फुटात बारा इंचाचे अंतर??

By admin | Published: December 12, 2015 06:30 PM2015-12-12T18:30:11+5:302015-12-12T18:30:11+5:30

इतिहासाची पाने रुपेरी पडद्यावर चितारण्याच्या अकटोविकट आव्हानामध्ये निसरडय़ा वाटा कोणत्या असतात? स्वतंत्र अभिव्यक्तीसाठी आसूसलेल्या कलावंताला या निसरडय़ा वाटेवरून पाऊल घसरणो टाळता येऊ शकते का? - एक चर्चा!

12 inch gap between the feet ?? | फुटात बारा इंचाचे अंतर??

फुटात बारा इंचाचे अंतर??

Next
>- विश्वास पाटील
 
प्रत्येक सामान्य माणसाला ऐतिहासिक साधने शोधून त्यावरून इतिहास समजून घेणो केवळ अशक्य आहे. इतिहासावर आधारलेली महाकाव्ये, कथा-कादंब:या, नाटके, चित्रपट ही माध्यमे इतिहासाचे जनप्रिय वहन अधिक सुलभपणो करू शकतात. मात्र त्यासाठी इतिहासातील घटना, पात्रे कोणालातरी लोकांसमोर आणून ठेवावी लागतात. हे काम लेखक/कवी/कलावंत सातत्याने करत आलेले आहेत. 
ही प्रक्रिया सोपी नव्हे. इतिहास ज्या काळातला आणि तो ज्या काळात ज्या माध्यमाद्वारे, ज्या रीतीने सांगितला जातो त्यात अनेक दुवे सांधणो, समन्वय घालणो हे फार कौशल्याचे काम आहे. लेखक, इतिहासकार आणि कलावंताचे खरे कसब येथेच असते. कलावंताला त्या इतिहासाचा आताच्या काळाशी सांधा बांधावा लागतो. खेरीज कथाकादंबरी असो, वा नाटक-सिनेमा हे सामान्यांच्या आस्वादनासाठी असल्याने त्यात सुलभीकरण असावे लागते. या सुलभीकरणासाठी काही तर्कसुसंगत बदल संभवतात. अशा कलाकृती व्यावसायिक चौकटीत असतील, तर या इतिहास कथनातून मनोरंजनाचीही पूर्वअट पुरविण्याचे आव्हान असते. म्हणजे हे काम अधिकच किचकट होते आणि ते करणा:याला धारेवरूनच चालावे लागते. पूर्ण अभ्यास आणि विषयाचे योग्य आकलन झाले नसल्यास त्यातून अनर्थ घडू शकतो.
हे एवढे सारे घडवून आणताना कलाकाराची जबाबदारी शतपटीने वाढत असते. आपण जे शिवधनुष्य उचलले आहे त्याचे पूर्ण भान त्याला असावे लागते. केवळ गल्ला गोळा करण्यासाठी इतिहासाचा वापर करणार असाल तर त्या वाटेला न जाणो उत्तम. इतिहास अत्यंत टोकाला जाऊन मोडून तोडून लोकांच्या समोर आणण्यापेक्षा अशा लोकांनी त्या घटनांचा आधार न घेता सरळ नवी कलाकृती निर्माण करावी. कारण या इतिहासावर, ऐतिहासिक घटनांवर आणि पात्रंवर सर्व देशाचा, समाजाचा आणि काळाचाही अधिकार असतो. मनोरंजनाच्या उद्देशाने का असेना, पण गांभीर्यपूर्वक इतिहास समोर आणणो जमणार नसेल तर त्याचा गल्ला भरण्यासाठीही वापर होऊ नये असे माङो स्पष्ट मत आहे.
मी आजवर ज्या कादंब:या लिहिल्या त्यामध्ये हे भान अत्यंत कठोरपणो पाळले. पाहुणो-रावळे यांनी घातलेल्या धुडगुसामुळे कधीकधी जबाबदार कत्र्या माणसांनाही अपयशाला सामोरे जावे लागते. आपापसातले भेदभाव-भाऊबंदकी किंवा पाय ओढण्याची खेकडय़ासारखी वृत्ती नसती तर पानिपतामध्येही मराठी सेनेला विजय मिळाला असता. आपली ही वृत्ती अजूनही तशीच आहे. त्यामुळे पानिपत नंतरही नेहमीच घडत राहिले आणि आजही घडतच आहे अशा एका शेवटावर मी ‘पानिपत’ आणून थांबविली. त्यामुळे काही शतके पूर्वीचा काळ आणि आजच्या काळाची संगती मला घालून देता आली. 
