जंगल खजिन्यांचा शोध घेणारा निसर्गाचा वाटाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 06:55 AM2019-07-14T06:55:21+5:302019-07-14T07:00:09+5:30
लहानपासून मी वाढलो ते जंगलाच्या सान्निध्यात. वनखात्यातील नोकरीच्या निमित्तानं जंगलांशी आणखी जवळचा संबंध आला. जंगलाशी जडलेल्या याच नात्यातून ‘जंगल खजिन्यांचा शोध’ पुस्तकाची निर्मिती झाली. साहित्य अकादमीनंही त्यावर कौतुकाची थाप दिली.
-सलीम सरदार मुल्ला
अब्बूंच्या नोकरीमुळे माझे बालपण निसर्गरम्य अशा कोल्हापूर जिल्ह्यातल्या महागाव या छोट्याशा गावात गेले. गावाच्या भोवताली सामानगड किल्ल्याच्या डोंगररांगा दूरवर पसरल्या आहेत. फळा-फुलांनी बहरलेली झाडी, त्यात जंगली आब दाखविणारी रानटी जनावरे. या बाबींकडे निखळ नजरेने पाहत माझे बालपण सरले. ते दिवस म्हणजे मोराच्या डौलदार पिसा-यातून एकेक सुंदर पंख शरद ऋतूत गळून जावेत असेच होते..! कालांतराने जंगलातील त्या मनोहर आठवणी लुप्त होत असल्याची जाणीव होऊ लागली. मग मी या सर्व आठवणी अक्षर रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आणि लिहिता झालो. हे लिखाण ‘लोकमत’सह विविध दैनिके, मासिकांमध्ये प्रकाशित होऊ लागले. नंतर कोठून तरी कळले की, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने पुस्तक प्रकाशनासाठी अनुदान मिळते. मग ठरलं पुस्तक लिहायचं. सन 2000 साली ‘अवलिया’ हा ललित लेखसंग्रह प्रकाशित झाला. याला मंडळाचे अनुदान मिळाले. यातून पुस्तक लिहिण्याची ऊर्मी वाढत गेली अन् साहित्य अकादमी पुरस्कृत ‘जंगल खजिन्यांचा शोध’ची निर्मिती झाली.
वडील शिक्षक असले तरी त्यांना साहित्याची खूप आवड आहे. त्यांचे साहित्यिक मित्रही आहेत. त्यांचे कागल तुलाक्यातील मुरगूडचे मित्र विठ्ठल सुतार हे कधी कधी आमच्या घरी यायचे. ते आम्हा भावंडांच्या अभ्यासाविषयी विचारपूस करून निसर्गाविषयी गूढ गोष्टी सांगायचे व बालसाहित्याची पुस्तके भेट द्यायचे. त्यांच्याकडून मिळालेली पुस्तके वाचून काढली. साहित्यिक डी.ए. कोठारी आमच्या शाळेत येऊन बिरबलाच्या कथा सांगायचे. कथा ऐकल्यानंतर मलाही वाटायचं, असं काहीतरी आपण केलं पाहिजे. त्यामुळे शाळेत येणार्या बालसाहित्यिकांचा पत्ता घेऊन मी त्यांना पत्र पाठवत असे. त्याचबरोबर पुस्तके वाचून झाल्यानंतर संबंधित लेखकांना पत्रही पाठवत असे. यातून माझी साहित्य क्षेत्राकडे ओढ निर्माण झाली. काही बालसाहित्यिक उत्तरादाखल पत्रेही पाठवत असत. वाचून मन प्रसन्न व्हायचं. हरखून जाऊन मित्रांबरोबरच शिक्षकांनाही ही पत्रे दाखवायचो. शिक्षक ते पत्र शाळेत वाचून दाखवायला सांगायचे आणि माझ्या पाठीवर सर्वांची कौतुकाची थाप पडायची. अशाप्रकारे माझे साहित्यविश्वातले बालपण गेले.
माझे आजोळ उत्तूर (ता. आजरा). त्याकाळी मोबाइल, टीव्हीचा जमाना नसल्यामुळे आम्ही बच्चेकंपनी निसर्गात भरपूर वेळ घालवायचो. कळतं वय असल्यामुळे परिसरातील दगड-गोटे, झाडे-फुले-फळे यांना निरखून पाहायचो. नदीला पहिलं पाणी आलं की किनार्यावर बसायचो. अन् प्रवाहाविरुद्ध उड्या घेणारे मासे मोजायचो. नदी आटली की, रंगीबेरंगी गोट्या गोळा करायचो. त्याचा रंग जमा करायचो. या सर्व गमती-जमतीमुळेच निसर्ग आणि मी यातले नाते अधिकच दृढ अन् कणखर होत गेले. आजही प्रत्येक ऋतूचा फेरा पाहताना मी माझे अस्तित्व हरवून बसतो. निसर्गरूपाच्या वैविध्यातील बारकावे शोधत बसतो.
