अॅट्रॅक्शन की अॅडिक्शन

By admin | Published: November 14, 2014 10:23 PM2014-11-14T22:23:07+5:302014-11-14T22:23:07+5:30

आधुनिक उपकरणांचा वाढता वापर ही आता फक्त आपल्या देशाचीच नाही, तर जगाची समस्या झाली आहे.

Actions of Addiction | अॅट्रॅक्शन की अॅडिक्शन

अॅट्रॅक्शन की अॅडिक्शन

Next

 मुक्ता पुणतांबेकर 

(लेखिका मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक आहेत.) - 
आधुनिक उपकरणांचा वाढता वापर ही आता फक्त आपल्या देशाचीच नाही, तर जगाची समस्या झाली आहे. ज्या पिढीवर कोणत्याही देशाचे भवितव्य अवलंबून असते त्या युवा पिढीतील अनेकजण या उपकरणांच्या विळख्यात सापडले आहेत. स्मार्टफोन, त्यावरचे विविध अँप्लिकेशन्स, इंटरनेटवरून मिळणारे विविध अँक्सेस, व्हिडिओ गेम्स, मोबाईल गेम्स यांच्या सततच्या वापरातून ही पिढी निष्क्रिय, आळसावलेली, अंग झटकून, हातपाय हलवून कसलेही काम करण्याची इच्छा नसलेली, अशी झाली आहे. सतत स्क्रीन पाहत राहणे हाच एकमेव उद्योग ते करीत असतात. तेच त्यांचे जग झाले आहे.
 अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशन या संस्थेने स्मार्टफोन, इंटरनेट अशा आधुनिक उपकरणांच्या सततच्या वापराला व त्यातून निर्माण होणार्‍या समस्यांना इंटरनेट अँडिक्ट डिसऑर्डर असा एक आजार म्हणून मान्यता दिली आहे. हे एक प्रकारचे व्यसनच आहे, असे त्यांनी म्हटले आहे. व्यसनांचे दोन प्रकार असतात. एक आपल्या नेहमीच्या पाहण्यातला व ज्याचे दृष्य परिणाम लगेचच दिसतात ते अमली पदार्थाचे. मद्य किंवा गांजा, अफू, ड्रग्ज यांचे. दुसरा प्रकार आहे तो वर्तनात्मक व्यसनांचा. त्यात हे मोबाईल, इंटरनेट, संगणक वापराचे व्यसन येते. त्याचा दृष्य परिणाम लगेचच दिसत नाही, काही काळाने दिसतो; मात्र तो हादरवणारा असतो. एकाच वेळी शारीरिक व मानसिक अशा दोन्ही स्तरांवर हे व्यसन आघात करते. व्यक्ती चांगली दिसत असते, मात्र मनातून हरवलेली असते व शरीराने दुबळी झालेली असते. कसलेही श्रम त्यांना झेपत नाहीत.
साधारणपणे १४ ते २२ या वयोगटातील मुले या आधुनिक व्यसनाची शिकार झाली आहेत. त्यातही इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. पूर्वी आपल्याकडे या गोष्टी म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉप, इंटरनेट बर्‍यापैकी महाग होते. मात्र, आता तसे राहिलेले नाही. ते स्वस्त झाल्यामुळे अगदी सहजासहजी तो सर्वांना उपलब्ध होते. स्मार्ट फोन असेल, तर तुम्ही कुठेही, कधीही इंटरनेटचा वापर करू शकता. झोपेतून उठल्याबरोबर प्रथम फोनवरचे अपडेट पाहणारी व स्वत:ची पोस्ट अपडेट करणारी अनेक मुले आहेत. आपल्याकडेच नाही, तर सगळ्या जगात आहेत. विशेषत: अमेरिका व चीनमध्ये याचे प्रमाण फार वाढले आहे. त्यामुळे तिथे आता यासाठीची स्वतंत्र व्यसनमुक्ती केंद्रे सुरू झाली आहेत. आपल्याकडेही याचे प्रमाण लक्षणीय झाले असून, मुक्तांगणमध्ये सुरू केलेल्या या व्यसनमुक्ती केंद्रात अनेक मुले व पालक येत असतात. काहीतरी करून यांना यातून सोडवा, असाच त्यांचा आग्रह असतो.
