दुष्काळग्रस्त गावावर झिंटाची ‘प्रीती’

By admin | Published: April 7, 2017 12:56 PM2017-04-07T12:56:21+5:302017-04-07T13:01:04+5:30

सलमान खान, नाना पाटेकर.. यांच्यासारख्या कलावंतांनी आपलं सामाजिक भान कायम राखलं आहे. अर्थात आणखीही असे अनेक कलावंत आहेत,

Zinta's 'love' on drought-hit villages | दुष्काळग्रस्त गावावर झिंटाची ‘प्रीती’

दुष्काळग्रस्त गावावर झिंटाची ‘प्रीती’

Next

- लाखो रुपयांच्या मदतीमुळे गावकऱ्यांची भागली तहान

बॉलीवूडची चमकधमक आपल्याला नेहमीच आकर्षित करते. बॉलीवूडचे सितारे अनेकांच्या हृदयावर राज्य करतात आणि त्यांच्यासाठी काहीही करण्याची त्यांच्या चाहत्यांची तयारी असते. त्यांना नुसतं पाहण्यासाठीही लोक तोबा गर्दी करतात आणि आपल्याला प्राणांनाही गमावतात. शाहरुखला पाहण्यासाठी अशाच गर्दीत नुकताच एकाला प्राण गमवावा लागला होता. दक्षिणेकडच्या राज्यातील चाहत्यांची तर त्यांच्या आवडत्या चित्रपट तारे-तारकांसाठी तर काहीही, अगदी काहीही करण्याची तयारी असते. त्यासाठी मग ते त्यांचे पुतळे काय उभारतील, मंदिरं काय तयार करतील, त्यांचे मोठमोठे कटआऊट्स काय उभारतील.. अगदी त्यांच्यासाठी आपले प्राण देण्याचीही त्यांची खुशीनं तयारी असते. माजी चित्रपट तारका आणि तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर तर अनेक चाहत्यांना धक्का बसून त्यांनीही आपली इहलोकीची यात्रा संपवली. चाहत्यांचे असे अनेक प्रकार. आपल्या आवडत्या तारे-तारकांवर त्यांचं आपल्या जीवापेक्षाही जास्त प्रेम असतं. पण चित्रपटातील हे सितारे आपल्या चाहत्यांना चित्रपटांतून आणि क्वचित लांबूनच प्रत्यक्ष दर्शन देण्याव्यतिरिक्त आणखी काय करतात? समाजासाठी त्यांचं काय योगदान असतं? अपवाद नक्कीच आहेत. सलमान खान, नाना पाटेकर.. यांच्यासारख्या कलावंतांनी आपलं सामाजिक भान कायम राखलं आहे. अर्थात आणखीही असे अनेक कलावंत आहेत, ज्यांचं समाजासाठीचं योगदान खूप मोठं आहे, पण त्यांनी त्याचा कधीच गाजावाजा केला नाही. अनेकांची नावं तर आजपर्यंत कधीच समाजासमोर आलीही नाहीत.. पण असे अनेक कलावंत आहेत.. त्यातलं एक नाव आहे सिनेतारका प्रीटी झिंटा. आता नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या निऱ्हाळे या छोट्याशा दुष्काळग्रस्त खेडेगावाशी तिचा काय संबंध? तरीही गेल्या तीन वर्षांपासून ती निऱ्हाळेकरांना मदत करते आहे. गेल्यावर्षी प्रीटीनं त्यांना तब्बल सात लाख रुपयांची मदत केली. त्यातून तिथे विहीर खोदण्यात आली. या विहिरीतून गावासाठी पाणीयोजना राबविण्यासाठी तिनं पुन्हा ५० हजार रुपये निऱ्हाळेकरांना दिले. त्यामुळे गावकऱ्यांना या विहिरीचे पाणी मिळू लागले आहे. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात निऱ्हाळेकरांना टंचाईची झळ बसली नाही.

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निऱ्हाळे-फत्तेपूर हे गाव अवर्षणग्रस्त म्हणून ओळखले जाते. पाणीटंचाई आणि निऱ्हाळे अशी गेल्या अनेक वर्षांपासून ओळख आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून निऱ्हाळेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. निऱ्हाळे येथील भूमिपुत्र व मुंबई येथे नोकरीनिमित्त स्थायिक असलेले संतोष दराडे यांनी अभिनेत्री प्रीटी झिंटा यांना त्यांच्या गावाबद्दल माहिती दिली होती. तेव्हापासून झिंटा यांनी निऱ्हाळेकरांना विविध माध्यमातून मदत देणे सुरू केले. गेल्या दोन वर्षांपूर्वी प्रीटीच्या मदतीतून गावासाठी तीन महिने टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. शासनाच्या टॅँकरच्या फेऱ्या कमी पडत असल्याने तिने स्वखर्चाने निऱ्हाळेकरांना पाणी दिले होते. त्यानंतर गेल्या वर्षी टॅँकरवर पैसे खर्च करण्यापेक्षा प्रीटीनं सात लाख रुपयांचा निधी विहीर खोदण्यासाठी दिला होता. गेल्यावर्षी जाम नदीच्या कडेला अन्सार शेख यांच्या शेतात या मदतीतून विहीर खोदण्यात आली होती. या विहिरीचं पाणी आता साऱ्या गावकऱ्यांची तहान भागवतं आहे. झिंटाची निऱ्हाळेकरांवर ‘प्रीती’ ४अभिनेत्री प्रीटी झिंटानं निऱ्हाळेकरांना आत्तापर्यंत वेळावेळी मदत केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना गायी दिल्या आहेत. निराधारांना दरमहा एक हजार रुपये मानधन, आदिवासी वस्तीवर सौरदीप, अपंगांना तीन चाकी सायकलचे वाटप, स्वखर्चाने टॅँकरने पाणीपुरवठा केला आहे.

Web Title: Zinta's 'love' on drought-hit villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.