विकासाचं चित्र आणि वास्तव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 06:00 AM2019-08-11T06:00:00+5:302019-08-11T06:00:07+5:30
जागतिकीकरणानंतर भारताची अर्थव्यवस्था ‘प्रगती’ करत असल्याचं दृश्य आपल्यासमोर ठेवलं जात होतं. पण नेमकं चित्र काय आहे, हे वाचकांसमोर ठेवण्याचा प्रय} मी ‘अनर्थ’मधून केला आहे.
- अच्युत गोडबोले
आतापर्यंत विज्ञान, तंत्नज्ञान, गणित, अर्थशास्र, मानसशास्र, साहित्य, संगीत, चित्नकला अशा वेगवेगळ्या ज्ञानशाखांवर आणि कलांवर मी मराठीत 33 एक पुस्तकं लिहिली. त्यांना वाचकांचा प्रतिसादही प्रचंड मिळाला. ‘अनेक विषय तुमच्यामुळे आम्हाला कळायला आणि आवडायला लागले, तुमच्यामुळे आमचं आयुष्य बदललं आणि जास्त समृद्ध झालं, आमचं नैराश्य गेलं, आमचं वाचन वाढलं’, अशा तर्हेचे हजारो संदेश मला सतत यायला लागले तेव्हा आपण लाखो लोकांपर्यंत जाऊन पोहोचतोय आणि कुठेतरी वाचकांच्या हृदयाला हात घालतोय, असं मला जाणवायला लागलं आणि मी लिहितच गेलो; पण एवढं असलं तरी ‘अनर्थ’ हे माझ्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे असं मी मानतो. याचं कारण मी जरी कुठलाही पक्ष आणि इझम मानत नसलो तरी त्यापलीकडे जाऊन मी या पुस्तकात आपल्या विकासनीतीवर महत्त्वाचं भाष्य केलं आहे, असं मला वाटतं.
जागतिकीकरणानंतर भारताची अर्थव्यवस्था ‘प्रगती’ करत असल्याचं दृश्य आपल्यासमोर ठेवलं जात असलं, तरी ते खूपच एकांगी चित्न होतं. एकीकडे शेतीमधली उद्ध्वस्तता आणि आरिष्ट, दुष्काळ, शेतकर्यांच्या 3.5 लाखांच्या वर आत्महत्या, गेल्या 45 वर्षांतली सर्वात जास्त म्हणजे 8.1} बेकारी, तरुणांमधली 16} बेकारी आणि प्रचंड अर्धबेकारी, कामाचे तास वाढणं आणि स्वरूप खालावणं, हंगामी कर्मचारी वाढणं (93}) आणि त्यामुळे येणारी असुरक्षितता, त्यातून प्रचंड विषमता आणि पर्यावरणाचा वेगानं होणारा र्हास हे सगळं होत असताना कॉर्पोरेट जगाचा आणि माध्यमांचा जीडीपीवाढीबद्दल आणि भारत महासत्तेकडे वाटचाल करतोय याबद्दल गर्जना होत होत्या; पण या जीडीपीवाढीमुळे जरी मध्यम आणि उच्च मध्यमवर्ग यातल्या अनेकांची आयुष्यं सुधारली असली तरी तळातल्या 60-70} लोकांच्या जीवनावर त्याचा फारसा परिणाम होत नव्हता. आणि हे जगभर चालू होतं.
विषमता तर जगभर आणि भारतातही प्रचंड वाढली होती. जगातल्या 26 लोकांकडे जगातल्या खालच्या चक्क 50} जनतेपेक्षा जास्त संपत्ती होती! क्रेडिट स्वीसच्या आकडेवारीप्रमाणे भारतात तर फक्त नऊ जणांकडे भारतातल्या तळातल्या 50} लोकांपेक्षा जास्त संपत्ती होती!! भारतातल्या 1} लोकांकडे भारतातली 57.4} संपत्ती होती आणि याउलट भारतातल्या 92} लोकांकडे सरासरी दरडोई फक्त सात लाख रुपयांपेक्षा कमी संपत्ती म्हणजे आयुष्यभराची बचत होती! हे प्रचंडच भयानक चित्न होतं.
याच काळात पर्यावरणाचा प्रश्न खूपच गंभीर होत चालला होता. रोज कुठेतरी वादळ, पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, जंगलाला आग वगैरेंच्या बातम्या यायला लागल्या. ऋतूंमधले बदलही आपल्याला जवळपास दरवर्षी मोठय़ा प्रमाणात जाणवायला लागले. भारतातली अनेक शहरं जगातल्या सगळ्यात जास्त प्रदूषित शहरांमध्ये मोडायला लागली आणि प्रदूषणामुळे लाखो लोक दरवर्षी मरायला लागले. आपल्या सतत वाढणार्या जीडीपीसाठी जगभर रोज लाखो झाडं जंगलातून तोडण्यात येत होती, शिवाय आयपीसीसीनं दिलेल्या इशार्याप्रमाणे आपण 2050 सालापर्यंत तापमानवाढ 1.50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होऊ दिली तर पृथ्वीचा विनाश जवळपास अटळ आहे. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न प्रचंडच गहन आणि पृथ्वीच्या व माणसाच्या अस्तित्वाचाच झाला होता. पण वर वर्णन केलेली परिस्थिती आणि विकासनीती यांचा खूप घनिष्ट संबंध होता.
