आमीर, नसीर आणि ‘दीवार’चा जुना घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 06:01 AM2018-12-30T06:01:00+5:302018-12-30T06:05:02+5:30
नसीरुद्दीन शाहसारख्या अनेक ज्येष्ठांची भूमिका दीवारमधल्या निरुपा रॉयची आहे. राज्यकर्त्यांनी आणि त्यांना निवडून आणणाऱ्या बहुसंख्यकांनी उन्मादानं अमिताभी डायलॉग मारणं चालूच ठेवलं तर एक दिवस खरोखरच गुन्हेगार अमिताभची आई, घर नव्हे देश सोडून निघून जाईल...
- लोकेश शेवडे
भारतीय चित्रपटांमध्ये तत्कालीन भारतीयांच्या जीवनाचं प्रतिबिंब असतं की नाही कुणास ठाऊक; पण भारतीयांच्या जीवनात मात्र भारतीय चित्रपटांचं प्रतिबिंब उमटत असतं. सलीम-जावेद ही लेखकद्वयी बहरात असण्याच्या काळात, अमिताभ बच्चन आणि शशी कपूर हे जोडनायक असलेला त्यांचा ‘दीवार’ हा चित्रपट अतिशय गाजला होता. या चित्रपटात दारिद्र्य, अन्यायानं ग्रासलेलं लहानपण भोगून मोठेपणी इन्स्पेक्टर आणि गुन्हेगार (स्मगलर) बनलेले शशी कपूर-अमिताभ बच्चन हे दोन भाऊ आणि निरूपा रॉय ही त्यांची आई दाखवली आहे.
चित्रपटाच्या उत्तरार्धात इन्स्पेक्टर बनलेला शशी कपूर आपला गुन्हेगार भाऊ अमिताभ याच्याविरु द्ध पुरावे घेऊन त्याला कबुलीजबाबाच्या कागदपत्रांवर सही करायला सांगतो. त्यावर अमिताभ आपल्या भावाची बोलती बंद करणारा खटकेबाज युक्तिवाद पेश करतो. तो म्हणतो,
‘जाओ, पहले उस आदमीका साइन लेके आओ जिसने मेरे बापसे जबर्दस्ती साइन लिया था।जाओ, पहले उस आदमीका साइन लेके आओ जिसने ‘अमुक तमुक ढमुक किया....’
अन्य लोकांची पापकर्मे, कृष्णकृत्यांची लांबीचौडी यादी आपल्या इन्स्पेक्टर भावाला देऊन ‘त्यांनी साइन केल्यावरच मी साइन करेन’ असं उत्तर अमिताभ देतो.
त्याकाळी स्मगलरच्या तोंडची ही विधानं ऐकून पब्लिक बेफाम खूश होऊन टाळ्या वाजवत चित्कारत असे. या टाळ्या मिळवण्यात अमिताभ बच्चनचा अभिनय आणि त्याच्या संवादफेकीचा वाटा होताच; परंतु त्यात अधिक मोठा वाटा सलीम-जावेद या जोडगोळीनं त्या संवादातून मांडलेल्या मुद्द्यांचा होता.
दीवार हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला होता. पण आजही त्यातल्या या संवादाचा प्रभाव जनमानसावर टिकून आहे असं जाणवतं, विशेषत: दूरदर्शन वाहिन्यांवरील चर्चा-वाद पाहताना हा प्रभाव गेल्या चार दशकात अधिकाधिक खोल होत चालल्याचं दिसतं.
कोणत्याही कलाकारानं, साहित्यिकानं, विचारवंतानं राज्यकर्ते किंवा बहुसंख्याकांविरुद्ध ब्र जरी काढला तरी त्यावर बहुसंख्याकांच्या, म्हणजेच राज्यकर्त्यांच्या बाजूचे लोक ‘अमुक झालं तेव्हा तुम्ही कुठे होतात? तमुक घडलं तेव्हा तुम्ही का गप्प होतात?’ असे अमिताभी डायलॉग फेकून मग ‘आत्ताच का ही तक्रार?’ असा सलीम-जावेदी सवाल त्यावरच्या दुर्दर्शनी चर्चेत त्या ‘ब्र’कारकांसमोर आदळतात. आणि मग.... निरुत्तर झालेल्या ‘ब्र’कारकांपुढे विजयी मुद्रेनं छद्मीपणे हसतात.
दीवार पाहताना अमिताभच्या ‘जाओ पहले उस आदमीका साइन लेके आओ’ या डायलॉगवर टाळ्या वाजवणाºया बहुतांश प्रेक्षकांना आपण एका स्मगलरचं, त्याच्या गुन्ह्यांचं समर्थन करतो आहोत हे कळतच नसे. सलीम-जावेदचा हा डायलॉग पत्त्यातल्या जोकरसारखा आहे. तो कोणताही गुन्हेगार कोणत्याही गुन्ह्यासाठी केव्हाही कुठेही वापरून आपल्या समर्थनाची रमी लावू शकतो.
