अभिनय, दिग्दर्शनातून अकोल्याचा तरुण उमटवतोय मराठी चित्रपटसृष्टीत ठसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 06:01 AM2019-02-03T06:01:01+5:302019-02-03T06:05:01+5:30

शेतकरी कुटुंबातील तरुण. तोही कट्यारसारख्या छोट्याशा गावात राहून मराठी चित्रपटसृष्टीत जाण्याचे स्वप्न पाहतो आणि आपल्या मेहनतीच्या, संघर्षाच्या जोरावर हा तरुण अभिनय, दिग्दर्शनातून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवितो आणि मराठी चित्रपटसृष्टीलाही दखल घ्यायला भाग पाडतो.

Acting, directing Akolya's youth through directorial debut! | अभिनय, दिग्दर्शनातून अकोल्याचा तरुण उमटवतोय मराठी चित्रपटसृष्टीत ठसा!

अभिनय, दिग्दर्शनातून अकोल्याचा तरुण उमटवतोय मराठी चित्रपटसृष्टीत ठसा!

Next

नितीन गव्हाळे

अशा तरुणाचे नाव आहे, मयूर नाजूकराव खराटे. अकोल्यापासून २५ किलोमीटर अंतरावर कट्यार गावातील शेतकरी कुटुंबातील हा मुलगा. वडील नाजूकराव खराटे हे बोरगाव मंजू येथे उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक. मयूरची आई प्रतिभा खराटे गृहिणी आहेत. लहानपणापासूनच मयूरला चित्रपट, नाटक पाहण्यासोबत शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची आवड होती. यातूनच त्याला शिक्षण पूर्ण करून कला क्षेत्रातच करण्याची उत्कट इच्छा झाली.
त्याने पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणासोबत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत, पुण्यात पथनाट्य, नाट्य स्पर्धा, प्रायोगिक नाटकात भूमिका करू लागला. नाटकात काम करीत असताना अधूनमधून चित्रपटाचे शुटिंग पाहण्यासाठी तो जाऊ लागला. चित्रपट निर्मितीचे ज्ञान घेऊ लागला. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने एमबीए केले. यासोबतच तो स्वत:ची कलाही जोपासत होता. दरम्यान, त्याने एस.के.बी. स्टुडिओच्या अनेक लघुपटात काम केले. ‘केश्या’ या लघुपटात सहायक दिग्दर्शनाची जबाबदारी त्याने घेतली आणि चित्रपट निर्मितीचे तंत्र तो शिकू लागला. पुढे ‘आर्त स्वर’ आणि ‘कैदखाना’ या लघुपटात त्याने मध्यवर्ती भूमिकाही साकारली. त्याचा पुणे, मुंबईचा प्रवास सुरू झाला. वेळोवेळी कष्ट घेत त्याने कला क्षेत्रात चांगल्या पद्धतीने कामे केली. शिक्षण आणि कला क्षेत्रात बॅलन्स सांभाळत त्याला ‘बॅलन्स.. होतंय ना?’ हा मराठी चित्रपट मिळाला आणि मराठी चित्रपटसृष्टीत त्याने यशस्वी पाऊल ठेवले. तरुण दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी ‘बॅलन्स..होतंय ना?’ चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. त्यातही मयूर खराटे याने सहायक दिग्दर्शनासोबत चित्रपटात भूमिकाही साकारली. मयूर आता चित्रपटसृष्टीत स्वत:च्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविण्यासाठी सिद्ध झाला आहे. येत्या काळात ‘दानव’ या मराठी चित्रपटातही तो भूमिका साकारत आहे. जिल्ह्यातील कट्यारसारख्या छोट्याशा गावातून त्याने सुरू केलेला प्रवास प्रेरणादायी आहे.

Web Title: Acting, directing Akolya's youth through directorial debut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.