२०२० ने थरकाप उडवला; पण २०२१ सुहृद असेल!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 08:00 AM2020-12-27T08:00:00+5:302020-12-27T08:00:07+5:30
सरत्या वर्षाने जगाला महत्त्वाचे धडे शिकवले आहेत, न सुटणारा प्रश्न टाकला, वरून उत्तरे शोधण्याची सक्तीही केली; म्हणूनच जगाला एकजुटीने उभे राहणे भाग पडले. २०२० चे धडे भविष्यात जगाच्या उपयोगाला येणार, हे नक्की!
बिल गेट्स
अध्यक्ष, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन
सरत्या वर्षाने जगभरातील सर्वांचाच थरकाप उडवला. कोविड-१९ च्या तडाख्यात आतापर्यंत साडेसात कोटी लोक सापडले असून, मृतांची संख्या १६ लाखांचा टप्पा ओलांडून गेली आहे. लाखो अब्ज डॉलर्सचे आर्थिक नुकसान, बेरोजगारांच्या संख्येत पडलेली लक्षावधींचा भर आणि नियमित वर्गांना मुकलेले अब्जावधी विद्यार्थी हे या महामारीचे ‘कर्तृत्व.’ असे असले तरी २०२१ मध्ये मात्र आपल्या कानी शुभवार्ता पडणार, याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही.
गेले वर्षभर मी आणि माझी पत्नी मेलिंडा आम्ही दोघेही जगभरातील धोरणकर्ते, वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांच्या सतत संपर्कात आहोत. या वर्षभरात मानवाने साधलेली वैज्ञानिक प्रगती स्तिमित करणारी आहे. जेमतेम १२ महिन्यांच्या काळात एका संपूर्ण अपरिचित विषाणूबाबत जगाने घेतलेली झेप मानवी इतिहासात अभूतपूर्व अशीच आहे. एरवी एखादी लस विकसित करण्यासाठी किमान दहा वर्षे जावी लागतात. यावेळी एक वर्षापेक्षा कमी काळात अनेक लसी विकसित करण्यात आल्या. अर्थात, धोका अजूनही टळलेला नाही. संगणकाच्या मदतीने निर्मिलेली प्रारूपे दर्शवतात की, येत्या काही महिन्यांत महामारी अधिक विराट स्वरूप धारण करू शकते. शिवाय नव्याने आढळलेल्या कोरोनाच्या उत्परिवर्तनाचाही अभ्यास करावा लागेल.
तरीदेखील आपल्याला आश्वस्त करणारी दोन कारणे आहेत. एक- मास्क, शारीरिक अंतर आणि अन्य सुरक्षात्मक उपाययोजनेद्वारे विषाणूला अटकाव करून प्राण वाचवता येतात, हे सिद्ध झाले आहे आणि दुसरे- ज्याबद्दल आतापर्यंत आपण ऐकत वा वाचत होतो त्या लसी आणि उपचार पद्धती नववर्षात प्रत्यक्षात उपलब्ध होणार आहेत. किमानपक्षी प्रगत देशात यांचा परिणाम दिसून येईल, रुग्णांची आणि मृत्यूची संख्या झपाट्याने कमी होईल.
गेल्या वर्षभरात मी जे धडे शिकलो, त्याबाबत मी थोडे विवेचन करणार आहे.
कोविड-१९ विरोधी लस : सध्या नेमके काय चालू आहे ?
1. ‘मोडेर्ना’ आणि फायझर/बायोएनटेक यांनी विकसित केलेल्या लसींना अमेरिका आणि इंग्लंड धरून अनेक देशांत आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. अन्य अनेक कंपन्या आपल्या लसींच्या परिणामांची घोषणा येत्या काही सप्ताहांत करतील.
2. या लसींचे उत्पादन, साठा आणि त्यांची सुरक्षित वाहतूक हे मोठे आव्हान असेल.
