९५ डिग्री सेंटिग्रेड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 06:00 AM2021-07-04T06:00:00+5:302021-07-04T06:00:01+5:30

आम्ही अस्वस्थ आहोत. काम करतोय; पण कोणत्याही क्षणी लक्ष उडतं. मन भरकटतं. अचानक मूड ऑफ होतो, हुरहूर वाटते. आम्हाला नेमकं होतंय तरी काय?..

95 degree Celsius! | ९५ डिग्री सेंटिग्रेड!

९५ डिग्री सेंटिग्रेड!

googlenewsNext
ठळक मुद्देआपण सध्या ९५ डिग्रीला आहोत. काही त्रासदायक घटना घडली की क्षणार्धात आपल्या मनाचं संतुलन बिघडतं. आपल्या तापाचा पारा ९५ डिग्रीपासून १०० पर्यंत पोहोचतो..

- डॉ. राजेंद्र बर्वे

‘मी असा नव्हतो हो पूर्वी. वृत्ती शांत असायची. आता सगळंच बिघडलंय. काय बिघडलंय तेच कळत नाही. सगळंच बिघडलंय एवढं मात्र खरं. तसं बघाल तर सगळ्या टेस्ट झाल्या, सगळ्याच्या सगळ्या निगेटिव्ह! कोविडचीही निगेटिव्ह!’

‘खरंय हो, यांचं म्हणणं. अलीकडे पाहा, जरा खुट्ट वाजलं की झालं यांचं सुरू! मला हेच होतंय, तेच होतंय’..

‘तुझंपण तसंच आहे.’ श्रीयुत म्हणाले. आईबाबांचं बघून मोठा मुलगा म्हणाला, ‘आमचंही तसंच झालंय.’

‘मलापण भीती वाटते.’ - हे सर्वात धाकटं अपत्य. वय वर्षे ६. मोठा मुलगा दहा वर्षांचा. श्री आणि सौ यांची वयं अपक्षेप्रमाणे ४० आणि ३६.

‘आणखी कुणी आहे का कुटुंबात?’ म्हणजे आई, पप्पा आहेत. शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहातात. त्यांच्याकडे आम्हाला जाऊच देत नाही. अपत्य दहा आणि सहा एकदम म्हणाले. ‘त्यांना कशाला उगाच त्रास. त्यांनापण काही तरी होतं!’ श्री आणि सौ एका सुरात. तपासणीचे प्रश्न थांबले. कारण आणखी बरीच चुलत, मामे, आते-मावस भावंडं जवळपास राहात होती. ‘सगळ्यांना तसंच काही तरी होतंय!’, असं समजलं असतं.

आम्हाला होतंय तरी काय? अस्वस्थ आहोत. काम करतोय; पण कोणत्याही क्षणी लक्ष उडतं. गप्पा मारता मारता. अचानक एखादा विचार असतो आणि मन भरकटायला विलंब लागत नाही. एके जागी बसलं तर काही तरी विचारांनी मूड ऑफ होतो. हसता खेळता. अचानक हुरहूर वाटते. प्रश्न एकच, होतंय तरी काय?

९५ डिग्री सेंटिग्रेड ! तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ऐकून ते चौकोनी कुटुंब बुचकळ्यात पडलं. होय, तुमचं तापमान ९५ डिग्री सेंटिग्रेड आहे. केवळ तुमचंच नाही तर जगाचंच तापमान असं ९०-९२-९५ आहे!

‘नाही, नाही, मी ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलत नाहीये. मनाच्या अवस्थेसंबंधात हे विधान करतोय. आता, जरासा विसावा घ्या, म्हणजे ‘पॉज’चं बटण दाबू. ९५ डिग्री तापमानाची भानगड समजून घेऊ. आधी थोडं विज्ञान, मग शरीरविज्ञान.

‘पण त्यावर उपाय सुचवाल ना?’

