2 चालक, 22 प्रवासी, 4600 किमी अंतर!... 'लाल परी'च्या विक्रमी प्रवासाची वादळी गोष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 06:04 AM2020-06-07T06:04:00+5:302020-06-07T06:05:20+5:30
परप्रांतीय मजुरांना पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या गावी सोडायचं होतं. त्यासाठी सक्षम बसचालकांचा शोध सुरू झाला. सुरेश जगताप आणि संतोष निंबाळकर या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. प्रवास लांबचा होता, रस्ता अनोळखी होता. केवळ नकाशावर बघितलेलं राज्य, अन्फाम वादळाचा तडाखा आणि कोरोनाची भीती! या सर्वांवर मात करून आठवडाभराची मोहीम त्यांनी पाच दिवसांतच फत्ते केली!
- प्रगती जाधव-पाटील
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा केंद्राचा निर्णय राज्यांनी स्वीकारला. महाराष्ट्रातही विविध राज्यांतून आलेल्यांना सोडण्याचं नियोजन झालं. एसटी आणि रेल्वे या दोन्हीतून जागा मिळेल तसे परप्रांतीय मायभूमीत परतण्यासाठी धडपडत होते.
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी महाराष्ट्राची ‘लालपरी’ही चक्क पश्चिम बंगालच्या सीमेपर्यंत धावली. सर्वाधिक 4 हजार 600 किलोमीटरचं हे अंतर अवघ्या पाच दिवसांत पूर्ण करून सातार्याचं नाव देशात गाजविण्याचा पराक्रम सातारा आगाराच्या सुरेश जगताप आणि संतोष निंबाळकर या दोन चालकांनी केला. या प्रवासात अनेक चित्तथरारक अनुभवही त्यांना आले.
या कामासाठी एसटीचालक म्हणून राज्यभर गाडी चालविणार्या दोघांवर सातार्यातून थेट पश्चिम बंगालला जाण्याची जबाबदारी सोपवली गेली. दोन वाहनचालक ही कामगिरी सात दिवसांत पूर्ण करतील, असा कयास राज्य परिवहन महामंडळाने बांधला होता. प्रत्यक्षात मात्र पाच दिवसांत, 22 प्रवाशांना सुखरूप सोडून अन्फाम वादळाचा मुकाबला करून सुरेश तुकाराम जगताप आणि संतोष सुरेश निंबाळकर हे दोन चालक सातार्यात दाखल झाले.
कुटुंबाचा विरोध पत्करून ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद नसानसात भिणविणार्या या अवलिया कर्तव्यनिष्ठ चालकांचा हा प्रवासही तितकाच रोमांचकारक होता..!
लॉकडाऊनमुळे बाहेरच्या राज्यातील मजूर सातार्यात अडकले होते. त्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश काढले.
त्यानंतर 22 जणांना पश्चिम बंगालमध्ये असलेल्या नुधिया या जिल्ह्यात सोडण्यासाठी सुयोग्य, तार्किक कौशल्य असणार्या संयमी वाहनचालकांची शोधाशोध सुरू झाली. सातारा आगारचे अधिकारी संजय भोसले, रेश्मा गाडेकर यांनी एमएच 13 ईओ 8471 ही गाडी पाठवण्याचे ठरवले. त्यासाठी विनाअपघात सेवा केलेले अनुभवी चालक सुरेश तुकाराम जगताप आणि खटाव तालुक्यातील नवखे वाहनचालक संतोष सुरेश निंबाळकर यांची निवड केली.
अनुभवी आणि तरुण वाहनचालकांची ही जोडी पहिल्यांदाच एकमेकांसोबत प्रवास करणार होती. कामगारांना निर्धारित वेळेत पोहोचवून सुखरूप परतण्याची मोहीम फत्ते करण्याचा विडा उचलूनच जगताप-निंबाळकर हे दोघे सज्ज झाले. 15 मे रोजी रात्री साडेसात वाजता मान्यवर अधिकार्यांच्या उपस्थितीत राजवाडा बसस्थानकातून एका अनोख्या प्रवासासाठी आणि मानवतेच्या समृद्ध अनुभूतीसाठी ही बस रवाना झाली.
वाहनचालक जगताप आणि निंबाळकर यांना हा प्रवास करण्याबाबतची सूचना अवघ्या दोन दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यामुळे निर्धारित ठिकाणी जाण्याबरोबरच आवश्यक साधनसामग्री घेणे, दिशादर्शनासाठी पुस्तक, संबंधित मार्गावरील आवश्यक नावं यांचा अभ्यास करण्याचे काम जगताप यांनी केले. या मार्गाची रेकी करून राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग यातील फरक व स्थानिक भाषेतील दिशादर्शक फलक वाचताना घेण्याच्या काळजीबाबत निंबाळकर यांना मार्गदर्शनही केले. सातार्यातून हैद्राबाद, विजयवाड, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कोलकाता ते नुधिया असा तब्बल 4 हजार 600 किलोमीटरचा प्रवास त्यांना पाच दिवसांत पूर्ण करायचा होता.
या प्रवासाविषयी बोलताना जगताप म्हणाले, ‘आमच्या सोबत असलेल्या पश्चिम बंगालच्या या कामगारांनी कायम रेल्वेनेच प्रवास केला होता. त्यामुळे राज्यमार्गाने प्रवास करताना अनोळखी गावाचं नाव आलं की दचकून, ‘साहब ये कौन सा गांव हैं’ म्हणून चौकशी करत होते. आपल्या गावी सुखरूप पोहोचण्याची त्यांच्या चेहर्यावरील ओढ यामागे होती. एसटीने किमान आठ दिवस लागणार, असा हिशेब लावून कामागरांनीही स्वत:सोबत जीवनावश्यक वस्तू घेतल्या होत्या. प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर आमची काळजी घेणं, आम्हाला साथ देणं, ‘साहब थक गये तो गाडी कंही भी रुका दो, कोई दिक्कत नही’ इतकं आश्वासक साथ देत होते. मातृभूमीची ओढ आणि आप्तांच्या भेटीची प्रबळ उत्सुकता असतानाही आपल्या सेवेसाठी असलेल्यांची काळजी घेण्याची संवेदनशीलताही त्यांच्या ठायी असल्याचे अनुभवता आले.’
पश्चिम बंगालच्या सीमेवरील नुधिया येथे कामगारांना सोडून परतत असतानाच अन्फाम वादळ उत्तर भारतात धडकले. अन्फाम वादळाचा जोर वेगानं वाढत असतानाच त्यांनी कोलकाता सोडलं. कोलकाता सोडून साठ किलोमीटरचं अंतर पार करेपर्यंत अन्फामच्या वादळाने कोलकाताचा बराचसा भाग पाण्याखाली गेला. त्याचा फटका जगताप-निंबाळकर यांनाही बसला. ओरिसा राज्यातील खडकपूर येथे ‘एनडीआरएफ’- राष्ट्रीय आपत्ती कृती दलाच्या जवानांनी त्यांची सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय केली. रात्री 9.30 ते 4.30 असा आराम करून त्यांनी पुन्हा गाडीला स्टार्टर मारला. प्रवाशांसह प्रवास करताना बसून झोपणार्या या दोन्ही वाहनचालकांनी परतीच्या प्रवासात पहिल्यांदाच एकत्र विर्शांती घेतली.
परतीच्या प्रवासात वादळाचा सामना करत त्यांनी दीड दिवसाचा प्रवास केला. याकाळात राज्याच्या सीमेवर चौकशी पूर्ण होईपर्यंत मोबाईल चाजिर्ंग करण्याची कसरत त्यांना करावी लागायची. कुटुंबीय आणि कार्यालयाला माहिती देण्यापुरताच त्यांचा फोन सुरू होता. इतर वेळी मात्र तो बंद करून ठेवण्यात येत होता. सातारा आगारात एसटी आल्यावर आगारप्रमुख आणि घरी परतल्यावर कुटुंबीयांच्या चेहर्यावरचा अभिमानयुक्त आनंद त्यांना उल्हासित करून गेला. मिळालेलं हे मानसिक बळ, हुरुप आणि अनुभवाच्या बळावर ते पुन्हा लगोलग मध्य प्रदेशच्या दौर्यावर रवाना झाले. इथे अडकलेल्या तिथल्या लोकांना त्यांच्या ‘घरी’ सोडण्यासाठी!.
अर्थार्जनासाठी नोकरी आणि आत्मिक आनंदासाठी काम केलं जातं. सुरेश जगताप आणि संतोष निंबाळकर या दोन्हीही वाहनचालकांनी कामातून आनंद मिळतो म्हणून कर्तव्य बजावलं. केवळ नकाशावर बघितलेलं राज्य, वादळाचा सामना, कोरोनाची भीती या सर्वांवर मात करून त्यांनी सातार्याचं नाव राज्यात मोठं केलं.
दो दिन रुको साहब..