पहले उस आदमीका साइनच्या या अर्थाचं किंवा परिणामाचं आकलन सर्वसामान्यांना फारसं नसलं, तरी राजकारणी किंवा वाहिन्यांवरील चर्चकांचं आकलन मात्र पूर्ण असतं. त्यांना स्मगलर अमिताभच्या या डायलॉगपुढे इन्स्पेक्टर शशी कपूर निरुत्तर होतो हे चांगलंच ठाऊक असतं. म्हणूनच ते बहुसंख्यकांच्या किंवा बहुसंख्यकांच्या जोरावर बहुमत मिळालेल्या राज्यकर्त्यांच्या अन्यायाविरु द्ध तक्र ार करणाऱ्या प्रत्येकाला ‘अमुक अन्याय घडला तेव्हा तुम्ही कुठे होतात? तेव्हा का गप्प होतात?’ हाच चलाख प्रश्न विचारून तक्रारदाराला गप्प करतात.
खरं तर, गुन्हेगार अमिताभनं हा डायलॉग फेकलेला असतो. ‘इन्स्पेक्टर’वर, म्हणजे तपास यंत्रणेवर . हा इन्स्पेक्टर किंवा तपास यंत्रणा असते बहुसंख्याकांचे प्रतिनिधी असलेल्या राज्यकर्त्यांच्या हाती. म्हणजेच ‘पहले उस आदमीका साइन’ घेण्याचं कर्तव्य संपूर्णत: राज्यकर्त्यांचं असतं. याउलट गुन्हे तपासणं किंवा गुन्हेगाराला शिक्षा देणं हे काही कलाकार, साहित्यिक, विचारवंत यांचं आद्यकर्तव्य नव्हे, त्यांना तसे अधिकारच नाहीत. त्यांच्या हाती फक्त अन्यायाविरुद्ध तक्रार नोंदवणं किंवा आक्रोश करणं एवढंच असतं.
सबब, ‘अमुक-तमुक अन्यायाच्या वेळी तुम्ही कुठे होता? तेव्हा गप्प का होता?’ हा प्रश्न कलाकार, साहित्यिक, विचारवंत यांनी राज्यकर्त्यांनाच किंवा त्यांच्या समर्थकांनाच विचारायला हवा. तथापि, टीव्ही वाहिन्यांवरच्या किंवा वृत्तपत्रातल्या चर्चेत मात्र नेमकं याविरुद्ध घडताना दिसतं.
आधी आमीर खान आणि आता नसीरु द्दीन शाहसारख्या ज्येष्ठ कलाकारानं ‘भारतात आपली मुलं सुरक्षित नाहीत’ असं म्हणणं किंवा अन्य अनेक विचारवंतांनी, साहित्यिकांनी देशात असहिष्णुता वाढल्याबद्दल काळजी वाटते असं म्हणणं म्हणजे काही युद्ध पुकारणं किंवा देशद्रोह करणं नव्हे; किंबहुना आक्रोश, आक्रंदन असं म्हणण्याइतपतदेखील त्यांचा आवाज मोठा नाही. त्यांच्या या विधानांना फार तर अन्यायाविरु द्ध काढलेला ‘ब्र’ म्हणता येईल.
दादरीपासून व्हाया उना ते बुलंदशहरपर्यंतच्या लिंच प्रवासाबाबत केवळ ‘ब्र’ उच्चारणाऱ्या या सर्वांवर बहुसंख्यक आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारे सत्ताधारी अमिताभी डायलॉग फेकून उन्मादानं विजयी हास्य करताना पाहून त्यांना सांगावंसं वाटतं, की कलाकार, साहित्यिक, विचारवंत यांच्या भूमिकेबाबत त्यांची गफलत होते आहे. कलाकार, साहित्यिक, विचारवंतांची भूमिका इन्स्पेक्टरची नाही. इन्स्पेक्टर शशी कपूर अमिताभसमोर निरुत्तर होतो. पण त्याप्रसंगात न्याय, सत्य यांची चाड असलेली त्या दोघांची आई निरूपा रॉय ही अमिताभच्या त्या डायलॉगनंतर अमिताभचं घर सोडून निघून जाते आणि अमिताभ आटोकाट प्रयत्न करूनही तिला थांबवण्यात अपयशी ठरतो.
नसीरुद्दीन शाहसारख्या अनेक ज्येष्ठांची भूमिका दीवारमधल्या निरूपा रॉयची आहे. राज्यकर्त्यांनी आणि त्यांना निवडून आणणाऱ्या बहुसंख्यकांनी उन्मादानं अमिताभी डायलॉग मारणं चालूच ठेवलं तर एक दिवस खरोखरच गुन्हेगार अमिताभची आई घर नव्हे देश सोडून निघून जाईल... दुर्दैवाने तेवढंच तिच्या हाती आहे !
(लेखक ख्यातनाम उद्योजक आहेत)
manthan@lokmat.com