चौकोनी कुटुंबानं कोरसमध्ये विचारलं. पदार्थविज्ञानानं सिद्ध केलंय की पाणी १०० डिग्रीला उकळू लागतं. शालेय भाषेत सांगायचं तर पाण्याचा उत्कलन बिंदू १००. आपण विस्तवावर पातेल्यात पाणी घालून उकळवायला ठेवलं तर पाण्याचं तापमान हळूहळू वाढत जातं; पण तेव्हा पाणी उकळत नसतं. उकळायला आलेलं असतं. म्हणजे अगदी ९५-९९ झाले तरी उकळत नाही. आता विचार करा. आपण सर्वसामान्य तापमानाला (रूम टेम्परेचर) पाणी ठेवलं तर त्याचं तापमान वाढत वाढत जाईल आणि १००ला पोहोचेल, त्याला काही अवधी लागेल. चौकोनी कुटुंबानं मान डोलावली.

पण समजा, आपण अगदी कढत म्हणजे ९५ डिग्रीचंच पाणी तापत ठेवलं तर? - ‘लगेच, उकळायला लागेल. त्याला वेळच लागणार नाही.’ - दहा वर्षांचं अपत्य. ‘हुशार आहे आमचा मुलगा.’ श्री व सौ हसत म्हणाले.

आपण सध्या अशा ९५ डिग्रीला आहोत. काही होत नाहीये; पण एखादी बातमी वाचली, कोणाकडचं काही बरंवाईट वृत्त ऐकलं, कधी नोकरीवर तर कधी घरात काही तरी किरकोळ बिघडलं, काही नाही तर एखाद्या अगदी जुन्या त्रासदायक असंबद्ध घटनेची आठवण आली की क्षणार्धात आपल्या मनाचं संतुलन बिघडतं. अगदी ‘हां’ हां’ न म्हणता संतुलन ढासळतं. म्हणजेच आपण ९५ डिग्रीतून १०० पर्यंत पोहोचतो. चिंता, भयग्रस्तता, भयगंड, निराशा, बेचैनी, चलबिचल होणं. दिङ‌्मुढ होणं, जीव कासावीस होणं, हतबुद्ध, हतबल वाटणं यातलं काही तरी होऊ लागतं. कारण त्या मानसिक अवस्थेपासून आपण काही अंशानंच दूर असतो; पण याचा शरीरविज्ञानाशी काय संबंध? श्रीयुत म्हणाले.

असं आहे की आपल्या मेंदूमध्ये भावनिक संतुलन राखणारे पेशीजाल असतात. ते अतिशय तत्परतेनं रिॲक्ट करतात. म्हणजे जीवसंरक्षक अशा प्रतिक्रिया देतात. संकटप्रसंगी अगदी क्षणार्धात फाइट किंवा फ्लाइट अशी प्रतिक्रिया देतात. म्हणजे एखाद्या संकटाला सामोरं जाऊन स्वत:ला वाचवाचंय की यशस्वी माघार घेऊन काढता पाय घ्यायचा, अशा प्रतिक्रिया आपलं भावनिक मन देतं.

‘बरं मग?’ सौ उद‌्गारल्या. संकट दूर झालं की आपोआपच आपलं मन त्या प्रतिक्रिया मागे घेतं आणि पूर्वपदाला येतं. हे सगळं आपोआप घडतं. निसर्गाची किमया म्हणायला हवी.

‘पण अजून कोरोनाचं संकट टळलेलं नाही. त्यामुळे आपलं मन अजूनही त्याच प्रतिक्रिया देत आहेत.’ श्रीयुत म्हणाले. कोरोनाचं संभाव्य संकट आता वातावरणातून मनात घुसलंय. त्यामुळे मन सदैव अस्थिर राहातं आहे आणि जराजरी एखादी बातमी ऐकली की.. ९५ पासून मनाचं तापमान १००वर जातं आणि आपलं संतुलन जातं. ‘आपला संतुलन बिंदूच डळमळीत झालाय असंच ना !!’, चुणचुणीत मुलगा म्हणाला.