ऐतिहासिक पात्रंवर कादंबरी किंवा नाटक, सिनेमा लिहिताना संवाद लिहावे लागतात तेही दोन्ही काळांशी अनुरूप हवेत. त्यातील शब्दही जपून आणि विचार करूनच वापरले गेले पाहिजेत. एखाद्या राष्ट्रपुरुषावर, ऐतिहासिक नायकावर लिहिताना, सिनेमा काढताना त्याच्या जीवनचरित्रची आधुनिक काळाशी सांगड घालायची म्हणून काहीही दाखवून कसे चालेल? एखाद्या राष्ट्रपुरुषाला संगीताची आवड होती म्हणून त्यावर आधारित सिनेमात एखाद्या गाण्याचा आस्वाद तो घेत आहे असे दाखवता येऊ शकेल; पण म्हणून तो एखाद्या हॉलिवूड अभिनेत्रीबरोबर नाचताना दाखविला तर ते चालेल का? उचित मानले जाईल का?
आजवर जेव्हा जेव्हा यासंदर्भाने वादाचे प्रसंग उद्भवले, त्यातल्या बहुतांश वेळा ‘मग कलाकाराच्या स्वातंत्र्याचे काय?’ असा प्रश्न केला गेला किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे करून पळवाट काढण्याचाही प्रयत्न झाला.
इतिहासावर आधारलेली कलाकृती निर्माण करताना कलावंतांना काल-सुसंगत अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य नक्कीच असावे; मात्र फुटात बारा इंचाचे अंतर करणार असाल तर इतिहास मोडण्याचा अधिकार तुम्हाला नाही. अशावेळेस तुम्ही सरळ नव्या कलाकृतीचे, नवनिर्मितीचे आव्हान स्वीकारावे, असे मला वाटते.
‘बाजीराव-मस्तानी’ या आगामी चित्रपटात संजय लीला भन्साळी नेमके येथेच चुकले असावेत, अन्यथा मस्तानी आणि काशीबाईंचा एकत्र पिंगा त्यांना सुचता ना.
मुळात बाजीराव आणि मस्तानी या प्रेमिकांतील मूळ वास्तव कथाच इतकी नाटय़मय आणि थरार उडवणारी आहे, की तिच्या रंगभरणीसाठी दिग्दर्शकाने मस्तानी आणि काशीबाईंना आधुनिक झुळझुळीत साडय़ा नेसवून, त्या दोघींची पोटे आणि पाठ उघडी ठेवून त्यांना नाचवायचा ‘शो’ करायची गरजच नव्हती. प्राप्त कागदपत्रे, तत्कालीन बखरी यात या दोन्ही स्त्रियांची चित्रणो भन्साळींच्या टीमने नीट वाचली नसावीत. मस्तानीने कैदेत असताना बाजीरावांचे थोरले पुत्र नानासाहेब यांना जी पत्रे लिहिली आहेत, त्यातील सामंजस्याची आणि पोक्तपणाची भाषा वाचली की मस्तानीच्या व्यक्तित्वाचे दर्शन घडते. त्यावरून मस्तानीला काशीबाईंचे प्रत्यक्ष दर्शन घडले असते तर तिने पेशवीणबाईंपुढे साष्टांग दंडवत घातला असता. नाचायचे तर नावच सोडा.
उत्तर हिंदुस्थानात आपल्या घोडदौडीने विजयाचे ङोंडे गाडणारा प्रतापी बाजीराव एका सौंदर्यवतीच्या मोहपाशात गुरफटून जावा, या कल्पनेनेच तत्कालीन राजकारणात मोठी खळबळ माजली होती. एकीकडे उभा शनिवारवाडा चिंतातुर, जागोजागचे सरदार-दरकदार हवालदिल. पेशव्यांच्या मातोश्री राधाबाई आणि त्यांचे धाकटे परंतु पराक्रमाने नेटके बंधू चिमाजीअप्पा या दोघांनी या इश्कबाजीला कडवा विरोध केला होता. अनेकदा बाजीरावांची कानउघडणीही केली. ज्यांनी महाराष्ट्रातील इतर मराठा व ब्राrाण सरदार यांना डावलून श्रीवर्धनकर भट कुटुंबाला पेशवाईची वस्त्रे बहाल केली, ते सातारकर शाहू महाराज. त्यांनीही या ‘‘कलावंतीणीचा नाद न सोडाल तर पेशवाई काढून घेऊ’’अशी चक्क धमकी दिली होती. एकीकडे अजोड पराक्रम, दुसरीकडे घायाळ करणारे सौंदर्य. एरवी अत्यंत धार्मिक असणारे, पण मस्तानीच्या सहवासाने अभक्ष्य भक्षणाचीही ‘आदत’ जडलेले पेशवे बाजीराव. त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणारे पण या प्रकरणाची धास्ती खाऊन खफा होऊन गेलेले शहर पुणो! एकूणच कर्तृत्व, नेतृत्व, शृंगार, चाहत, वंचना अशा सप्तरंगाने विधात्यानेच रेखाटलेली मन सुन्न करणारी ही भव्य पटकथा!
समाजकारणातील आणि राजकारणातील कर्तृत्ववान पुरुष घुंगरांना आणि सौंदर्याला भुलतो, भाळतो हा महाराष्ट्राच्या मातीला जडलेला तसा जुना रोग आहे. अशा पुरुषांच्या कर्तृत्वामुळे वाढलेले राज्य, संस्था आणि संपत्ती. बडा कारभार आणि बापाच्या घुंगरवेडाच्या काळातच घरात मोठी झालेली मुले व जाणत्या लेकी. या सर्व बाबींचे विलक्षण ओङो त्याच्या गृहलक्ष्मीलाच पेलायचे असते. हे सारे भोग काशीबाईंनी सहन केले होते, पण तिचे दुर्दैवच असे, की श्रीमंत पेशविणीचा सर्वोच्च मान प्राप्त झालेल्या या राजस्त्रीला कलात्मक स्वातंत्र्याच्या नावे मृत्यूच्या पश्चातही पडद्यावर ठुमकत नाचायला लागावे? बिचारीचे केवळ दुर्दैव, दुसरे काय!
तत्कालीन कागदपत्रे चाळता, शिव्याशाप आणि वाडय़ाकडे दुरून का होईना फेकलेल्या शेणगोळ्यांबरोबर पुणोकर ब्रrावृंदांनी ‘‘शनिवारवाडय़ातील सर्व धार्मिक विधी आणि संस्कारावर बहिष्कार घालू’’ अशा धमक्या दिल्या होत्या. तेव्हा बाजीरावांच्या मातोश्री राधाबाईंनी ‘‘पुणोकर ब्राrाण असे आम्हांस अडवणार असतील, तर आम्ही आमच्या धर्मकार्यासाठी काशीवरून शास्त्रीपंडित बोलवू’’ असा उलट जबाब केला होता. कर्तेकारभारी पुन्हा शाहू महाराजांना भेटले, तेव्हा महाराजांनी लोणच्यासारखे मुरलेले हे प्रेम-प्रकरण समजून घेऊन असा सबुरीचा सल्ला दिला, की ‘वास्तूस अटकाव करून सखा तोडू नये अशी मर्जी आहे’. (मस्तानीसाठी विव्हळ झालेल्या बाजीरावांचे मन तोडून त्यांना तिच्यापासून फारकत घ्यायला लावून कत्र्या पुरुषाला नाराज करण्यात सर्वाचेच नुकसान आहे, असाच याचा मथितार्थ.)
साहित्यिक आणि दिग्दर्शकानीही इतिहासातील आदर्श आणि जनप्रिय अशा व्यक्तिरेखांचे सादरीकरण किंवा पुनमरूल्यांकन पुरेशा गांभीर्याने करायला हवे. सत्य आणि कल्पित पात्रे यांची सरमिसळ करून नव्या कलाकृतीचा घाट रचण्याचे स्वातंत्र्यही कलावंतांना अवश्य असते. त्यादृष्टीने ‘मुघल-ए-आझम’ हे अत्यंत आदर्श उदाहरण. मुळात इतिहासात अनारकली नावाची स्त्रीच अस्तित्वात नव्हती. ही कल्पित कथा प्रथम उर्दू नाटककार इम्तियाज अली ताज यांच्या मेंदूत जन्म पावली. परंतु के. आसिफ नावाच्या प्रतिभावंताने त्याच कल्पित कथेवर केवढय़ा भव्य उंचीचा मीनार उभारला आहे. त्याने सम्राट अकबराची जनमान्य उंची अजिबात कमी होऊ दिली नाहीच; उलट त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी भव्य-दिव्य अशी इभ्रत देऊ केली. ‘मुघल-ए-आझम’चा हा तोल बाजीराव-मस्तानीमध्ये सांभाळता आलेला नसावा, हेच खरे!