3. एमआरएनए तंत्राद्वारे लस निर्मिणाऱ्या कारखान्यांची संख्या बरीच कमी आहे. या लसींना -७० अंश सेल्सिअस तापमानात ठेवावे लागत असल्याने विकसनशील देशात त्यांचे वितरण करताना अडचणी येतील.
4. ‘अॅस्ट्रा झेनेका’ने मात्र वेगळा मार्ग अनुसरला आहे. एमआरएनएऐवजी वेगळ्या तंत्राने तयार झालेल्या या लसीची परिणामकारकता ७०% असल्याचे सिद्ध झाले आहे. (फायझर आणि मॉडेर्नाच्या लसींची परिणामकारकता अनुक्रमे ९४ व ९५% आहे). एवढी परिणामकारकता कोविडचा फैलाव रोखण्यास पुरेशी आहे.
5. जगभरातील अनेक औषधनिर्मिती कंपन्या एकत्र एकाच वेळी एकाच लसीचे उत्पादन करत असल्याचे अभूतपूर्व चित्र आज दिसते आहे. औषध अगर लसनिर्मिती हा किचकट उद्योग! त्यात गुंतवणूक प्रचंड आणि अपयशाच्या मोठ्या शक्यतेमुळे नुकसानीची धास्तीही मोठी! शिवाय कल्पनातीत वैज्ञानिक आव्हाने! जगभरातील संशोधकांनी एकमेकांशी समन्वय साधत ही आव्हाने पेलली आहेत आणि आर्थिक तोटा झालाच ,तर तो सोसण्यासाठी काही देशांची सरकारे आणि आमच्या फाउंडेशनसारख्या संस्था पुढे आल्या आहेत.
लसीचे १० अब्ज डोस लागतील, ते कसे तयार करणार?
1. लसीच्या एकाच डोसने काम होत असेल, तर जगाला सुरक्षित करण्यासाठी ५ अब्ज डोस लागतील. दोन डोस आवश्यक झाल्यास १० अब्ज!
2. आजमितीस जगभरातील औषधनिर्माते सामायिकपणे विविध प्रकारच्या लसींच्या ६ अब्ज डोसांचे उत्पादन वर्षाकाठी करत असतात. अत्यावश्यक अशा या लसींच्या निर्मितीला धक्का न लावता कोविड-१९ विरोधी डोस तयार करायचे असतील, तर या क्षमतेत दुपटीने किंवा तिपटीने वाढ करावी लागेल.
3. उत्पादन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आमच्या फाउंडेशनने ‘सेकंड सोर्स अॅग्रीमेंट’ नावाची प्रक्रिया राबवलेली आहे. श्रीमंत देशातील लसनिर्मात्या कंपन्यांसाठी विकसनशील देशांतील लस-उत्पादक जोडीदार शोधले आहेत, याच प्रक्रियेंतर्गत जगातील सर्वांत मोठी लसनिर्माती कंपनी असलेली भारतातील सीरम इन्स्टिट्यूट अॅस्ट्राझेनेकाच्या लसीचे उत्पादन करत आहे.
4. यामुळे लसीला मान्यता मिळाल्यानंतर ती मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांना त्वरेने उपलब्ध होईल. यात आमच्या फाउंडेशनने काही प्रमाणात आर्थिक धोका पत्करला आहे. त्यामुळे लसीला मान्यता मिळाली नाही तरी सीरमला एकट्याने सर्व नुकसान सोसावे लागणार नाही.
अपेक्षित तापमानात वाहतूक करून १० अब्ज डोस जगभरात कसे पोहोचवणार?
1. कोविड-१९ लसीच्या उत्पादनाबरोबरच तिचे समतोल वितरण करण्याचेही आव्हान असेल. हे उत्पादन विवक्षित तापमानातून जगभर कसे पोहोचते करता येईल, यावर शिपिंग कंपन्यांना विचार करावा लागेल.
2. देशांतर्गत वितरणाची जबाबदारी त्या-त्या देशांच्या सरकारांची असेल. श्रीमंत देशांना यासाठी गरीब राष्ट्रांची मदत करावी लागेल.
