प्राणिसंग्रहालयात मानधनावर सहा पदे
By admin | Published: June 5, 2017 12:41 AM2017-06-05T00:41:08+5:302017-06-05T00:41:08+5:30
बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयामध्ये पूर्णवेळ अॅनिमल कीपर नियुक्त करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे घेण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : गेल्या वर्षभरात घडलेल्या अनेक घडामोडी, मृत झालेले साप, पक्ष्यांची झालेली हेळसांड त्यातूनच झालेली सर्पोद्यानाची बदनामी हे पाहता बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयामध्ये पूर्णवेळ अॅनिमल कीपर नियुक्त करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे. मुलाखत पद्धतीने एकूण सहा पदे भरण्यात येणार असून, त्यांना एकत्रित मानधन देण्यात येणार आहे.
संभाजीनगर, चिंचवड येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय आहे. वर्षभरापासून या प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यानच्या काळात अनेक घडामोडी या प्राणिसंग्रहालयामध्ये घडल्या आहेत. सर्पमित्रांना मानववस्तीत सापडलेले आणि प्राणिसंग्रहालयात आणून देण्यात आलेले अनेक सर्प एका पोत्यामध्ये मृतावस्थेत सापडले. कित्येक पक्ष्यांची अन्न-पाण्याविना दुरवस्था झाल्याचे निर्दशनास आले. त्यावर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढून हे प्राणिसंग्रहालय बंद का करू नये, अशी नोटीस बजावली. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाने सीझेडएच्या नियमावलीचे पालन करण्याचे ठरविले आहे. या प्राणिसंग्रहालयामध्ये अॅनिमल कीपर हे पद पूर्णवेळ नियुक्त असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश सीझेडएने दिले आहेत. त्याचप्रमाणे सीझेडएने नोंदविलेल्या काही आक्षेपार्ह गोष्टींची पूर्तता करणेही गरजेचे आहे. त्यानंतरच या प्राणिसंग्रहालयाला २०१८पर्यंत सीझेडएची मान्यता मिळणार आहे.
प्राणिसंग्रहालय सुरू ठेवणे किंवा चालविणे यासाठी सीझेडएची मान्यता मिळविणे महापालिकेला बंधनकारक आहे. त्यासाठी सीझेडएने नमूद केलेल्या पदांचा समावेश महापालिकेतर्फे शासनाकडे सादर केलेल्या आकृतिबंधात केला. त्यामध्ये या अॅनिमल कीपर पदाचाही समावेश आहे. मात्र, आकृतिबंधास मान्यता मिळेपर्यंत ही पदे मानधन तत्त्वावर भरण्याचा निर्णय महापालिका पशुवैद्यकीय विभागाने घेतला आहे.
एकूण सहा पदे भरण्यात येणार असून, त्यासाठी दहावी पास ही किमान शैक्षणिक पात्रता असून, बारावी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारांकडे वन्यजीव क्षेत्राची आवड, या विषयीचे सामान्य ज्ञान आणि कौशल्य असायला हवे. प्राणिसंग्रहालयातील कामकाजाचा, वन्यजीव हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदांच्या भरतीसाठी जाहिरात देणार आहे.