सिद्धता सुसज्जता

By admin | Published: October 11, 2014 07:22 PM2014-10-11T19:22:56+5:302014-10-11T19:22:56+5:30

भारताचे सार्मथ्य आहे ते त्रिशक्तीमध्ये. ही त्रिशक्ती अर्थातच पायदळ, हवाईदल आणि नौदल. त्यांच्या सशस्त्र सार्मथ्यावरच आपली सारी मदार आहे. डिफेन्स करस्पॉन्डन्स कोर्सच्या निमित्ताने या तिन्ही दलांना जवळून पाहता आले आणि ते सार्मथ्य अनुभवता आले.

Accuracy Fitness | सिद्धता सुसज्जता

सिद्धता सुसज्जता

Next

- राहुल कलाल

 
भारताने गेल्या काही वर्षांत आपल्या संरक्षण सिद्धतेमध्ये मोठी वाढ केली आहे. त्यामुळे संरक्षणाची महत्त्वाची तीन अंगे असलेले पायदळ, नौदल आणि वायुसेना यांनी स्वत:च्या क्षेत्रात जागतिक स्तरावर स्वत:चा एक ठसा उमटवला आहे. भारतीय संरक्षण सिद्धतेची त्रिशक्ती असलेल्या या तिन्ही दलांना पाहण्याची संधी  संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या डिफेन्स करस्पॉन्डन्स कोर्स २0१४ मुळे (डीसीसी) मिळाली. 
जगातील दुसरे सर्वांत मोठे लष्कर, अशी भारतीय लष्कराची ओळख आहे. पंजाबच्या पठाणकोटमधील मामून मिलिटरी स्टेशनमध्ये आठवडा घालवत आम्ही पायदळ लष्कराची ताकद जवळून जाणली. आपल्या देशाची सीमा सहा देशांशी जोडल्या असून, त्या १५ हजार १0७ किलोमीटर लांबीच्या आहेत. देशांवर होणारी आक्रमणे ही प्रामुख्याने जमीनमार्गेच होत असल्याचा इतिहास असल्याने जमिनी सीमारेषांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रामुख्याने पाकिस्तान आणि चीनबरोबरची सीमारेषा ही अनेक ठिकाणी अस्थिर आहे. या सीमांच्या रक्षणासाठी पायदळातील जवानांना आधुनिक अशा रायफल्स देण्यात आल्या आहेत. त्यात आणखी विकसित तंत्रज्ञान असलेल्या रायफल्स घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर आपली तोफखान्यांची आणि रणगाड्यांची असलेली सिद्धता पाहायला मिळाली. स्वदेशी बनावटीच्या तोफा आणि रणगाडे बनविण्यासाठी डीआरडीओचे उत्पादनही सुरू झाले आहे. ‘अर्जुन’ रणगाडा आणि लवकरच दाखल होत असलेले ‘धनुष्य’ ही तोफ हे त्याचेच द्योतक. लष्कराची स्वत:ची हेलिकॉप्टर्स आहेत. यामध्ये चिता, चेतक यांचा समावेश आहे. स्पेशल फोर्स, कॉम्बॅक्ट लॉजिस्टिक सपोर्ट सर्व्हिस, जवानांच्या आवश्यकतेनुसार कोठेही पूल बांधणे व इतर तात्पुरत्या सोयी उभारणार्‍या इंजिनिअर्सचा विभाग आदी विभाग कार्यरत आहेत. सियाचीनसारख्या अति थंड असलेल्या ठिकाणी तर राजस्थानच्या अतिउष्ण वाळवंटी भागात तर कधी घनदाट जंगले अशा प्रतिकूल परिस्थितीत जवान कसे राहतात, त्यांची मानसिक स्थिती कशी असते, याची माहिती मिळाली. जवानांची रोजची दिनचर्या कशी असते हे ‘३ मद्रास रेजिमेंट’ला भेट देऊन समजले.  
