४० वर्षांची स्मृती - ख्याल अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 06:01 AM2021-02-07T06:01:00+5:302021-02-07T06:05:01+5:30

ख्याल गायकीचे बादशहा भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा ज्येष्ठ नातू होण्याचं भाग्य ईश्वराने मला या जन्मी दिलं. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीला माझ्या मनात दाटून आलेल्या त्यांच्या स्वर आठवणी मला तुमच्यासमोर मांडाव्यात, असं वाटतं म्हणूनच शब्दरुपाने तुमच्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न!

40 years memory of legendary classical vocalist Bhimsen Joshi | ४० वर्षांची स्मृती - ख्याल अनुभूती

४० वर्षांची स्मृती - ख्याल अनुभूती

Next
ठळक मुद्देभैरवीचे आर्त स्वर आता त्यांना खुणावू लागले होते. वारंवार येणारी प्रकृती अस्वास्थ्याची न टाळता येणारी आपदा शारीरिक दुर्बलतेत रुपांतरित होत होती. पण तेवढ्यात एका बातमीनं मनातल्या मैफलीचं सोनं झालं. ती बातमी होती भीमण्णांना, आजोबांना ‘भारतरत्न’ मिळाल्याची!

- राहुल राघवेंद्र जोशी

मैफलीचीच उपमा द्यायची म्हटलं तर माझ्या आयुष्याची मैफल सुरू झाली ती १९७१मधल्या रंगपंचमीच्या दिवशी! धीरगंभीर आवाजात भीमण्णांनी या बातमीचं स्वागत केलं. पहिला नातू होतो ना मी त्यांचा. यथोचित समारंभ होऊन माझ्या पणजोबांवर म्हणजेच मा. गुराचार्य जोशी यांच्यावर सोन्याची फुले उधळली गेली; परंतु भीमण्णा, माझे आजोबा मात्र स्वरफुलांच्या वर्षावात श्रोत्यांना न्हाऊ घालण्यात मग्न असल्यामुळे या समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत; पण ही स्वरफुले माझ्याभोवती सतत फुलत आणि दरवळत राहावी, असा ईश्वरी संकेत असल्यामुळेच की काय, मी कायमच त्यांच्या गाण्याच्या संपर्कात येत गेलो. कधी विविध ध्वनी माध्यमातून, तर कधी प्रत्यक्ष मैफलीतून. पुण्यातल्या उत्तर रात्रीपर्यंत रंगलेल्या मैफली संपवून आल्यावर ओझरत्या गाठीभेटी होत. भोवती चाहत्यांचा गराडा असे. वादक, संयोजकांच्या गर्दीतून त्यांच्या जवळ कसे जाता येईल, असे मला वाटत असतानाच पटकन कानावर शब्द येत ‘येऊ दे त्याला पुढे, नातू आहे तो माझा’. मोरपीस अंगावर फिरल्यावर जसं वाटतं तसं माझ्या बालमनाला वाटे आणि मी क्षणभर का होईना त्यांच्या सन्निध्यात असे. त्याक्षणी आणि माझ्या त्यानंतरच्या अनेक क्षणांची मैफल स्वररंगात न्हाऊन निघालेली असे.

संतवाणीचे भारलेले दिवस होते ते. घराघरात आणि मनामनात माझे आजोबा भीमण्णा पोहोचले ते या कार्यक्रमानेच. ‘संतवाणी’ तर कितीवेळा ऐकली त्याला गणतीच नाही. त्याबरोबरच आठवतो तो गीतरामायणकार बाबूजी आणि भीमण्णा यांच्या हृद्य भेटीचा पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे झालेला भावरम्य सोहळा! भव्य-दिव्य म्हणजे काय असतं ते त्या क्षणी उमजलं आणि भावलं. सांगा बरं असं भाग्य कोणाच्या वाट्याला येतं? मैफलीमध्ये विविध राग भेटू लागले, त्यांच्याशी कर्णजवळीक होऊ लागली आणि मनातली आठवणींची ही मैफल उत्तरोत्तर रंगू लागली.

बाराव्या वर्षी माझी मुंज झाली. अचानक झालेली मुंजीच्या वेळची त्यांची उपस्थिती. तसा थोडासा मोठा असलो, तरी त्यांच्या मांडीवर बसून फोटो काढून घेताना खूप छान वाटलं. सोबत आई-बाबा, दोघी आत्या, त्यांचे कुटुंबीय आणि माझी नंदम्मा आजी! मला वाटतं माझ्या बालवयातल्या त्या आठवणींच्या मैफलीतला सर्वोच्च क्षण असावा तो!

रथसप्तमीला त्यांचा वाढदिवस! न चुकता बाबांबरोबर जाणं हे ठरलेलं! त्यांच्या आणि बाबांच्या बऱ्याच अनौपचारिक गप्पा होत. मध्ये-मध्ये मीही बोलत असे, मला कन्नड येतं याचं त्यांना कौतुक वाटे. अरे ती आपली मातृभाषा आहे, बोलता आलीच पाहिजे, असे ते म्हणत. त्यांच्याशी बोलताना मला मात्र कधीच दडपण येत नसे.

शाळा-कॉलेज मीही हळूहळू मोठा होत होतो. आता मैफल उत्तरोत्तर रंगत होती, अनेक व्यवधानं होती; पण खरं आकर्षण गाण्याचं! आयुष्यातली मैफल बऱ्याच रागांनी बहरत होती. तोडी, भटियार बागेश्री, वसंत मल्हार बागेश्री आणि लांबवरून मारव्याचीही चाहुल लागत चालली होती. माझ्या शैक्षणिक, व्यावहारिक प्रगतीची खुशाली मी त्यांना सांगत होतोच. मूकपणे संमतीदर्शक मान हलवून दिलेला प्रतिसाद मी गंधारासारखा मनात साठवून ठेवत होतो.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते माझ्या विवाहाला उपस्थित राहू शकले नाहीत; परंतु ही उणीव त्यांनी माझ्या धाकट्या भावाच्या साखरपुड्यात आपल्या उपस्थितीने भरून काढली. आमच्या घरातले कौटुंबिक समारंभ उपस्थितीच्या दमदार स्वरांनी भरून काढण्यात त्यांचा हातखंडा होता आणि आम्हाला ते येतील, येणारच असा ठाम विश्वासही असायचा. त्यांचा प्रपौत्रदर्शनाचा सोहळा आमच्या ‘बागेश्री’त पार पडला, हा तर शिखराध्यायच! पण, ही कौटुंबिक भेट शेवटचीच ठरली.

भैरवीचे आर्त स्वर आता त्यांना खुणावू लागले होते. वारंवार येणारी प्रकृती अस्वास्थ्याची न टाळता येणारी आपदा शारीरिक दुर्बलतेत रुपांतरित होत होती. माझ्या मनाला आता मैफल संपत आल्याची तीव्र जाणीव होऊ लागली होती; पण तेवढ्यात एका अशा बातमीनं मनातल्या मैफलीचं सोनं झालं. ती बातमी होती भीमण्णांना, आजोबांना ‘भारतरत्न’ मिळाल्याची! आनंदाचा सर्वोच्च क्षण म्हणजे काय, याची प्रचिती मला व माझ्या पत्नीला आली. आम्ही त्यांना फोन केला तेव्हा ते म्हणाले, ‘परमेश्वरी सद्भाग्य’! सर्वोच्च नागरी सन्मानाचा असा सन्मान यापूर्वी कधीच झाला नसेल, असं तेव्हा देशवासियांना वाटलं आणि खरंच होतं ते!

पण, चांगले क्षण अल्पजीवी असतात हेच खरं. आता फार दिवसांचा भरवसा उरला नाही, हे स्वच्छ दिसत होते. अखेर २४ जानेवारी २०११ला मैफलीचे स्वर निमाले. वैकुंठावर निरोप देताना अवघं मन स्वरमय झालं होतं. जवळ जाऊन नमस्कार करताना मात्र आक्रंदत होतं.

‘‘दैहिक मैफल संपली, तरी स्वर उरले चिरंतन ।

स्मरणी सदैव तेवते माझ्या-तुमच्या आठवणींचे निरांजन।।’’

 

 

Web Title: 40 years memory of legendary classical vocalist Bhimsen Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.