जि.प., पंचायत समित्यांची पोटनिवडणूक स्थगित; निवडणूक आयोगाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 09:49 AM2021-07-10T09:49:45+5:302021-07-10T09:50:18+5:30
नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये ही पोटनिवडणूक होणार होती. त्यात जिल्हा परिषदांच्या ७० तर पंचायत समित्यांच्या १३० जागांचा समावेश होता.
मुंबई : राज्याच्या पाच जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांमध्ये १९ जुलै रोजी होणारी पोटनिवडणूक राज्य निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित केली आहे. आहे त्या स्थितीत निवडणुकीला स्थगिती देत कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर निवडणुकीचे उर्वरित टप्पे पार पाडण्यात येतील असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये ही पोटनिवडणूक होणार होती. त्यात जिल्हा परिषदांच्या ७० तर पंचायत समित्यांच्या १३० जागांचा समावेश होता. मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन ती घेऊ नये अशी विनंती राज्य शासनाने आयोगास केली होती. आयोगाने ती अमान्य केल्यानंतर शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आयोगाने राज्य शासनाशी सल्लामसलत करुन योग्य तो निर्णय घ्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै रोजी दिले होते. त्यानुसार गेले तीन दिवस आयोग आणि शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रदीर्घ चर्चा केली व त्यानंतर या पोटनिवडणुकीस स्थगिती देण्याचा निर्णय झाला. ही निवडणूक स्थगित केली जाणार असल्याचे वृत्त लोकमतने ९ जुलैच्या अंकातच दिले होते.
या जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षित जागांवरील निवड सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आल्याने आयोगाने १९ जुलैची पोटनिवडणूक जाहीर केली होती. या जागांवर खुल्या प्रवर्गातून पोटनिवडणूक घेतली जाईल असे स्पष्ट करीत निवडणूक कार्यक्रम घोषित केला होता. तथापि, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटली. ठिकठिकाणी त्या विरोधात आंदोलनही झाले. ओबीसींचे आरक्षण पुन्हा बहाल होत नाही तोवर ही कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक घेऊ नये असा सर्वपक्षीय दबाव होता.
आहे त्या टप्प्यावरून पुढे पोटनिवडणूक घेणार
राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी सांगितले की, भविष्यात कोरोनाची परिस्थिती पाहून पोटनिवडणूक घेतली जाईल. त्यावेळी आतापर्यंत पूर्ण केलेल्या टप्प्यावरून पुढे ही निवडणूक घेतली जाईल. नव्याने उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. कारण ही प्रक्रिया ५ जुलै रोजीच पूर्ण झालेली आहे. उमेदवारी अर्जांची छाननीही झालेली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणे, उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणे, चिन्ह वाटप, प्रचार कालावधी, मतदान आणि मतमोजणी हे उर्वरित टप्पेच तेवढे त्यावेळी पूर्ण केले जातील. या संदर्भातील वृत्त लाेकमतने ९ जुलै राेजी प्रसिद्ध केले हाेते. त्यावर शिक्कामाेर्तब झाले आहे.