मालेगावात भारनियमनाचा स्थानिकांकडून निषेध; ऊर्जामंत्री बावनकुळेंना दाखविले काळे झेंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 10:34 AM2017-09-14T10:34:50+5:302017-09-14T10:37:01+5:30
शहरात होत असलेल्या भारनियमनाच्या निषेधार्थ बुधवारी रात्री महामार्गावरील 40 गाव चौफुली येथे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.
मालेगाव, दि. 14- शहरात होत असलेल्या भारनियमनाच्या निषेधार्थ बुधवारी रात्री महामार्गावरील 40 गाव चौफुली येथे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे महामार्गाने नाशिकहुन धुळ्याकडे जात होते. शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका पावरलूम संघर्ष समिती, लोक संघर्ष समितीच्यावतीने शहरात सुरू असलेल्या भारनियमनाच्या विरोधात चंद्रशेखर बावनकुळे यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला . या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचे पुत्र हाफिज अब्दुल्ला मुफ्ती मोहंमद इस्माईल, नगरसेवक अतिक अहमद कमाल अहमद, मोहम्मद यूसुफ मोहम्मद इलियास, माजी नगरसेवक मोहम्मद आमिन, मोहम्मद फारुख यांनी केले.
बावनकुळे यांना प्रवासादरम्यान रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येवून अडथळा निर्माण होवु नये म्हणुन तालुका पोलीसांकडून चौफुलीवर लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. चांदवड येथे झालेल्या कार्यक्रमामुळे बावनकुळे यांना जाण्यास उशिर झाला होता. याच दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची पोलीस बंदोबस्त काढून घेत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकर्ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. शेवटी 12 वाजून 44 मिनिटांनी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले