अस्मानी संकटाला सुलतानी हातभार
By किरण अग्रवाल | Published: July 25, 2021 11:31 AM2021-07-25T11:31:01+5:302021-07-25T11:43:33+5:30
Administrative contribution to the Natural calamity : अस्मानी संकट समजून घेता यावे; पण या संकटाला साहाय्यभूत ठरणाऱ्या सुलतानी व्यवस्थांच्या दुर्लक्षाकडे कुणी लक्ष देणार आहे की नाही?
- किरण अग्रवाल
संकटे सांगून येत नसतात, त्यामुळे ऐनवेळी नुकसानीस सामोरे जावे लागणे अटळ असते; परंतु अशा अकस्मात ओढवणाऱ्या संकटाला मानवी चुकांचाही हातभार लागून गेल्याचे जेव्हा आढळून येते तेव्हा त्याबद्दल संताप व्यक्त होणे स्वाभाविक ठरते. अकोल्यात बरसलेल्या जोर‘धारे’ने जे नुकसान झाले व त्यातही वित्तहानीबरोबरच जीवितहानीही झाली, त्यामागे व्यवस्थांचे दुर्लक्ष वा बेजबाबदारीच समोर येत असल्याचे पाहता यापुढील काळात तरी त्याकडे गांभीर्याने लक्ष पुरवणे गरजेचे ठरावे.
खरिपाच्या पेरण्या आटोपल्यानंतर पावसाने काहीशी ओढ दिल्याने बळीराजाच्या डोळ्यांत तसेही पाणी आलेलेच होते, अशात तो असा काही आला व बरसून गेला की, काही ठिकाणी होत्याचेही नव्हते करून गेला. विदर्भात सर्वाधिक पाऊसअकोला जिल्ह्यात बरसला. अकोल्यासह बार्शीटाकळी, बाळापूर, पातूर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. गेल्या दहा वर्षातील हा उच्चांकी पाऊस होता, ज्यात पठार नदीच्या पुरात एक शेतकरी वाहून गेला तर दोनवाडा जवळच्या कोल्हा नाल्याला पूर आल्याने एका महिला रुग्णाला अकोल्यात हलवता न आल्याने तिचा मृत्यू झाला. जिल्ह्यात तब्बल ३३४ जनावरांच्या मृत्यूची आकडेवारीही समोर आली आहे. नदीकाठच्या शेकडो घरांमध्ये पाणी शिरले, अनेकांचा संसार वाहून गेला. शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागातही पाणी शिरल्याने रुग्णांना जीव मुठीत घेऊन रात्र काढण्याची वेळ आली. ग्रामीण भागातही पिके पाण्याखाली गेली व शेती खरडली गेली, का ओढवले हे संकट? निसर्गाच्या अवकृपेला इलाज नाही, अस्मानी संकट समजून घेता यावे; पण या संकटाला साहाय्यभूत ठरणाऱ्या सुलतानी व्यवस्थांच्या दुर्लक्षाकडे कुणी लक्ष देणार आहे की नाही?
या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत...
अकोल्यातून वाहणाऱ्या मोर्णा नदीचे पात्र दोन्ही बाजूंनी संकुचित झाले आहे. चक्क नदीपात्रात अनेकांनी आपले इमले उभारले असून पूररेषेचा कसलाही विचार न करता त्यांना बांधकाम परवानगी कुणी दिली? पालकमंत्री बच्चू कडू यांनी नुकसानीचे पंचनामे करायचे सांगत मोर्णा नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाचे आदेश दिले, पण या रुंदीकरणाऐवजी आहे ते नदीपात्र आकसायला कारणीभूत ठरलेल्यांचे काय? पावसाच्या पाण्याचा निचरा करणारे व पाणी वाहून नेणारे लहान-लहान नाले बुजवून त्यावर इमारतींचे जंगल उभे करण्याचे पातक कुणाचे? पावसाळीपूर्व कामांमधील प्राधान्याने करावयाची शहरातील नालेसफाई पूर्णांशाने झाली नाही, त्याची जबाबदारी कुणाची होती? पावसाने रौद्ररूप धारण केल्याने अकोल्यात हाहाकार उडाला असताना जिल्हा वाऱ्यावर सोडून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व महानगरपालिकेचे अधिकारी अमरावतीच्या बैठकीत गेले, यासाठी आमदार रणधीर सावरकर व गोवर्धन शर्मा आदींना ठिय्या देण्याची वेळ आली, तेव्हा या बेजबाबदारीचे काय? घरादारात, दुकानात पाणी शिरून नुकसान होत असताना आपत्ती निवारण यंत्रणा कुठे व काय करीत होती?
सारांशात, जिल्हा प्रशासन असो की, महापालिका व जिल्हा परिषदेच्या स्थानिक यंत्रणा; त्यांच्या दुर्लक्षामुळेच नदीपात्र आकुंचले. नाले बुजविले गेले व पावसाळी नाल्यांची सफाईही रखडली. त्यामुळेच पावसाचे पाणी तुंबले व हाहाकार उडाला, तेव्हा यापुढे तरी मुंबईची तुंबई होते तसे अकोल्याचे होऊ नये म्हणून सुलतानी कारभारात बदल घडून येणे अपेक्षित.