कोणाला वाटेल एवढे काय याचे? पण तसे नाही. हा खरेच गंभीर प्रकार असून, एक प्रकारची व्यसनाधीनताच आहे. त्याचा त्रास हळूहळू दिसतो.  या साधनांच्या सततच्या वापराने मुलांचे मन व शरीरही त्याचे गुलाम होते. खाण्याकडे त्यांचे कधीही लक्ष नसते. ज्या वयात त्यांनी सकस, पोषक आहार घेतला पाहिजे, त्या वयात ते बर्गर किंवा असलेच काही प्रकार खाऊन भूक भागवतात. अनावश्यक कोल्ड्रिंक्स पीत असतात. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. सतत स्क्रीन पाहत बघत राहिल्याने डोळे खराब होतात. बहुतेक मुले एक तर अंडरवेट म्हणजे कमी वजनाची किंवा ओव्हरवेट म्हणजे जास्त वजनाची, अशी होतात. शरीर एकदा असे झाले, की त्यात फरक पाडण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. याचा नाद लागलेली मुले असे कष्ट घेऊ शकत नाहीत. त्यातून त्यांना मग लहान वयातच अनेक व्याधी जडतात. मैदानी खेळ खेळायची सवयच न राहिल्याने थोडे श्रम पडले, तरी त्यांना दम लागतो. त्यामुळे सतत पडून राहून मोबाईल किंवा इंटरनेट बघत राहणे याशिवाय दुसरा काही उद्योग ते करूच शकत नाहीत.
या झाल्या शारीरिक समस्या या इंटरनेट, स्मार्टफोन वगैरेच्या अतिरेकी वापरामुळे मानसिक समस्याही उद्भवतात. या मुलांचा प्रत्यक्ष संवाद संपतो. फेसबुक किंवा अशाच एखाद्या साईटवर त्यांना शेकडो मित्र असतील व त्यांच्याबरोबर पोस्ट टाकून ते रोज बोलतही असतील, पण त्याला संवाद म्हणता येत नाही. समोरासमोर ही मुले एखाद्या नजरेला नजर देऊन बोलायला घाबरतात. त्यांना असे थेट व्यक्त होणे जमत नाही. त्यातून ही मुले एकलकोंडी होत जातात. त्यांना पटकन नैराश्यही येते. असे नैराश्य आल्यानंतरही ते कोणाबरोबर प्रत्यक्ष संवाद करत नाहीत व त्यात गुंतत जातात. त्यांच्या अशा वागण्यामुळे सुरुवातीला मित्र तुटतात; मग नातेसंबंधातही कटुता येत जाते. ही मुले कुटुंबातही मोकळेपणाने बोलत नाहीत. त्यामुळे आईवडील, भाऊबहीण यांच्याबरोबरही त्यांचा संवाद होत नाही. सतत आपल्यातच मग्न होत राहणे हा त्यांचा स्वभावच होऊन बसतो.
इंटरनेट किंवा व्हिडिओ गेम्सच्या वाढत्या वापराचा सगळ्यात अनिष्ट परिणाम म्हणजे यामुळे स्मरणशक्तीची क्षमता कमी होत जाते. याचे कारण मेंदूला लागणारी सवय. हातात फोन व डोक्यात सतत विविध साईटचेच विचार यामुळे मेंदू दुसरा कसला विचारच करत नाही. त्याला करू दिला जात नाही. त्यामुळे त्याची स्मरणशक्ती हळूहळू कमी होऊ लागते. अभ्यास केला तरी काहीही लक्षात राहत नाही. वर्गात शिक्षक, प्राध्यापक शिकवताना काहीही समजत नाही. नंतर पुस्तके वाचली तरीही डोक्यात काही शिरत नाहीत. त्यामुळे अभ्यास होत नाही. परीक्षा देता येत नाही. सतत नापास होत गेले, की शाळेतून काढले जाते किंवा कॉलेज सोडावे लागते. त्यानंतर नैराश्य येते. मात्र, या नैराश्यातही फोनचा, इंटरनेटचा वापर सुटत नाही. अमली पदार्थाच्या व्यसनासारखेच हे एक दुष्टचक्र आहे. ते व्यसनही रुग्णाला समाजापासूनच नव्हे, तर स्वत:पासूनही तोडते व हेही व्यसन त्याचा तोच घात करते. समाजापासून तुटततुटत नंतर व्यसनांध व्यक्ती निराशेने घेरली जाते. 
