जिंदगी के बाद भी.. अंत्यसंस्कारासाठी दरवर्षी कापली जातात ८० लाख झाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 06:01 AM2018-12-16T06:01:00+5:302018-12-16T06:05:02+5:30

माणसाला जगण्यासाठी झाडांची नितांत गरज, मात्र अंत्यसंस्कारासाठी दरवर्षी तब्बल ९० लाख झाडांचा बळी जातो. भारतात दरवर्षी अंदाजे ८० लाख मृत्यू होतात, त्यापैकी ४५ लाख मृतदेहांना अग्नी दिला जातो. त्यासाठी दरवर्षी सुमारे ६५ चौरस किलोमीटरचे जंगलही कापले जाते !..

80 lakh trees are cut every year for the funeral! | जिंदगी के बाद भी.. अंत्यसंस्कारासाठी दरवर्षी कापली जातात ८० लाख झाडे!

जिंदगी के बाद भी.. अंत्यसंस्कारासाठी दरवर्षी कापली जातात ८० लाख झाडे!

googlenewsNext
ठळक मुद्देअंत्यसंस्कारासाठी गॅस किंवा विद्युतदाहिनीचा उपयोग केल्यास खर्च खूपच कमी होऊन वेळही वाचतो. मृतदेहाचे ज्वलन फक्त दोन तासात होते. रक्षासुद्धा तीन किलोहून कमी होते.

