ZP Election Results Update: जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची मुसंडी, जिंकल्या भाजपापेक्षा दुप्पट जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 02:50 PM2021-10-06T14:50:25+5:302021-10-06T17:26:45+5:30
ZP Election Results Update: राज्यातील सहा जिल्हा परिषदांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.
मुंबई - राज्यातील सहा जिल्हा परिषदांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. (ZP Election Results Update) जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीपैकी सर्व ८५ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये काँग्रेसने १७, राष्ट्रवादीने १७ आणि शिवसेनेने १२ अशा मिळून महाविकास आघाडीने आतापर्यंत ४६ जागा जिंकल्या. तर भाजपाने २३ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित १६ जागा इतर पक्षांच्या खात्यात गेल्या आहेत. (Big win of Mahavikas Aghadi in Zilla Parishad by-election, won twice as many seats as BJP)
जिल्हावार आकडेवारीनुसार अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ पैकी १४ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपा, शिवसेना आणि काँग्रेसच्या खात्यात प्रत्येकी १ तर राष्ट्रवादीच्या खात्यात दोन जागा गेल्या आहेत. तर ९ जागांवर वंचित आणि इतर पक्षांनी बाजी मारली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील ११ पैकी ११ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपाने ४, शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी ३ तर राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला आहे. धुळे जिल्ह्यातील १५ पैकी १५ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपाने ८, राष्ट्रवादीने ३, काँग्रेसने २ आणि शिवसेनेने दोन जागेवर विजय मिळवला आहे.
नागपूर जिल्ह्यातील १६ पैकी १६ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये ९ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. तर भाजपाने तीन आणि राष्ट्रवादीने दोन जागांवर विजय मिळवला. उर्वरीत २ जागांवर इतरांनी बाजी मारली. वाशिममधील १४ पैका १४ जागांचे निकाल हाती आले असून यामध्ये राष्ट्रवादीने ५, काँग्रेस आणि भाजपाने प्रत्येकी २, शिवसेनेने १ आणि इतरांनी ४ जागांवर कब्जा केला.
तर पालघरमध्ये १५ पैकी १५ जागांचे निकाल हाती आले असून, येथे भाजपा आणि शिवसेनेने प्रत्येकी ५ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या आहेत. तर एक जागा इतरांच्या खात्यात गेली आहे.