कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची 100 वर्षे, एका वैभवशाली चित्रपटसृष्टीच्या शतकपूर्तीचा रंजक धावपट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 03:11 PM2017-11-25T15:11:15+5:302017-11-26T07:18:11+5:30

बाबूराव पेंटरांनी १ डिसेंबर १९१७ रोजी कोल्हापुरात ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली, त्यास येत्या १ डिसेंबर रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त..

100 years of the Kolhapur film industry | कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची 100 वर्षे, एका वैभवशाली चित्रपटसृष्टीच्या शतकपूर्तीचा रंजक धावपट..

कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची 100 वर्षे, एका वैभवशाली चित्रपटसृष्टीच्या शतकपूर्तीचा रंजक धावपट..

googlenewsNext

 

- डॉ. कविता अशोक गगराणी

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. किंबहुना तिचा पायाच कोल्हापुरात घातला गेला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस इ. स. १८९५ साली फ्रान्सच्या ल्युमिए बंधूंनी ‘चित्रपट’ या मनोरंजनाच्या अपरिचित अशा माध्यमाचा शोध लावला आणि कलेच्या क्षेत्रात भरारी घेण्याकरिता मानवास जणू नवे क्षितिजच खुले झाले. विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरच इ. स. १९१३ साली नाशिकच्या दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या भारतीय मूकपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक होण्याचा सन्मान मिळविला. या दरम्यानच छत्रपतींचे संस्थान असणाऱ्या कोल्हापूर या दक्षिण महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या अशा संस्थानात चित्रपटनिर्मितीचे प्रयत्न सुरू होते.

कोल्हापूर संस्थानात संगीत, गायन, नाटक, विविध लोककला, चित्रकला, शिल्पकला इ. कलाप्रकारांना मिळालेले प्रोत्साहन, उदार राजाश्रय आणि लोकाश्रय यामुळे कलाकारांची खाण असलेल्या कोल्हापुरात ‘चित्रपट’ हे प्रयोगशीलतेस प्रचंड वाव असणारे माध्यम रुजले व फोफावले नसते तरच नवल! कोल्हापूर संस्थानचे छत्रपती कला व क्रीडाप्रेमी छत्रपती शाहू महाराज व त्यांचेच धोरण पुढे राबविणारे छत्रपती राजाराम महाराज यांनी विविध कला व कलाकारांना दिलेला उदार राजाश्रय व येथील रसिक प्रेक्षकांनी दिलेला लोकाश्रय यामुळे येथे विविध कलांची भरभराट झाली. कोल्हापूरची ‘कलापूर’ म्हणून असणारी ओळख अनेक स्थित्यंतरानंतर आजही कायम राहिली आहे.
चित्रकला, शिल्पकला व यंत्रकला यात विविध प्रयोग करून स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या आनंदराव व बाबूराव पेंटर या आते-मामे भावांनी ‘चित्रपट’ या कला व तंत्र यांची सांगड असणाऱ्या माध्यमाचा ध्यास घेतला. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली. भांडवल उभारणी व माध्यमांचा अंदाज येण्याकरिता चित्रपट प्रदर्शनाने प्रारंभ केला. जुना छायाचित्रक घेऊन तो दुरुस्त करून काही दृश्ये घेण्यात यशही मिळविले, पण दुर्दैवाने इ. स. १९१५ ला आनंदराव पेंटरांचे आकस्मिक निधन झाले आणि नजरेच्या टप्प्यात आलेले यश हुलकावणी देऊन गेले.

बाबूराव पेंटरांना आनंदरावांच्या अचानक जाण्याने मोठा धक्का बसला. त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याचे त्यांना दिलेले वचन निभावण्याच्या निर्धाराने बाबूराव पेंटरांनी १ डिसेंबर १९१७ रोजी कोल्हापुरात आनंदराव पेंटरांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व वंदन करून ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची पॅलेस थिएटर येथे स्थापना केली. हीच कोल्हापुरातील पहिली चित्रपटनिर्मिती संस्था होय, ज्याद्वारे बाबूराव पेंटरांनी कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. येथील कलाकारांची कलेप्रती असणारी निष्ठा, कलेच्या विकासास असणारे पोषक वातावरण व उद्यमशीलता यामुळे बाबूराव पेंटरांनी लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होऊन ‘कोल्हापूर स्कूल’चा वारसा सांगणाऱ्या अनेक कलाकार व तंत्रज्ञांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगभर नावलौकिक कमावला आहे. भारताला पहिले ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथय्या या कोल्हापूरच्याच हे यानिमित्ताने नमूद केले पाहिजे. कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीने लता मंगेशकरांसारखे दिग्गज भारतीय चित्रपटसृष्टीला दिले.

‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना तर झाली, पण इतर अनेक समस्यांबरोबरच भांडवलाची मुख्य समस्या अजून सुटलेली नव्हती. कागलच्या तानीबाई कागलकर या गायिकेने दहा हजार रुपयांचे भांडवल दिले आणि त्या संस्थेत भागीदार झाल्या. संस्थेच्या एक-दोन चित्रपटांनंतर सरदार शंकरराव नेसरीकर हेही संस्थेचे भागीदार झाले. स्त्री भूमिका ही स्त्री कलाकारांनीच साकारली पाहिजे या मताशी ठाम असणाऱ्या बाबूरावांनी स्त्री कलाकार मिळाली नाही म्हणून संस्थेचा पहिला नियोजित चित्रपट ‘सीता स्वयंवर’ रद्द केला. यानंतर ‘सैरंध्री’ चित्रपटाची निर्मिती करावयाचे ठरले. त्यात काम करण्यासाठी महत्प्रयासाने अनुसयाबाई, गुलाबबाई या स्त्री कलाकार तयार झाल्या. या व इतर अडचणीतून वाट काढत ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’चा पहिला पौराणिक कथा असणारा पण कीचकवधाच्या प्रसंगाने ब्रिटिश सत्तेचे उच्चाटन करण्याचा रूपकात्मक संदेश देणारा ‘सैरंध्री’ हा मूकपट पुण्याच्या आर्यन चित्रपटगृहात दिनांक ७ फेबु्रवारी १९२० रोजी प्रदर्शित झाला. स्वत: बनविलेल्या देशी छायाचित्रकाने बाबूराव पेंटर यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण केले आणि याच छायाचित्रकाचा मानस्तंभ बाबूराव पेंटरांच्या घरासमोर दिमाखात उभा आहे. तत्कालीन स्वदेशी चळवळीतील त्यांचे हे योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे.

लोकमान्य टिळकांनी हा चित्रपट पाहून बाबूराव पेंटरांना ‘सिनेमा केसरी’ हा किताब दिला. या चित्रपटातील कीचकवधाच्या हुबेहुब चित्रणापासूनच सेन्सॉर बोर्डची सुरुवात झाली. कीचकाची भूमिका करणारे झुंझारराव पवार हे जिवंत असल्याचे मुंबई इलाक्याच्या कमिशनरसमोर बाबूराव पेंटरांना सिद्ध करावे लागले, यावरूनच त्यांनी किती कल्पकतेने हा प्रसंग चित्रित केला असेल याची कल्पना येते. जाहिरातीकरिता मोठे पोस्टर्स चितारून चित्रपटगृहाबाहेर लावणे, कलाकारांच्या चेहऱ्यावरील बारीक जाळी (गॉज) वापरणे, कॅमेºयाची गती स्थिर राहण्यासाठीचे स्पिडोमीटर, बाह्यचित्रणाकरिता प्रकाश कमी-जास्त करण्यासाठी रिफ्लेक्टर वापरणे, भव्य सेटिंग्ज भासावेत म्हणून कटआउट वापरणे, करामत दृश्यांकरिता पांढऱ्या पडद्याचा वापर करणे, फ्लॅश बॅक पद्धतीने कथानक मांडणे, मिक्स अ‍ॅण्ड फेड आउट इन या तंत्राचा वापर करणे, खोट्या दाढी-मिशांकरिता बकऱ्याचे केस व ते चिकटविण्याकरिता राळ व स्पिरीटपासून चिकटण तयार करणे इ. अनेक गोष्टींची सुरुवात करण्याचे श्रेय या अवलियाला द्यावे लागेल. इतकेच काय, पण त्यांच्या सिंहगड या ऐतिहासिक चित्रपटापासून करमणूक कर सुरू झाला.