भारताच्या आकाशातील सीमांचे रक्षण करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी हवाईदल  पार पाडत आहे. जमिनी सीमारेषांच्या आधारावर आकाशातील सीमांचे हवाईदल सक्षमपणे संरक्षण करीत आहे. हरियाणाच्या सिरसा शहरातील सिरसा एअरफोर्स स्टेशनच्या भेटीतून हवाईदलाची आधुनिकता समजली. भारतीय हवाईदलाकडे २५ प्रकारची १६00 विमाने आहेत. यामध्ये ७५0 ही लढाऊ विमाने आहेत. देशाच्या हवाई संरक्षणात मिग २१, मिग २९, सुखोई, जॅग्वार, मिरास ही विमाने मोलाचे योगदान देत आहेत. या क्षमतेत आणखी वाढ करण्यासाठी पुढील १५ वर्षांचे नियोजन हवाईदलाने केले आहे. लढाऊ विमानांबरोबर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी भारतीय वायुसेनेकडे जगातील सर्वाधिक सक्षम असलेली विमाने आणि हॅलिकॉप्टर आहेत. अत्याधुनिक रडार यंत्रणा, ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम उभारणीवर हवाईदल भर देत आहे.  
भारताच्या दोन दिशांच्या सीमा या सागराने वेढलेल्या आहेत. त्यामुळे भारतात नौदलाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यामुळे सागरी सीमा, सागरी सुरक्षा यांचे महत्त्व अधोरेखित झाले. केरळच्या कोची येथील नौदलाच्या सदर्न कमांड इथे भेट दिल्यानंतर नौदल सार्मथ्याची प्रचिती आली. दहा दिवस तेथे राहून त्यांचा कारभार जवळून पाहता आला. समुद्रामध्ये सीमारेषा या धूसर असल्याने यात युद्धस्थिती निर्माण होण्याचा अधिक धोका असतो. प्रत्येक देशाच्या जमिनीपासून समुद्रात १२ नॉटिकल माईल्सपर्यंतच त्या देशाची सीमा आहे. त्यामध्ये परवानगीशिवाय कोणत्याही देशाच्या नौदलाची जहाजे प्रवेश करू शकत नाही. अरबी समुद्रातील, बंगालच्या उपसागरातील आणि हिंद महासागरातील या आपल्या सागरी सीमा अबाधित राखण्याचे काम नौदल करीत आहे. यासाठी त्यांच्या दिमतीला लढाऊ जहाजांची फौज आहे. आतापर्यंत छोट्या असलेल्या या लढाऊ जहाजांच्या ताफ्यात विक्रमादित्य ही अवाढव्य अशी एअरक्राफ्ट कॅरिअर युद्धनौका शामिल झाल्याने भारतीय नौसेनेची ताकत खूप वाढली आहे. यामुळे समुद्रामधील भारताची शक्ती वाढली आहे. याबरोबर छोट्या युद्धनौकाही कार्यरत आहेत. यात आणखी भर घालून नौदलाची क्षमता वाढविण्यासाठी पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकेची बांधणीही कोचीन शिपयार्डमध्ये केली जात आहे. जमिनीवर रनवेवर विमान उतरविणे सोपे असते; पण समुद्रात हलत्या जहाजांवर विमान, हेलिकॉप्टर  उतरविण्याची जबाबदारी नौसेनेच्या विमानचालकांकडून लीलया पेलली जात असल्याचा अनुभव आम्ही घेतला. आयएनएस सुनैना या युद्धनौकेवर पूर्ण एक दिवस राहून तेथील कॅप्टन आणि नौकेवरील जवानांचे जीवन कसे असते, याचा अनुभव घेतला. सतत समुद्रात हलणार्‍या नौकेमुळे ‘सिसीक’ म्हणजेच समुद्री आजार होण्याचा धोका अधिक असतो. पण कॅप्टन आणि त्यांचे सहकारी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवून घेत असल्याचे आम्ही पाहिले. भारतीय नौसेनेकडे पाणबुड्याही सक्षम आहेत. या पाणबुड्या चालविणारे कॅप्टन आणि जवान कोणत्या भयाण प्रतिकूल परिस्थितीत कसे काम करतात, याची अनुभूती आम्ही घेतली. देशातील सामरिक सुसज्जतेचे हे दर्शन मनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवणारे होते. 
(लेखक लोकमत पुणे आवृत्तीमध्ये 
वरिष्ठ बातमीदार आहेत.)
(समाप्त)

Web Title: Accuracy Fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.