- यादव तरटे पाटील

जन्म व मृत्यू हे शाश्वत सत्य. याच सत्याभोवती आपलं जीवन घुटमळत असतं. जन्म-मृत्यूमधील पोकळी म्हणजेच आयुष्य आहे. जन हा जैवविविधतेतला एक घटक आहे. जैवविविधता, जल, जंगल आणि जमीन यांचं निसर्गचक्र महत्त्वपूर्ण आहे. नैसर्गिक मृत्यू या संकल्पनेचा विचार केल्यास मृत पावलेल्या जिवाच्या विघटनाची व्यवस्था निसर्गाने केलेलीच आहे. जंगलात वाघ मरतो, तोही कुजतो, मुंगी मरते, तीही कुजतेच, त्यांच्या कुजण्याची प्रक्रिया करणारे सूक्ष्मजीव व कीटकही आहेतच. सतत मृत पावणे अन् कुजणे, कुजण्यातून वनस्पतींना ऊर्जा देणे अन् पुन्हा प्राण्यांचा जन्म होणे. जन्मानंतर जगणे अन् मरणे अशी निरंतर चालणारी ही क्रिया उत्पादक व भक्षक रूपाने आपण सहज समजू शकतो. या निसर्ग चक्रातूनच नवजीवन अस्तित्वात येते. मात्र मानववगळता इतर कोणत्याही सजीवात अंत्यविधी प्रथा अस्तित्वात नाही. मानव अधिक प्रगत होत गेला, विकसित होत गेला आणि निसर्गापासून दुरावला. पुढे संस्कृतीही विकसित होऊन परंपरा, रूढी, चालीरीती व विधी या संकल्पना अस्तित्वात आल्या. या सर्वांचे अनुकूल व प्रतिकूल परिणाम निसर्गावर होण्यास सुरुवात झाली. या सर्वांची आजवरची गोळाबेरीज केल्यास ती निसर्गाला प्रचंड हानी पोहचविणारी ठरली आहे.
प्राणवायू, पाणी आणि अन्न याशिवाय आपण जगूच शकत नाही. प्राणवायुशिवाय तीन मिनिटे, पाण्याशिवाय तीन दिवस तर अन्नाशिवाय ३० दिवस असा आजवरचा जनमानसाचा शास्रोक्त अनुभव आहे. यालाही वेगळी मानसिक व शारीरिक शक्ती लागतेच.
माणसाला जगण्यासाठी प्राणवायूची, तो निर्माण करणाऱ्या झाडांचीच आवश्यकता आहे. मात्र याच माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ९० लाख झाडांची दरवर्षी गरज भासतेय. भारतात दरवर्षी अंदाजे ८० लाख लोकांचा विविध कारणांनी मृत्यू होतो. त्यापैकी सुमारे ४५ लाख मृत मानवी जिवांना अग्नी दिला जातो. म्हणजे एकूण मृत्यूच्या ५६ टक्के मानवी मृत जिवांना अग्नी दिला जातो. यासाठी आपल्याला तब्बल ९० लाख झाडांचा बळी द्यावा लागत असल्याचे दाहक वास्तव एका अभ्यासातून आपल्या समोर आले आहे. इतकंच काय तर या अंत्यसंस्कारामुळे भारतात दरवर्षी सुमारे ६५ चौरस किलोमीटरचे जंगलही कापले जाते.
अंत्यसंस्कारासाठी एलपीजी दाहिनीचा वापर हा उत्तम पर्याय आहे. नागपुरात याचा अवलंब झाल्यामुळे गेल्या एका वर्षात तब्बल ७०० झाडांची कत्तल वाचली. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन झाडे कापावी लागतात. त्या तुलनेत एलपीजी दाहिनीत अंत्यसंस्कारासाठी केवळ एक गॅस सिलिंडरच लागते. सन २०१४मध्ये नागपुरात २०० मृतदेहांवरील अंत्यसंस्कार एलपीजी दाहिनीद्वारे करण्यात आले. म्हणूनच इतरही शहरांमध्ये आता अंत्यसंस्कारांसाठी झाडांची कत्तल नको हा आवाज उठविण्याची वेळ आली आहे.
ज्ञानेश्वर माउलींनी वृक्षाला सोयरा म्हटले आहे. विज्ञानाचा विचार करता हवेच्या शुद्धीकरणात वृक्षांचे कार्य मोलाचे आहे. वृक्षतोडीमुळे मानव स्वत:चेच अस्तित्व संपवतो आहे. जंगले नष्ट होत चालली आहेत. पशुपक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होत चालल्या आहेत. पावसाचे प्रमाण खूपच कमी होत आहे. त्यामुळे दुष्काळ पाचवीलाच पूजला आहे. शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र आजही चालू आहे. वन्यपशूंना स्वत:चा अधिवासच उरला नसल्याने ते मनुष्यवस्त्यांकडे फिरू लागले आहेत. त्यामुळे सर्वांचेच आयुष्य धोक्यात येऊ लागले आहे. स्मशानात उघड्यावर झाडांनी १५ वर्षात साठविलेला कार्बन डायआॅक्साइड अंत्यसंस्कारामुळे हवेत मिसळल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यातून तयार होणारी रक्षा २५ किलोपेक्षा जास्त असते. मृतदेह संपूर्णपणे जळण्यासाठी १८ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. रक्षा नदीत विसर्जित केल्याने नद्यासुद्धा प्रदूषित होतात. हल्ली बरेच लोक हृदय व फुप्फुसाच्या रोगाने पीडित असल्याने त्यांनाही यापासून त्रास होतो. अंत्यसंस्कारासाठी गॅस किंवा विद्युतदाहिनीचा उपयोग केल्यास खर्च खूपच कमी होऊन वेळही वाचतो. मृतदेहाचे ज्वलन फक्त दोन तासात होते. रक्षासुद्धा तीन किलोहून कमी होते. सबब नद्यांचे किंवा हवेचे प्रदूषण कमी होते. स्वच्छ वातावरणात अंत्यविधी केल्यामुळे आरोग्याचा धोका कमी होतो.
हा बदल आपल्या अस्तित्वासाठी स्वीकारणे काळाची गरज आहे. म्हणूनच आम्ही ‘जिंदगी के बाद भी...!’ हे अभियान हाती घेतोय. लॅण्डमार्क या आंतरराष्ट्रीय फोरमच्या एसइएलपीच्या संकल्पनेतून अमरावती येथील दिशा फाउण्डेशन, यूथ फॉर नेचर, निमा व वेक्सच्या सहकार्याने एक प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाली आहे. मृत्यू आपल्या हातात नाही, तो येईल तेव्हा येईल; पण शुद्ध हवा घेणे व ती जपणे आपल्या हातात आहे. म्हणून या सत्कार्यात अंत्यविधी हा गॅस दाहिनीमध्येच व्हावा ही ‘अंतिम इच्छा’ जाहीर करून हातभार लावण्याची गरज आहे.