इतिहासात व जनमाणसांच्या हृदयात आयत्या तयार झालेल्या व्यक्तिरेखांच्या ‘सार्वजनिक ब्रॅण्ड व्हॅल्यू’चा वापर करताना किमान अभ्यास व संशोधनाची नीट काळजी घ्यायला हवी. भन्साळींच्या ‘पिंगा’ गाण्यात मध्येच लावणीचे तोडे येतातच कसे? बाजीराव कालखंडात मराठी ‘लावणी’चा मुळात जन्मच झाला नव्हता. फार तर त्या काळात लुगडी नेसून नाच्या पोरांचे कुठे-कुठे ठुमकत नर्तन चालायचे. ठुमरी आणि दादराच्या अंगाने उत्तरप्रांती तवायफ नाचायच्या ती लावणी ख:या अर्थी जन्माला आली आणि फोफावलीही ती पुढे दुस:या बाजीरावांच्या काळात. म्हणजेच बाजीराव-मस्तानी प्रकरणानंतर साठ ते सत्तर वर्षानी. पेशवे गणोशाचे पुजारी होते, मल्हारीचे नव्हे. तरी या सिनेमातला बाजीराव मल्हारीच्या नावाने भंडारा उधळत नाचतो, हे कसे?
मस्तानी ही कोणी लेचीपेची स्त्री नव्हती. ती झुळझुळीत मराठी साडीमध्ये कधीही वावरलेली नाही. मस्तानीची म्हणून जी प्राप्त, सत्य आणि कल्पित अशी देशी व विदेशी चित्रे उपलब्ध आहेत, त्यामधून तिच्या बुंदेली सौंदर्य आणि वस्त्र प्रावरणांचे पुरेसे दर्शन घडते. तिने कधीही मराठी वळणाची वस्त्रे नेसली नव्हती. काजळ आणि सुरम्याची नजाकत सोडून टिकलीकडे धाव घेतली नव्हती. ग. दि. माडगूळकरांसारखा महान कवी लावणीच्या एका कडव्यात मस्तानीचा केवढा गोडवा चुटकीसरसा उभा करतो पहा -
मी मस्तानी, हिंदुस्थानी, 
बुंदेली पेहराव झीर झीरवाणी निळी ओढणी वाळ्यांचा शिरकाव
तुम्ही माङो बाजीराव, 
तुम्ही माङो बाजीराव..!
अशा  मस्तानीने 1739 आणि 174क् मध्ये दोन वेळा पेशवे दरबाराकडून आपल्या प्रीतीसाठी तुरुंगवास भोगला आहे. उत्तरेत रावेरखेडी मुक्कामी जेव्हा बाजीरावांचा वाताच्या झटक्याने मृत्यू ओढवला तेव्हा पुण्यात कैद भोगणा:या मस्तानीला आपल्या रायाशिवाय ही दुनियाच व्यर्थ वाटली. आपल्या सख्याच्या निधनाची बातमी ऐकताच त्या धक्क्याने तिचा मृत्यू ओढवला. किंवा अतीव दु:खाने कदाचित तिने आत्मघात करून घेतला असावा. पण प्रीतीसाठी मरण पत्करलेच. एकूणच असामान्य शौर्य आणि सौंदर्याच्या सत्य खेळाने नटलेल्या या प्रेमकथेचे पदर ठायी-ठायी इतके नाटय़मय आहेत, की तिथे ‘पिंगा’ सारख्या आचरट ठिगळांची जरूरच का भासावी?
मनोरंजनाच्या उद्देशाने निर्मिलेल्या कलाकृतीसाठी इतिहासाला हात घालताना इतिहासाच्या आकलनाची किमान दक्षता घ्यायला हवी, हे या चित्रपटाने पुन्हा एकवार सिद्ध केले आहे, हे मात्र नक्की!..
या निमित्ताने आता इतिहासाचे लेखन, कलाकाराचे स्वातंत्र्य हे मुद्दे समोर आले आहेत तर त्यावर व्यापक चर्चा होऊदे. ती महत्त्वाची आहे.
सखोल अभ्यास, काळाचा अंदाज, दोन्ही काळांचा सांधा बांधण्याची ताकद आणि इच्छा असेल तरच ऐतिहासिक घटनाक्रमाला एका परिपूर्ण कलाकृतीच्या रूपात सादर करण्याचे आव्हान पेलता येऊ शकते. या आपण ज्या नाममुद्रा (ब्रॅँड्स) वापरतो त्या आपण जन्माला घातलेल्या नाहीत, त्यावर सर्वाचा अधिकार आहे, याचे भान कलावंताने ठेवणो जरुरीचेच असते. 
केवळ कल्पनेच्या पंखांनी इतिहासाची उड्डाणो घडत नसतात.
 