आपल्या जीडीपीमागे सुसाट सुटलेल्या, वरच्या 15-20} लोकांकरता प्रचंड यांत्रिकीकरण वापरून फक्त शहरात किंवा काही केंद्रात चंगळवादी उत्पादनं तयार करणार्या, आणि त्यामुळे बेकारी, विषमता, प्रदूषण हे तीन राक्षस निर्माण करणार्या विकासनीतीचा आणि नवउदारमतवादी अर्थव्यवस्थेचा संबंध दाखवून देणं मला खूप गरजेचं वाटलं. म्हणून मी ‘अनर्थ’ तातडीनं लिहायचं ठरवलं. यासाठी भरपूर संशोधन करून शक्यतोवर 2017 ते 2019च्या दरम्यानची आकडेवारी मिळवून भक्कम युक्तिवादाच्या साहाय्यानं आपली सध्याची विकासनीती आपल्याला विनाशाकडे कशी घेऊन जात आहे, हे या पुस्तकात सांगितलं आहे.
अनर्थ पुस्तकाचे चार भाग केले आहेत. पहिल्या भागात जीडीपी म्हणजे काय आणि आपण काय, (चंगळवादी वस्तू) कुणासाठी (फक्त वरच्या 15-20} लोकांसाठी), कुठे (शहरात) आणि कुठलं तंत्नज्ञान (प्रचंड यांत्रिकीकरण) वापरून उत्पादन करतोय याचा विचार न करता फक्त जीडीपीवाढीमागे सुसाट धावणं म्हणजेच जीडीपीझम कसा घातक आहे, आजच्या नवउदारमतवादी अर्थव्यवस्थेत त्याशिवाय कसा पर्याय नाही आणि त्यामुळे आपण कसे विनाशाकडे चाललो आहोत हे सांगितलं आहे.
याचा अर्थ जीडीपी वाढ वाईटच आहे असं नाही. ती वाढ पाहिजेच; पण एकतर तिचा अतिरेक होतोय, ती एकांगी होतेय, त्यामध्ये विषमता आणि बेरोजगारी वाढतेय आणि त्याच्या पर्यावरणीय किमतीचा विचार आपण करत नाही आहोत हा मुद्दा आहे. याच भागाच्या सुरुवातीला भारताच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर एक प्रदीर्घ लेख आहे.
दुसर्या भागात हवामानबदलाविषयी विस्तृत स्वरूपात चर्चा आहे. हवामानबदलाचं विज्ञान, त्याचे परिणाम, त्यामागचं अर्थकारण, राजकारण आणि त्यावर नियंत्नण ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या तंत्नज्ञानाच्या आणि बाजारपेठी पद्धती निदान आत्तापर्यंत कशा अपयशी ठरल्या आहेत हेही (ग्रीन कॅपिटॅलिझम) या भागात सांगितलं आहे.
तिसर्या भागात चंगळवादाच्या वेगवेगळ्या आविष्कारांविषयी आकडेवारीसकट भाष्य केलं आहे. यात काच, कापड, कागद, प्लॅस्टिक अशा आपण रोज वापरणार्या वस्तू आणि निर्माण होणारा कचरा, त्यामुळे होणारा पर्यावरणाचा र्हास यांचा संबंध दाखवला आहे. याशिवाय याच भागात शीतपेयं, फास्ट फूड, मोटारगाड्या, सौंदर्यप्रसाधनं, कचरा, ई-वेस्ट अशी अनेक प्रकरणं आहेत.
चौथा भाग समारोपाचा आहे. आजच्या चंगळवादी संस्कृतीचे आणि समाजव्यवस्थेचे मन:स्वास्थ्यावर कसे परिणाम होतात याविषयी यात विवेचन आहे.
हे पुस्तक पृथ्वीच्या आणि माणसाच्या अस्तित्वाविषयी अत्यंत महत्त्वाचं भाष्य करत असल्यामुळे प्रत्येकानं ते वाचावं असं मला वाटतं. अर्थात, यावर वादचर्चा रंगणारच. त्या रंगाव्यात हीच अपेक्षाही आहे. माझंच सगळं बरोबर आहे आणि तेच अंतिम सत्य आहे असा माझा दावा नाही; पण आपल्याला विचार करायला लावेल असं मात्न हे विवेचन आहे असं मला वाटतं. यानिमित्तानं एकूणच समाज-अर्थरचनेविषयी, विकासनीतीविषयी, पर्यावरणाविषयी, निसर्गाविषयी, माणसाविषयी आणि स्वत:विषयी जर कुणी वेगळ्या तर्हेनं विचार करायला लागला तर मी ते या पुस्तकाचं यश मानेन.
achyut.godbole@gmail.com
अनर्थ - अच्युत गोडबोले
मनोविकास प्रकाशन