2005 पर्यंतचा माझा काळ अगदी खडतर गेला. मिरज (जि. सांगली) येथील गव्हन्र्मेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअर या पदविका अभ्यासक्रमसाठी प्रवेश घेतला; पण त्रिकोण-चौकोनात माझे मन रमेना. दोनवेळा नापास झालो. नोकरीची गरज लक्षात घेता पुन्हा जोमाने अभ्यास सुरू केला आणि कसाबसा एकदाचा इंजिनिअर झालो. यानंतर नोकरीसाठी कोल्हापुरात आलो. बिल्डिंग क्षेत्रातील छोटी छोटी कामे करू लागलो; पण जीवनाचा खरा आनंद लुप्त होतोय की काय, याची चिंता वाटू लागली. ही चिंता दूर करण्यासाठी कोल्हापूर येथील दळवीज् आर्टस्मध्ये इंटेरिअर डिझायनिंगला प्रवेश घेतला. येथे मात्र कलेला, सृजनशीलतेला वाव मिळू लागला. विशेष आवड निर्माण झाल्याने इंटेरिअर डिझायनिंगचा कोर्स विशेष प्रावीण्यासह पूर्ण केला. यातून एक नवी संधी मिळाली. ती म्हणजे संस्थेच्या प्राचार्य अंजली भोसले यांनी मला तेथेच इंटेरिअर डिझाईनला पार्टटाइम टीचर म्हणून शिकविण्याची संधी दिली. तिथल्या रंग, रेषा भारावून टाकणा-या असायच्या. 1996 ते 2005 या काळात दळवीज् आर्टस्मध्ये पार्टटाइम शिक्षक आणि शहरातील बंगल्यांच्या डेकोरेशनची कामे करीत घरखर्च भागवू लागलो. दिग्दर्शक भास्कर जाधव, लेखिका शोभा राऊत यांच्यासारख्या मोठय़ा लोकांच्या घरांचे डेकोरेशन केले. त्यांच्या सहवासातून साहित्यक्षेत्र वृद्धिंगत होत गेले. 2000 साली लग्न झाल्यामुळे घरखर्च वाढू लागला. मिळकत आणि खर्च यांचा मेळ बसेना. यावर उपाय म्हणजे सरकारी नोकरी. त्यासाठी प्रयत्न सुरू केले. 2005 मध्ये वनखात्यात वन्यजीवरक्षकाची जाहिरात आली. ती पाहून आनंद झाला. तयारीही पुरेपूर केली. बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले होते, तसेच नाना-नानी, मामा यांच्याकडून निसर्गसंस्कारही मिळाले होते. जंगलातील पशू-पक्षी, झाडे-फुलांची व्यापक माहिती असल्याकारणाने माझी या क्षेत्रातील आवड, तळमळ बघून अधिकार्यांनी माझी वन्यजीवरक्षकपदी निवड केली. इथून परत एकदा आयुष्याला कलाटणी मिळाली. निसर्गाच्या सान्निध्यात आल्याचा खूप आनंद झाला. तब्बल 12 वर्षांच्या कालखंडात जंगलातली नोकरी सांभाळत पशू-पक्षी, झाडेझुडपे, फळा-फुळांचा आस्वाद घेऊ लागलो. जंगलातल्या या खजिन्यांमुळे नावीन्य सापडत गेले, तसा आणखी रस वाढला. भीती, काट्याकुट्याची तमा न बाळगता माहितीचा खजिना एकत्र करून तो पुस्तकरूपात मांडला. याच खजिन्याने मला देशातल्या मानाच्या पुरस्कारापर्यंत पोहोचविले, याचा सुखद आनंद आहे.
सतत निसर्गाच्या सान्निध्यात राहून मी लिहीत गेलो. वाचकांच्या ते पसंतीस पडत गेले. त्यांच्या प्रतिक्रिया माझ्या प्रोत्साहनात भर टाकत होत्या. माझ्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा ‘बालसाहित्य पुरस्कार’ मिळाला, यात चाहत्यांचा वाटाही खूप मोठा आहे. या पुरस्कारामुळे निसर्ग संरक्षण व संवर्धन कामात माझा कणभर तरी हातभार आहे, ही कर्तव्याशी जुळलेली भावना वृद्धिंगत झाली.
‘जंगल खजिन्याचा शोध या पुस्तकात जेबू व त्याच्या पाच मित्रांची साहसी कथा मी चितारली आहे. सुटीच्या काळात ते जंगल भ्रमंतीसाठी जातात त्यावेळी विविध झाडा-फुलांचे, प्राण्यांचे बारकाईने निरीक्षण करून त्यांच्या नोंदी करतात. यावेळी त्यांच्या लक्षात येते की, मौल्यवान अशा औषधी वनस्पतींचे कंद व मुळ्या कोणीतरी चोरून नेत आहेत. याचे रहस्य ते शोधून काढतात व वनस्पतींची तस्करी करणारी टोळी पकडून देतात. यामुळे त्या मुलांना गावात, शाळेत व वनखात्यामार्फत शाबासकी दिली जाते.
निसर्गाच्या सान्निध्यात अशीच कौतुकाची थाप मिळत असल्याने लिहिण्याची प्रेरणा मिळते.
शब्दांकन - डॉ. प्रकाश मुंज
‘जंगल खजिन्याचा शोध’ : सलीम सरदार मुल्ला
दर्या प्रकाशन