कुपोषणावर जि.प.चा डोहाळे जेवणाचा उतारा
By admin | Published: March 3, 2017 04:09 AM2017-03-03T04:09:06+5:302017-03-03T04:09:06+5:30
गावपाड्यांतील गरोदर मातांना एकत्र आणून त्यांची खणानारळाने ओटी भरण्यासह डोहाळे जेवणही त्यांना समारंभपूर्वक दिले जात आहे.
सुरेश लोखंडे,
ठाणे- गावपाड्यांतील गरोदर मातांना एकत्र आणून त्यांची खणानारळाने ओटी भरण्यासह डोहाळे जेवणही त्यांना समारंभपूर्वक दिले जात आहे. याशिवाय, वीटभट्टीवरील माताबालकांसाठी आरोग्यजत्रा आदी उपक्रमांचा प्रारंभ शहापूर तालुक्यातील अनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डोहाळे जेवणापासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याने केला आहे.
आदिवासी, ग्रामीण भागांतील माताबालकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासह जन्माला येणारे बाळ सशक्त व गोंडस असावे, यासाठी आरोग्य विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहे. या उपक्रमांना सामाजिक एकोपा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि संस्कृती जतन आदींची जोड देऊन सातव्या महिन्यातील डोहाळे जेवणाचा उपक्रम आरोग्य केंद्रांमध्ये राबवत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. सोनावणे यांनी लोकमतला सांगितले.
ऐकिवात असलेल्या गोड व डोहाळे जेवणाचा सुखद अनुभव, डॉक्टरांकडील औषधोपचार सुखी व आनंदी जीवनासाठी महत्त्वाचे असल्याची जाणीव या मातांना होत आहे. यातून कुपोषित नसलेले गुटगुटीत व सशक्त बालक जन्माला आणणे शक्य होत आहे. तर, आजारपणात भगत, बुवाबाजी, धागेदोरे, जडीबुटी आदी अंधश्रद्धेच्या उपायांपासून आदिवासी कुटुंबं दूर जात आहेत. डॉक्टर, परिचारिका, कम्पाउंडर आदींकडून मिळत असलेल्या आपलेपणाची व जिव्हाळ्याच्या वागणुकीमुळे आदिवासी, ग्रामीण माता, बालक रुग्णालयांकडे वळले आहे. यामुळे बालविवाह प्रतिबंध, अल्पवयीन मातेच्या गरोदरपणाला रोख लागून अंधश्रद्धेवर मात केली जात असल्याचा दावा डॉ. सोनावणे करीत आहे. नाचणीची भाकरी, चटणी, वांगी, खजूर, डांगराची पुरी, अंडी या पदार्थांसह आरोग्य विभागाचे चौरस जेवण, या डोहाळे जेवणानंतर या आदिवासी मातांची खणानारळाने ओटी, हळदकुंकू आणि पौष्टिक औषधी व गोळ्या या गर्भवतींना डोहाळे जेवणात मिळत आहेत. याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते.