झेडपी शिक्षक बनले सात कोटींचे ग्लोबल टीचर; रणजीतसिंह डिसले यांना लंडनचा सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 03:20 AM2020-12-04T03:20:58+5:302020-12-04T03:21:09+5:30
लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची घोषणा केली. असा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.
सोलापूर : युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्याकडून दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार गुरुवारी जाहीर झाला. जगातील १४० देशांतील शिक्षकांतून सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांची निवड करण्यात आली. सात कोटी रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची घोषणा केली. असा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशांतील १२ हजारांहून शिक्षकांच्या नामांकनातून डिसले गुरुजी अंतिम विजेता ठरले.
५०% रक्कम देणार
पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे ९ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडाकरिता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशीलतेला चालना मिळणार आहे.