3. एकदा लस सर्वत्र उपलब्ध झाल्यावर ती घेण्यास तयार नसलेल्यांचे मतपरिवर्तन कसे करायचे हाही प्रश्न आहे.
4. अनेकांना शरीरात काही टोचूनच घ्यायचे नसते. लसीची निर्मिती घाईघाईत केल्याने ती प्रभावी नसेल, असेही समज आहेत. अनेक समाजात आधुनिक विज्ञानावर विश्वास नसतो. त्यात गैरसमज पसरवणाऱ्या खोट्या माहितीची भर पडते. हे अडथळे ओलांडावे लागतील.
5. कोविड-१९ लस अत्यंत सुरक्षित असल्याचे पटवून देण्याचे काम राजकीय नेते, विचारवंत, वैज्ञानिक आणि डॉक्टरांना करावे लागेल.
6. लस टोचणीसाठी लोक बहुसंख्येने पुढे आले, तर मग शंका घेणाऱ्यांनाही धीर येईल.
कोविडने जगाला अपयश दिले, की यशाकडे नेले?
1. आपण अपयशामुळे विचलित होता कामा नये, असे फाउंडेशनमधील सहकाऱ्यांना मी नेहमीच सांगत असतो. अपयश आले की, त्यापासून जलदगतीने काही शिकून घ्यायचे असते. कोविड-१९ वरील संभाव्य उपचारांच्या बाबतीत आम्हाला कसे अपयश आले; पण शेवटी तेही कसे ‘उत्पादक’ ठरले, याचे एक उदाहरण मी देतो.
2. गेल्या मार्च महिन्यात आम्ही मास्टरकार्ड आणि वेलकम समूहासोबत एक ‘थेराप्युटिक अॅक्सिलरेटर’ निर्माण करण्याच्या कामास लागलो. औषधनिर्मिती उद्योगाने विकसित केलेल्या यंत्रमानवाच्या साहाय्याने सध्या वापरात असलेल्या हजारो रासायनिक संयुगांचे पृथक्करण करून त्यातील एखादे संयुग कोविड-१९ वर प्रभावी ठरते का, हे आम्हाला पाहायचे होते; पण आम्हाला असे कोणतेही औषध सापडले नाही.
3. आमची निराशा झाली खरी; पण या अपयशाचा मोठा उपयोग झाला. या प्रयत्नांमुळे जगभरातील एकूण एक औषधनिर्मात्यांच्या औषधांची कोविडविषयक छाननी करण्याचे वैद्यकीय क्षेत्राचे त्रास वाचले. उपलब्ध औषधांच्या मर्यादांचा अंदाज शास्त्रज्ञांना आला व त्यांना वेगळी दिशा धरता आली.
4. कोविडवरील उपचारांकरता गतिमान चाचण्या घेण्यासाठी ‘रिकव्हरी’ नामक एक चिकित्सा यंत्रणा उभारली होती. डेक्सामिथासॉन या स्टेरॉइडच्या वापरामुळे गंभीर प्रकरणांत मृत्यू येण्याची शक्यता ३० टक्क्यांनी कमी होत असल्याचे या यंत्रणेला अवघ्या चार महिन्यांत कळले. याविषयीचा अभ्यास ज्या गतीने झाला त्यातून त्याचे अनुकरण भविष्यातही करता येईल.
5. लसीची मात्रा किती असावी याबाबतीत सध्या तरी एकमत नाही. काही उपचारांत ०.५ ग्रॅम पुरेसे ठरल्याचे सांगण्यात येते, तर काहींमध्ये ८ ग्रॅमचा वापर झालाय. ही मात्रा कमी असेल, तर अधिक लोकांना तिचा लाभ मिळेल. अशा प्रकारचे लहानसहान प्रश्न एकदाचे सोडवले की, मग लसीची उत्पादन क्षमता हाच मोठा प्रश्न शिल्लक राहील.
जलद, सुरक्षित, स्वस्त, सुलभ कोविड चाचण्यांचा परिणाम काय असेल?