सातार्यातून सुरू झालेला पश्चिम बंगालच्या नुधियापर्यंतचा प्रवास पूर्ण करून सुखरूप आपल्या गावी पोहोचलेल्या कामगारांना हे दोघेही वाहनचालक देवदूत भासत होते. संकटसमयी आपल्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणार्या या दोघांचे आभार मानण्यापेक्षा त्यांचा पाहुणचार करण्याची त्यांनी तीव्र इच्छा होती. प्रवासात आणि त्यानंतरही, ‘साहब, दो दिन रुको, हम सब इंतजाम करेंगे’ म्हणत ते गळही घालत होते; पण पुन्हा महाराष्ट्रात येऊन दुसर्या मोहिमेसाठी सज्ज होण्याची तडफ असलेल्या या दोन्ही वाहनचालकांनी पाहुणचार घेण्यासाठी पुन्हा येण्याचं आश्वासन देऊन त्यांची रजा घेतली.
बोलके आकडे!
सातारा ते नुधिया (पश्चिम बंगाल) प्रवास.
4,600 किलोमीटर अंतर
44 हजार रुपयांचे डिझेल
863 लिटर इंधन
900 किलोमीटर रोजचा प्रवास
22 प्रवासी
2 चालक
असं केलं वेळेचं नियोजन!
एकूण 4 हजार 600 किलोमीटर प्रवासाचा टप्पा गाठण्याची रेकी जगताप यांनी केली होती. सूक्ष्म नियोजन आणि योग्य अंमलबजावणी हे त्यांचे तत्त्व यासाठी कामी आले. राज्यांच्या सीमांवर तपासणीसाठी गाडी थांबविली जायची. तेवढय़ाच वेळेत प्रवासी आणि वाहक गाडीतून खाली उतरायचे. चेकपोस्टवर मिळणारे जेवणही प्रवाशांसह सर्वांनी चालत्या गाडीत केले.
रस्ता चुकवणारा भुलभुलैया..
राज्यांतर्गत प्रवास करणार्या एसटी चालकांसाठी पश्चिम बंगालपर्यंतचा प्रवास निश्चितच आव्हानात्मक होता. अँटलस आणि गुगल यांच्या आधाराने हा प्रवास सुरळीत सुरू होता. निंबाळकर एसटी चालवत असताना जगताप विर्शांती घेत होते. झोपण्यापूर्वी त्यांनी निंबाळकरांना आवश्यक त्या सूचना आणि रस्ता ओळखण्याची आयडिया दिली; पण कोलकाता शहरात त्यांना बायपास रस्ता आणि फलक दोन्ही दिसेनासे झाले. लॉकडाऊन; त्यात रात्री उशिरा रस्त्यावर कोणीच नाही. तब्बल दीड तास वेगवेगळ्या मार्गांनी गेलं तरी गाडी मूळ जागेवर येत असल्याने निंबाळकर यांनी जगतापांना उठवले. पुस्तकात डोकावून जगतापांनी पुढील सूचना केल्या. एका चुकीच्या छोट्याशा वळणामुळे दीड तास वेळ गेला होता.
घामाच्या धारा, पायांवर सूज!
सातारा ते पश्चिम बंगाल असा प्रवास करताना तापमानाचा पारा वाढलेला होता. समुद्र किनारपट्टीवरून तब्बल बाराशे किलोमीटरचा प्रवास करताना दमट हवामानामुळे घामाच्या सलग धारा लागल्या होत्या. कित्येकदा बाटलीतले पाणी तोंडावर मारून त्यातून थोड्या वेळासाठी गारवा मिळविण्याचा प्रयत्न दोघांनीही केली. सलग तीन दिवस दमट वातावरणातील प्रवासाने त्यांना घामोळ्यांचाही त्रास झाला. सलग गाडी चालविण्याने पायांवरही सूज आली होती. या त्रासाची पर्वा न करता त्यांनी पश्चिम बंगालहून येऊन पुन्हा 1200 किलोमीटरचा मध्यप्रदेशचाही पल्ला पूर्ण केला.
महाराष्ट्र? - बाहरही रुको!
महामार्गावर अत्यावश्यक सेवा पुरविणार्या वाहनांना चहा, नाष्टा आणि जेवणाची सोय व्हावी, या उद्देशाने काही ढाबे सुरू होते. स्वत:बरोबर असलेले खाद्यपदार्थ आणि तपास नाक्यांवर मिळणारे फूड पॅकेटस् हे जेवणाचे आधार होते. मात्र, सलग वाहन चालवून आलेला कंटाळा आणि पाय मोकळे करण्यासाठी एखाद्या ढाब्यासमोर बस थांबवली तर बर्याचदा या दोन्ही वाहनचालकांना चहा देण्यासही नकार मिळायचा. अर्थात त्यामागेही कारण होतं. ‘महाराष्ट्र में कोरोना का फैलाव ज्यादा हैं, इसलिए आप को अंदर नहीं ले सकते’ असे त्यांना सांगण्यात यायचे.
pragatipatil26@gmail.com
(लेखिका लोकमतच्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
छाया : जावेद खान, सातारा