यावर उपचार करणे गरजेचे असते; मात्र त्याआधी हे व्यसन आहे, हे मान्य करावे लागते. यात रुग्णाला अगदीच नैराश्य आले किंवा अशक्तपणा वगैरेसारख्या शारीरिक समस्या निर्माण झाल्या, तरच औषधे द्यावी लागतात; अन्यथा सर्व भर कौन्सिलिंग म्हणजे समुपदेशनावरच असतो. त्यातही माझा अनुभव असा आहे, की मुलांपेक्षाही त्यांच्या पालकांचेच समुपदेशन गरजेचे असते. आजकाल बर्‍याच पालकांकडून मुलांना वेळ दिला जात नाही. मुलाला एक स्वतंत्र खोली दिली, त्याला स्मार्टफोन व इंटरनेट पॅकेज घेऊन दिले, की आपण मुलाकडे किती लक्ष देतो, असे त्यांना वाटत असते. वास्तविक त्यांचे असे वागणेच त्यांच्या मुलाला व्यसनाधीनतेकडे घेऊन जाते. कोणी बोलत नाही म्हटल्यावर त्यांचा मुलगा नेटवरच रमतो व नंतर तेच त्याचे विश्‍व होऊन बसते. शालेय मुलाला फेसबुकवर अकाउंट सुरू करून देणारे अनेक पालक आहेत. बाहेर जायचे आहे म्हणून मुलाला खोलीत बंद करून जाणारेही अनेक जण आहेत. त्याच्याकडे फोन आहे, असे म्हणत ते स्वत:चे समाधान करून घेत असतात.
अमेरिका व चीनमध्ये या प्रकारच्या व्यसनमुक्ती केंद्रात मुलांना हळूहळू त्यांच्या त्या विश्‍वातून बाहेर आणले जाते. अमलीपदार्थाची सवय असलेल्या रुग्णाला ते मिळाले नाहीत की अस्वस्थ वाटायला लागते. तीच लक्षणे या व्यसनातही दिसतात. फोन मिळाला नाही की ही मुले अस्वस्थ होतात, चिडचिड करू लागतात. त्यातून त्यांना हळूहळू बाहेर काढावे लागते. यासाठी पालकांची मदत लागते. या रुग्णांबरोबर संवाद फार महत्त्वाचा असतो. त्यातही पुन्हा तो त्याच्या निकटच्यांनी केला, तर जास्त उपयोगी होतो. त्यामुळे या मुलांना फिरायला, सहलीला घेऊन जाणे, त्यांच्याबरोबर सतत बोलणे, त्यांच्या समस्या, त्यांचे एखाद्या गोष्टीबद्धलचे मत त्यांना विचारणे, त्याचा आदर करणे, या गोष्टी सातत्याने कराव्या लागतात. त्याचे दृश्य परिणाम दिसल्यानंतरही हा उपचार सतत सुरूच ठेवावा लागतो.  
हे करतानाच त्यांना फोन वगैरेच्या वापरापासून एकदम तोडायचे नसते. पालकांनी त्याची सुरुवात स्वत:पासून करायची असते. घरात इंटरनेटचा वापर किती वेळ करायचा, याचा निर्णय घ्यायला हवा. तो घेतला की मग पालकांसह घरातील सर्वच सदस्यांनी त्याचे पालन करायला हवे. स्मार्ट फोनच्या वापरासंबंधीही असेच नियम करून त्याचे पालन सर्वांनी करायला हवे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पालकांनी या मुलांना वेळ द्यायला हवा. त्यासाठी त्यांना सातत्याने बाहेर फिरायला घेऊन गेले पाहिजे. व्यायामाची आवड लावली पाहिजे. त्याचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे. घरात बसून, इंटरनेटवर गेम खेळून काहीही होणार नाही, हे त्याला समजावून सांगितले पाहिजे.
  कोणी म्हणेल की इंटरनेट, स्मार्टफोन यांसारख्या शोधांनी जग केवढे पुढे गेले आहे. त्याचा वापर नव्या पिढीने नाही करायचा, तर कोणी करायचा. हे बोलणे अर्धसत्य आहे. हे शोध चांगलेच आहेत, मात्र त्याचा अतिरेकी वापर वाईट आहे, हे म्हणणे पूर्णसत्य आहे. कशाचाही असो अतिरेक वाईटच, असे आपलीच नाही तर जगातील सर्वच देशांमधील संस्कृती सांगते. इंटरनेट किंवा कोणत्याही आधुनिक उपकरणांचा त्याला अपवाद कशासाठी आणि का करायचा?
 

Web Title: Actions of Addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.