‘आता कळलं खरंच ९५ डिग्री हे तुमचं निदान अचूक आहे’, सौ म्हणाल्या. थोडावेळ सगळेच थांबले. त्यांचं मन ही संकल्पना पचवत होतं. मग हळूच सगळ्यात धाकट्यानं विचारलं ‘आता काय करायचं?’

‘आपण पातेल्यात गरम पाणी ठेवल्यामुळे ते पटकन उत्कलन बिंदूला पोहोचलं. पण समजा आपण बर्फाचे खडे तापत ठेवले तर?’ - मोठं अपत्य.

खूप म्हणजे खूपच वेळ लागेल! धकट्यानं हसत म्हटलं.

‘पण मनाचं काय करायचं?’ श्रीयुत म्हणाले.

‘डोक्यावर बर्फ ठेवायचा!! म्हणजे डोकं तापणारच नाही’, सौ.

‘पण प्रत्यक्ष काय करायचं?’, ते चौकटीत लिहिलंय पाहा. तुमचं तुम्हाला आपोआप कळून येईल..

‘डोक्यावर बर्फ ठेवायचा’, म्हणजे??

१) सर्वात महत्त्वाचा मुद्दा, स्वत:ची जाणीव ठेवा. अंग गरम झालंय असं वाटलं की आपण थर्मामीटर लावून बघतो. मन साशंक झालं, किंचित अस्वस्थ झालं तर म्हणा, माझिया मना जरा थांब ना! अंदाज घ्या. स्वत:शी विचार करा. नुकतीच ऐकलेली बातमी आणि अस्वस्थता यांचा संदर्भ जोडा.

२) नि:श्वास टाका. आपली अस्वस्थता कोविडमुळे नसून आपल्या मनातल्या नकोशा विचारानं आहे. या क्षणी मन भलत्या सलत्या कल्पना करतंय. ते वास्तव सोडून भरकटतंय. हे समजून नि:श्वास सोडा. आपल्याच मनाचे खेळ आहेत, असं म्हणा.

३) पुन्हा श्वास घ्या. म्हणजे विचारांना सोडून श्वासाकडे लक्ष द्या. हळूहळू श्वास घ्या. श्वासाचा आवाज होता नये.

४) ही सूचना सर्वात महत्त्वाची. श्वासापेक्षा नि:श्वास अधिक लांबवा. पूर्णपणे उच्छ‌्वास करा. अर्थात हळूहळू उच्छ‌्वास फार महत्त्वाचा. कारण त्यामुळे आपल्या मेंदूचा शरीरातल्या, पोटातल्या सगळ्या अवयवांवर ताबा येतो. आपली मज्जासंस्था ‘लय भारी’ काम करते. मेंदूची नस थेट पोटापर्यंत पोहोचलेली असते. उच्छ‌्वासामुळे ‘विसावा घ्या, संकट टळलं आहे, आपापल्या कामाला लागा, अन्न पचन करा, जीवनरस शोषून घ्या, शरीराला शक्ती द्या, झीज भरून काढा..’ असा संदेश ती देते. आपोआप देते.

५) उच्छ‌्वासावर लक्ष ठेवून पुन्हा शरीराचा आणि मनाचा अंदाज घ्या. स्वत:ची पाठ थोपटा आणि मनाचे आभार माना. आपण ताळ्यावर आलो की आपोआप आपल्या मनाचा ताप (तापमान) उतरू लागतो.

६) हे किती वेळ आणि किती वेळा करायचं? - हवं तितकं करा. मनाला आणि शरीराला सवय लावा.

७) सगळ्या कुटुंबानं एकदम सराव केला तर काय? - काही नाही, डोकं थंड झालं की आइस्क्रीम खा!!

(ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ)

drrajendrabarve@gmail.com

Web Title: 95 degree Celsius!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.