1. कोविड निदान चाचण्यांबाबत तूर्तास बराच गोंधळ आहे. चाचण्यांच्या बाबतीतील विलंब हा सार्वत्रिक संतापाचा विषय आहे. तो टाळण्यासाठी जलदगती चाचण्या आणि त्वरित निकालांची यंत्रणा उभारावी लागेल.
2. कोविड नियंत्रणाच्या निमित्ताने प्रशासनाने चालवलेली सार्वत्रिक ‘टेहळणी’ हेही चिंतेचे, रागाचे कारण ठरले आहे. ही ‘टेहळणी’ असली तरी प्रत्यक्षात तो लोकांच्या खासगी जीवनातील हस्तक्षेप नसतो. एखाद्या विभागात किती रुग्ण आहेत आणि रुग्णवाढीचे प्रमाण किती आहे याचा अंदाज तज्ज्ञ अशा प्रकारच्या टेहळणीद्वारे घेत असतात. त्यांच्या अहवालानुरूप उपाययोजना करणे प्रशासनाला शक्य होते.
3. चाचणी प्रक्रियाही आता सोपी व्हायला लागली आहे. आता जी नाकाच्या शेंड्यानजीकचे नमुने घेऊन कोविडचे निदान करता येते. या पद्धतीत नाकातून खोलवर काडी घुसवण्याचा आणि संबंधिताने शिंका देत संसर्ग पसरवण्याचा धोका अजिबात नसतो. भविष्यात नाकातून घशापर्यंत काडी घुसवणारी चाचणी तर गुंडाळलेलीच दिसेल.
4. चाचण्यांद्वारे कोविडच्या प्रसाराचे मोजमाप काढणे अवघड होते, ते सहाराच्या कुशीला पसरलेल्या आफ्रिकन देशांत. अचूक चाचण्या करणे त्या देशांना परवडत नाही आणि टेहळणी करण्यासाठी लागणारी संसाधनेही नसतात. त्यामुळे थातुरमातुर माहितीच्या आधारे धोरणे आखली जातात.
5. कोविड चाचणीची जलद, सुरक्षित, स्वस्त, सुलभ पद्धत या देशांसाठी गरजेची आहे. लुमिर डिएक्स या ब्रिटिश कंपनीने सेलफोनच्या आकाराचे साधन तयार केले आहे. त्याच्या एका टोकाला कार्ड रीडर बसवलेला आहे. आरोग्यकर्मीने रुग्णाचा नमुना घेऊन तो त्या यंत्रात घालायचा, पंधरा मिनिटांत निकाल हाती येतो. मग रुग्णाची ओळख पटवणारी वैयक्तिक माहिती काढून टाकत ते यंत्र आपला अहवाल मध्यवर्ती सर्व्हरकडे पाठवते. अशी माहिती संकलित झाली की संसर्गाचा प्रत्यक्ष पाठपुरावा तज्ज्ञांना करता येतो व आवश्यक उपाययोजनाही सुचवता येते.
6. या उपकरणांचा लाभ केवळ कोविडच नव्हे, तर एचआयव्ही, क्षयरोग आणि अन्य रोगांचा प्रसार पडताळण्यातही होणार आहे.
विकसनशील देशांनी माझे अनुमान खोटे ठरवले, त्याचा आनंद
1. कमी उत्पन्न असलेल्या, गरीब देशात कोविड-१९ अधिक घातक ठरेल, असे मी म्हणालो होतो. ते अनुमान खोटे ठरले. बहुतेक आफ्रिकन देशातील संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण युरोप-अमेरिकेच्या तुलनेत कमी आहे.
2. सर्वाधिक संसर्ग अनुभवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील संसर्गाचे प्रमाण अमेरिकेशी तुलना करता ४० टक्के इतके, तर मृत्यूचे प्रमाण अमेरिकेहून अर्धे आहे.