जगण्यासाठी प्रत्येकी नऊ झाडांची गरज; उपलब्ध मात्र तिघांसाठी एकच झाड !
झाड हे अनेक सजीवांना जीवन देणार नैसर्गिक यंत्र आहे. झाडाच्या वाढी- सोबतच वातावरणातील कार्बन डायआॅक्साइडमधील कार्बन शोषून घेण्याचा, वातावरणात आॅक्सिजन सोडण्याचा वेग वाढतो. एका झाडाची पूर्ण वाढ होण्यासाठी अंदाजे २० वर्षांचा कालावधी लागतो. यात तो माणसाला जगण्यासाठी आॅक्सिजन देतो, तर मृत्यूसाठी कारणीभूत कार्बन शोषून घेतो. एका माणसाला चिताग्नी देण्यासाठी ग्रामीण भागात ३०० ते ४०० किलो तर शहरी भागात १८० ते २२० किलो लाकडाचा वापर केला जातो. ही गरज प्रत्येकी २० वर्षे वयाच्या दोन झाडांमधून पूर्ण होते. झाडांची संख्या बरीच असेल तर ही समस्या येणार नाही. मात्र आता आपल्याला प्राणवायूची कमतरता जाणवत आहे. १४० वर्षांपूर्र्वी वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण २१ टक्के होते. २०१२ मध्ये ते २०.६ टक्क्यांवर खाली आले आहे. झाडांची अशीच कत्तल होत गेल्यास हेच प्रमाण १९.५ टक्क्यांवर येईल. प्रसंगी प्राणवायूच्या अभावामुळे आपले गुदमरून मृत्यू होतील. एका माणसाला जगण्यासाठी किमान नऊ झाडांची आवश्यकता आहे. मात्र सध्या भारतात तीन माणसांमागे फक्त एकच झाड उपलब्ध आहे. झाडांच्या या कत्तली पशुपक्ष्यांच्याही मुळावर उठल्या आहेत. प्रत्येक झाडावर विविध पक्ष्यांची सरासरी दहा ते बारा घरटी असतात. एक झाड तोडल्यामुळे अंदाजे ४० ते ४५ पक्ष्यांचा अधिवास नष्ट होऊ शकतो.

दहा महिन्यांत वाचली ४२० झाडे!
नागपूरिस्थत इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनचे अध्यक्ष विजय लिमये यांनी महाराष्ट्रात या संदर्भात पाहिल्यांदा संशोधन केलंय. सन २०१४ मध्ये उपराजधानीत एकूण ११ दहन घाटापैकी अंबाझरी घाटावर विदर्भातील पिहलीच एलपीजी दहनवाहिनी सुरू करण्यात आली आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या १० महिन्यांच्या काळात २१० अंत्यविधी एलपीजी शवदाहिनीत करण्यात आले. एकूण २१० मृतदेहांवरील पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारामुळे १५ वर्षे वयाची सुमारे ४२० झाडे तुटण्यापासून वाचल्याचा दावा लिमये यांनी केला. एरवी लाकडांवर अंत्यसंस्कार करत असताना एका मृतदेहासाठी दोन झाडे कापावी लागतात. त्या तुलनेत एका मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी केवळ एक गॅस सिलिंडरच लागते. या प्रमाणात चालू वर्षी वाढ झाली असून लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे लिमये यांनी सांगितले.
- (लेखक अमरावती येथील वन्यजीव अभ्यासक आहेत.)
manthan@lokmat.com

Web Title: 80 lakh trees are cut every year for the funeral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.