राज्यातील झेडपीच्या 2 हजार 177 शाळांना पुराचा फटका : आशिष शेलार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 12:27 PM2019-08-12T12:27:43+5:302019-08-12T12:28:38+5:30
अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या २ हजार १७७ शाळा बाधित झाल्या असून त्याचा फटका १ लाख ६३ हजार २७५ विद्यार्थ्यांना बसेल असा अंदाज आहे.
पुणे: राज्यातील २१ जिल्ह्यामधील १५५ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २ हजार १७७ शाळांना अतिवृष्टीचा फटका बसला असून या शाळांच्या वर्ग खोल्यांची नव्याने बांधणी व दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे.त्याचप्रमाणे पुराच्या पाण्यामुळे पोषण आहार, शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाकडून या सर्व बाबींसाठी ५७ कोटींचा निधी खासबाब म्हणून देण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी रविवारी केली.
गेल्या दोन दिवसांपासून शिक्षण विभागाकडून राज्यातील अतिवृष्टीबाधित शाळांचा आढावा घेण्यात आला.त्यानंतर पुर परिस्थिती ओसरल्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी रविवारी सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर वगळून पुर बाधित जिल्ह्यातील संबंधितांची आढावा बैठक पुण्यात घेतली. या बैठकीस शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण विभागाचे संचालक व शिक्षण अधिकारी आदी उपस्थित होते.
शेलार म्हणाले,अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या २ हजार १७७ शाळा बाधित झाल्या असून त्याचा फटका १ लाख ६३ हजार २७५ विद्यार्थ्यांना बसेल असा अंदाज आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या ५३ पुर्ण वर्ग खोल्याचे तातडीने बांधकाम करावे लागणार असून सुमारे २ हजाराहून अधिक शाळांच्या वर्ग खोल्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. तसेच शाळांचे ३६ किचनशेड बाधित झाले असून ४७७ शाळांमधील शालेय पोषण आहाराचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे २६० शाळांमधील २७,९०५ विद्यार्थ्यांची पाठपुस्तके खराब झाली असल्याची माहिती आहे.केवळ शाळाच नाही तर अकरावी बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ेपुस्तके उपलब्ध करून दिली जातील.राज्य मंडळाप्रमाणे सीबीएसई,आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी सुध्दा विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे आहे,
वर्ग खोल्या बांधणीसाठी आवश्यक असलेला निधी थेट शाळेच्या बँक खात्यामधे जमा करण्यात येणार असून स्थानिक पातळीवर वर्ग खोल्यांची दुरुस्ती करण्यात येईल. शिक्षण विभागांतर्गत २८५ अभियंते याबाबतचे काम करणार आहेत. पूरग्रस्त भागातील शाळा पुन्हा सुरू करताना आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण शाळा परिसर निजंर्तुक करण्यात यावा. तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या व वर्गखोल्यांची स्वच्छता याबबात सविस्तर परिपत्रक शिक्षण विभागाने काढावेत,असे निर्देश संबंधित अधिका-यांना देण्यात आले आहेत,असेही शेलार यांनी नमूद केले.
...........
ज्या शाळांमध्ये पुरग्रस्तांसाठी तात्पुरती निवा-याची व्यवस्था करण्यात आली आहे, आशा शाळांतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था नजीकच्या खाजगी शाळांमध्ये करता येईल का? अथवा दोन सत्रात शाळा भरविण्याची व्यवस्था होऊ शकते का ? याबबात स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, अशा सूचना शिक्षण अधिका-यांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याबाबत विचार केला जाणार आहे.
पुर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर कोल्हापूर ,सांगली, सिंधुदुर्ग या जिल्हयांची माहिती गोळाकरून या जिल्ह्यातील शाळांना सुध्दा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल,असेही शेलार यांनी स्पष्ट केले.शाळा बंद होणार नाहीत
कोणतीही शाळा बंद करण्याची शासना भुमिका नाही.कमी पटसंख्या असणा-या शाळा बंद करण्याबाबत परिपत्रक प्रसिध्द करण्यात आले होते.परंतु,त्यापत्राची अंमलबजावणी केली जाऊ नये,असे अधिकांना सांगण्यात आले आहे,असेही शेलार यांनी स्पष्ट केले.