इ. स. १९२५ साली बाबूराव पेंटरांनी सावकाराकडून शेतकऱ्यांच्या होत असलेल्या पिळवणुकीचे वास्तववादी दर्शन घडविणारा ‘सावकारी पाश’ हा भारतातील पहिला मूकपट सादर करून कोल्हापूरच्या पुरोगामित्वाचा वसा आणि वारसा जोपासला. समाजप्रबोधनाची ताकद ओळखून या माध्यमाद्वारे त्यांनी अशिक्षित शेतकऱ्यांना शिक्षणाचा संदेश दिला. एकाहून एक असे अनेक सरस पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक चित्रपट ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’च्या बॅनरखाली बाबूराव पेंटरांनी सादर केले. इ. स. १९३१ साली बाबूराव पेंटर संस्थेतून बाहेर पडले व लगेचच १९३२ ला संस्था बंद झाली. यापूर्वी दोन-तीन वर्षे म्हणजे १९२९ साली महाराष्ट्र फिल्म कंपनीत काम करणाºया व्ही. शांताराम, धायबर, फत्तेलाल व दामले यांनी सीतारामपंत कुलकर्णी यांच्या मदतीने संस्थेतून बाहेर पडून ‘प्रभात फिल्म कंपनी’ची कोल्हापुरात स्थापना केली. बाबूरावांच्या हाताखाली चित्रपटनिर्मितीचे धडे गिरविणाºया या त्यांच्या शिष्यगणांनी ‘प्रभात’अंतर्गत चित्रपटनिर्मिती सुरू केली. ‘प्रभात’ची पायाभरणी कोल्हापुरात झाली. मराठी भाषेतील पहिला बोलपट ‘अयोध्येचा राजा’ (१९३२) आणि भारतातील पहिला रंगीत चित्रपट ‘सैरंध्री’ (१९३३) या चित्रपटांची निर्मिती प्रभातने येथेच केली. इ. स. १९३२ ला ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ बंद झाल्यावर व इ. स. १९३३ ला ‘प्रभात’ने पुण्यास स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची कलापरंपरा खंडित होते की काय, असा प्रश्न निर्माण झाला. ही परंपरा अखंडित राखण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज यांनी पाऊल उचलले. त्यांनी ‘कोल्हापूर सिनेटोन’ या चित्रपट संस्थेची स्थापना केली व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या भगिनी आक्कासाहेब महाराजांनी ‘शालिनी सिनेटोन’ची स्थापना केली. तत्कालीन भारतात अस्तित्वात असणाºया ५६२ संस्थानांपैकी कलापरंपरा खंडित होऊ नये म्हणून संस्थानचे राज्यकर्ते चित्रपट निर्मितीत उतरल्याचे उदाहरण जितके कौतुकास्पद तितकेच एकमेवाद्वितीय म्हणावे लागेल. संस्थानाने या दोन्ही संस्थांच्या चित्रीकरणाकरिता उभारलेल्या कोल्हापूर सिनेटोन व शालिनी सिनेटोन या भव्य स्टुडिओज्नी अगदी अलीकडच्या काळापर्यंत कोल्हापूरच्या चित्रपट निर्मितीची परंपरा जोपासण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. ‘कोल्हापूर सिनेटोन’ने भालजी पेंढारकरांच्या दिग्दर्शनाखाली आकाशवाणी व कालियामर्दन, मा. विनायकांच्या दिग्दर्शनाखाली विलासी ईश्वर, तर दादासाहेब फाळकेंचे दिग्दर्शन असलेला ‘गंगावतरण’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली. ‘शालिनी सिनेटोन’ने चित्रपट निर्मितीची सर्व जबाबदारी बाबूराव पेंटरांकडे सोपविली. त्यांनी प्रतिभा, उषा, सावकारी पाश (बोलपट) या बॅनरखाली सादर केले.

या संस्था बंद झाल्या तरी दोन्ही स्टुडिओ यंत्रसामग्रीसह संस्थानाकडून नाममात्र भाडेतत्त्वावर चित्रपट निर्मात्यांना उपलब्ध करून दिले जात असत. चित्रपटनिर्मिती अव्याहतपणे सुरू राहावी, हा त्यामागील हेतू होता. मा. विनायक, बाबूराव पेंढारकर, पांडुरंगराव नाईक यांनी स्थापन केलेल्या ‘हंस पिक्चर्स’ने ‘प्रेमवीर’, ‘ब्रह्मचारी’, ‘धर्मवीर’ ‘बॅ्रण्डीची बाटली’ इ. खुमासदार विनोदी शैलीत सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली.

(लेखिका कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये इतिहासाच्या प्राध्यापक आहेत.)

Web Title: 100 years of the Kolhapur film industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.