  जुन्या-नव्या धाग्यांचे विणकामपरदेशामध्येही ऐतिहासिक पात्रंवर आणि महाकाव्यांवर अनेक चित्रपट आणि कादंब:या निघाल्या आहेत. पण त्यात बहुतांशवेळा आपण जुने प्रसंग नव्या काळासाठी विणत आहोत याचे भान ठेवलेले दिसते. बेकेट या सिनेमाचे उदाहरण घ्या. धर्मगुरू मित्र आणि राजा या पात्रंवर आधारित हा सिनेमा अत्यंत गाजला होता. त्यावर आधारित हिंदीमध्ये नमकहराम चित्रपट आणि मराठीमध्ये वसंत कानेटकरांनी बेईमान हे नाटकही लिहिले. मात्र त्यामध्ये हे सर्व नियम पाळले गेले होते. 
एकदा कुसुमाग्रजांशी गप्पा मारत असताना कलाकाराने अशावेळेस कितपत स्वातंत्र्य घ्यावे असा मुद्दा निघाला तेव्हा स्वत: कुसुमाग्रजांनी त्यांचा अनुभव सांगितला. बेकेटबद्दल त्यांनी लंडनमध्ये तेथील रसिकांना मत विचारले होते. त्यावर तेथील प्रेक्षकांनी अत्यंत समर्पक उत्तर दिले. ‘नाटक सिनेमात दाखवलेला बेकेट हा मूळ कथेपासून फारच दूरचा होता; मात्र त्यांनी मूळ तत्त्वांचा धागा सोडलेला नाही, एवढे आमच्यासाठी पुरेसे आहे,’ असे उत्तर कुसुमाग्रजांना मिळाले होते. नवे विणकाम करताना जुन्या धाग्यांचा काळजीपूर्वक वापर करणो ते हेच! 
या उदाहरणावरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सोयीस्कर पळवाट वापरून इतिहासाची मनमानी मोडतोड करण्यापेक्षा कलावंताने आपल्या अभ्यासावर / संशोधनावर अधिक लक्ष देणो श्रेयस्कर, 
हेच सिद्ध होते.
 
(‘पानिपत’, ‘नेताजी’ यांसारख्या साहित्यकृतींनी ख्यातकीर्त ठरलेले लेखक मराठीतील ख्यातनाम कादंबरीकार आहेत.)

Web Title: 12 inch gap between the feet ??

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.