अंतर्गत मतभेदाची भाजपला डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 05:51 AM2019-04-13T05:51:20+5:302019-04-13T05:51:24+5:30
वंचित बहुजन आघाडीही रिंगणात । दोन्ही उमेदवार टाळताहेत वैयक्तिक टीका
लेवा पाटील समाजाचे प्राबल्य असलेल्या एकमेव रावेर लोकसभा मतदार संघात भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या सून व विद्यमान खासदार रक्षा खडसे तसेच माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्यातील लढत लक्षवेधी ठरत असताना वंचित बहुजन आघाडीने या लढतीत रंग भरला आहे.
भाजपाकडून खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाली असताना काँगे्रस व राष्ट्रवादी यांच्यामध्ये अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत ही जागा कुणी लढवावी यावरून एकमत होत नव्हते. शेवटी उमेदवारच न मिळाल्याने हतबल ठरलेल्या राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडली. त्यामुळे कमी दिवसात संपूर्ण मतदार संघ पिंजून काढण्याचे आव्हान काँग्रेसचे उमेदवार व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासमोर आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांचा या मतदार संघात दांडगा जनसंपर्क आहे. त्यातच गेल्या वेळी झालेल्या निवडणुकांचा देखील अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. शेतकऱ्यांना हमी भाव, भुसावळचा पाणी प्रश्न, रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, केळीला मिळणारा भाव यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना प्राधान्य देत ते प्रचार करीत आहेत.
तर खासदार रक्षा खडसे यांनी पाच वर्षात केलेल्या कामांचा अहवाल मतदारासमोर सादर करीत मोदींना मत म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला मत असे भावनिक आवाहन केले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा जामनेर हा विधानसभा मतदारसंघ याच लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुुळे महाजन व त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष साधना महाजन प्रचारात सक्रीय आहेत. दोन्ही उमेदवार हे सुसंस्कृत आणि उच्चशिक्षीत आहेत. त्यामुळे वैयक्तिक टिका टिप्पणीपेक्षा केलेली विकास कामे आणि पुढील संकल्प या मुद्यांवर दोघा उमेदवारांकडून प्रचारात भर देण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन कांडेलकर यांनी दलित, मुस्लीम, मराठा व बहुजन यांना एकत्र घेतले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुक्ताईनगरात सभा घेतली आहे. काँग्रेस राहुल गांधी यांच्या तर भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी प्रयत्न करीत आहे. जळगावात भाजपच्या उमेदवारीवरून झालेल्या वादाचे पडसाद रावेमध्येही उमटण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून असलेल्या रक्षा खडसे यांनी जिल्हा परिषदेपासून राजकीय जीवनाला सुरुवात केली. शिक्षण सभापती आणि त्यानंतर २०१४ मध्ये त्या पहिल्यांदा खासदार झाल्यात. रेल्वे आणि केळी या दोन विषयावरील प्रश्न त्यांनी लावून धरले. लेवा व गुजर या दोन्ही मतदारांवर त्यांचा प्रभाव आहे.
काँग्रेसकडून खासदार राहिलेले डॉ.उल्हास पाटील यांनी विविध शैक्षणिक संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून व्यापक जनसंपर्क कायम ठेवला.काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. लेवा समाजाचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघातील अनेक गावांमध्ये त्यांचे वैयक्तिक संबध आहेत.