषदेचा रस्ता संरक्षण भिंत उभारून रस्ता अडवणूक केल्याप्रकरणी तांबेवस्तीवरील गणेश तांबे व नितीन साळुंखे या दोघा रहिवाशांनी बुधवार (दि.४) पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. जिल्हा परिषदेच्या २००२-०३मध्ये अकराव्या वित्त आयोगातून तांबेवस्तीकडे जाणारे तीन रस्ते जिल्हा परिषदेने निधी देऊन तयार केले होते. त्यानंतर रस्त्यालगत माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन यांनी त्यांच्या स्थावर मालमत्तेलगत भिंत उभारल्याने रस्ता अडवणुकीचा वाद महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच न्यायालयात तेरा वर्षांपासून सुरू आहे. जिल्हा परिषदेने रस्ते तयार करूनही ग्रामपंचायत दफ्तरी नोंद नसल्याने ती नोंद करून संरक्षण भिंत हटवून रस्ता वापरासाठी उपलब्ध व्हावा म्हणून आमरण उपोषण सुरू केले होते.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, गटविकास अधिकारी संदीप कोईनकर यांनी उपोषणकर्त्यांना आंदोलनापासून परावृत्त करताना वादग्रस्त स्थळी भेट देऊन स्थानिक रहिवासी व माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, युवा नेते अजिंक्य कांचन यांच्याशी चर्चा करीत खासगी मालमत्तेतून हद्द रस्त्यासाठी सोडून या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु उपोषणकर्त्यांनी उपोषणस्थळी प्रदीप कंद यांच्या तोडग्यावर अशा प्रकारचा मार्ग काढण्यासाठी असमर्थता दर्शविल्याने या प्रश्नावर तोडगा न निघताच प्रदीप कंद, यशवंत शितोळे व संदीप कोईनकर यांना परतावे लागले.
दरम्यान आंदोलनात माजी आमदार अशोक पवार, प्रा.के.डी. कांचन, देविदास भन्साळी, राजाराम कांचन यांनी उपोषणकर्त्यांना पाठिंबा देऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. शेवटी सरपंच अश्विनी कांचन, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र बडेकर, सुनील कांचन, सागर कांचन, भाऊसाहेब कांचन, माजी सदस्य राजेंद्र कांचन, तंटामुक्ती समिती अध्यक्ष
बाबा कांचन, देविदासनाना कांचन, युवा नेते सुभाष बगाडे, सागर पोपट कांचन यांनी उपोषण मागे घेण्यासाठी प्रयत्न केले.(वार्ताहर)
>रस्ता होणार सार्वजनिक वहिवाटीस खुला
एवढ्यावरच हार न मानता प्रदीप कंद यांनी अर्ध्या तासात पुन्हा उपोषणस्थळ गाठून युवा नेते अजिंक्य कांचन व उपोषणकर्ते गणेश तांबे व नितीन साळुंखे यांच्याशी आमनेसामने मध्यस्थी करीत खासगी मालमत्तेची भिंत पाडून कांचन यांच्या मिळकतीतून पंधरा फूट तर तांबे यांच्या मिळकतीतून पाच फूट रस्ता सार्वजनिक वहिवाटीस ठेवून या वादातून तोडगा काढला.कायदेशीर बाबी पूर्ण करून जिल्हा परिषदेच्या प्रोसिडिंगमध्ये विषय घेऊन या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यात आला. प्रदीप कंद यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत देऊन उपोषण मागे घेत असल्याचे उपोषणकर्त्यांनी जाहीर केले.