3. काही देशांनी आधीच लॉकडाऊन केल्याचा लाभ त्यांना झाला. आफ्रिकेच्या लोकसंख्येत युवकांचे प्रमाण बरेच मोठे आहे आणि तरुणांना विषाणूची विशेष बाधा होत नाही. ग्रामीण भागातील जनता बहुतेक वेळ खुल्या वातावरणात घालवत असते ज्यात विषाणू फार काळ तग धरू शकत नाहीत.
4. कोविडच्या निरंतर पाठपुराव्यामुळे अन्य रोगांचे निदान-उपचारावर परिणाम होऊ शकतो ही माझी भीती मात्र प्रत्यक्षात उतरली आहे. आफ्रिकेतील जीवघेण्या रोगांच्या यादीत कोविडचे स्थान ३१ वे असलेले पाहून मला आश्चर्य वाटले.
5. जगभरात हे स्थान पहिल्या चारांत असून, अमेरिकेत तर कोविड हा सर्वाधिक बळी घेणारा रोग ठरलाय, तर मग आफ्रिकेतच तो पिछाडीवर का असावा?
6. अन्य रोगांच्या फैलावावर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या मनुष्यबळाचा वापर कोविडच्या पाठपुराव्यासाठी झाल्याने त्याचा परिणाम अन्य रोगांच्या माहिती- संकलनावर, उपचारांवर होतो आहे. त्यामुळे मलेरिया, क्षय व अन्य रोगांनी मान वर काढली आहे.
7. भारतात क्षय झालेल्या रुग्णांच्या निदानाचे प्रमाण एकतृतीयांशाने कमी झालेले आहे. प्रकरणे निदर्शनास येण्याचे प्रमाण जितके कमी होईल, तितके मृत्यूचे प्रमाण वाढणार आहे. म्हणूनच तर जीव वाचवणारी संसाधने गरिबातील गरीब देशांतील जनतेपर्यंत पोहोचायला हवीत.
कोविडने दिलेले धडे शिकलेले जग पुढे जाईल, तेव्हा...
1. कोविडची व्याप्ती स्पष्ट व्हायला लागली, तेव्हा मी म्हटले होते की, हे जागतिक महायुद्धच असेल, फरक इतकाच की, आपण सगळेच या युद्धांत एकाच बाजूने असू. कोविडच्या विरोधात अवघे जग एकत्र येईल, हे माझे अनुमान (काही मोजकेच अपवाद वगळता) खरे ठरल्याचा मला आनंद वाटतो.
2. जगभरातील सरकारे, कंपन्या आणि संशोधक एकदिलाने एकाच लक्ष्याच्या मागे लागल्यास काय चमत्कार घडू शकतो, हे कोविडने जगाला दाखवून दिले आहे.
3. यातून धडा घेऊन आणखीन एका मोठ्या आव्हानाला भिडण्यासाठी आश्वासक पावले आपण उचलू शकू : हे आव्हान आहे, वातावरण बदलाचे.
4. नववर्षात स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे संयुक्त राष्ट्रसंघाची वातावरण बदलावरील शिखर परिषद होणार आहे. जगभरातील मातब्बर नेते या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाने या परिषदेचे नेतृत्व करताना आपल्याकडील हरित वायूंचे प्रसारण रोखण्यासाठी पावले उचलणे अपेक्षित आहे.
येत्या वर्षात जगातील नेतेमंडळीशी संपर्क साधत कोविड आणि वातावरण बदलाविषयीची त्यांची मते जाणून घ्यायचा प्रयत्न मी करणार आहे. त्यातून सकारात्मक चर्चेला ऊर्जा मिळेल, अशी आशा मला वाटते.
आणखीन एका वर्षभरानंतर जेव्हा आपण मागे वळून पाहू, तेव्हा एक नक्की वाटेल : २०२० पेक्षा २०२१ हे वर्ष फारच सकारात्मक आणि सुहृद होते..
तुम्हाला-मला, आपल्या सर्वांना नवे वर्ष आरोग्यदायी ठरो.
----------------------
(बिल गेट्स यांनी प्रसारित केलेल्या त्यांच्या वार्षिक पत्राचा संपादित सारांश. अनुवाद - अनंत साळकर)