काश्मीर व अफगाणिस्तानातील गिधाडांना गडचिरोलीच्या उपाहारगृहांची ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:05 AM2019-06-16T00:05:00+5:302019-06-16T00:05:02+5:30
स्वच्छतादूत म्हणून ओळख असलेल्या गिधाडांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अन्नसाखळीतील गिधाडांचे महत्त्व ओळखून गडचिरोली वन विभागाने पुढाकार घेत सहा ठिकाणी गिधाडांसाठी उपाहारगृह सुरू केले आहे. नागरिकांमध्ये गिधाडांविषयी जनजागृती केल्याने मानवाकडून गिधाडांना होणारा त्रास संपला आहे. खाण्यासाठी मुबलक अन्न, गडचिरोलीच्या जंगलातील पोषक वातावरण यामुळे गडचिरोली जिल्ह्यात गिधाडांची संख्या २०० वर पोहोचली आहे. एवढेच नाही तर जम्मू काश्मीरमधील हिमालीयन ग्रिफन व अफगाणिस्तानातील सिनेरीअर प्रजातीचे गिधाड गडचिरोली जिल्ह्यात स्थलांतरित होऊन हिवाळ्यात आले होते. गिधाडांचे संरक्षण करणारा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख निर्माण होत आहे.
गिधाड मृत पाळीव जनावरांचे मांस भक्षण करतात. मृत जनावरांची हाडे सोडली तर सर्व मांस खाऊन नष्ट करतात. त्यामुळे कुजलेल्या मांसापासून पसरणारी रोगराई पसरण्यास आळा बसतो. गिधाड शिकार न करता केवळ मृत जनावरांच्या मांसावर उदरनिर्वाह करतात. जगात गिधाडांच्या एकूण २३ प्रजाती आहेत. त्यापैकी भारतात नऊ प्रजाती आढळून येतात. मागील ३० वर्षात गिधाडांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. २००३ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार पाळीव जनावरांना वेदना कमी करण्यासाठी डायक्लोफेनेक या औषधाचा वापर केला जात होता. सदर जनावराचे मांस खाल्यानंतर गिधाडांना विषबाधा होऊन ते मृत्यूमुखी पडत असल्याचे दिसून आले. तसेच कसायाला जनावरे विकली जात असल्याने मृत जनावरे फेकण्याचे प्रमाणही कमी झाले. परिणामी गिधाडांना अन्न मिळणे कठीण झाले. त्यामुळे ही गिधाडे नष्ट होऊ लागली. १९९० च्या दशकात ९९ टक्के गिधाडे नष्ट झाल्याची बाब जागतिकस्तरावरील वन्यजीव संघटनांच्या लक्षात आली.
गडचिरोली जिल्ह्यातही १९८० पूर्वी पांढऱ्या पाठीच्या आणि लांब चोचीच्या गिधाडांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मात्र कालांतराने गिधाडांची संख्या कमालीची घटली. १८ एप्रिल २०१० रोजी कुनघाडा वन परिक्षेत्रात सुमारे २७ गिधाडे आजारी अवस्थेत आढळून आली. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार करण्यात आले. त्यापैकी १८ गिधाडे मरण पावली. तर केवळ नऊ गिधाडे वाचली. ही घटना गिधाडांच्या संवर्धनासाठी खऱ्या अर्थ्याने मैलाचा दगड ठरली. या घटनेनंतर गडचिरोली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गिधाडांच्या संवर्धन व संरक्षणाकडे विशेष लक्ष दिले. वन विभागाने २०१० मध्ये सर्वे केला असता, जवळपास ३० गिधाडे आढळून आली. मात्र काही दिवसातच ही गिधाडे सुध्दा नष्ट होण्याचा धोका होता. त्यामुळे गडचिरोली वन विभागाने सहा ठिकाणी गिधाडांसाठी उपहारगृह सुरू केले. या ठिकाणी गावात मेलेले जनावर नेऊन टाकले जाते. जनावर टाकण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाते. गिधाडांना अन्न मिळायला लागल्याने गिधाडांची संख्या आता वाढायला सुरूवात झाली आहे. गडचिरोली वन विभागात २०० पेक्षा अधिक गिधाडे असल्याची नोंद वन विभागाने घेतली आहे. गडचिरोली, चामोर्शी तालुक्यातील झाडांवर गिधाडांचे थवे बघायला मिळत आहेत. जगाने नाकारलेल्या गिधाडांना गडचिरोली जिल्ह्याने संरक्षण देऊन संवर्धन केले आहे. या सर्व कामात गडचिरोली वन विभागाचे पूर्वीचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले, विद्यमान उपवनसंरक्षक डॉ. एस.आर. कुमारस्वामी आणि सहायक वनसंरक्षक सोनल भडके, गिधाड मित्र अजय कुकुडकर यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे.
गिधाडांचे उपाहारगृह पर्यटकांसाठी कुतूहल
गडचिरोली तालुक्यातील मारकबोडी, बोदली, वाकडी, चामोर्शी तालुक्यातील नवेगाव रै., दर्शनी चक, माल्लेरमाल या ठिकाणी गिधाडांसाठी उपहारगृह निर्माण करण्यात आले आहेत. तर इतर १० ठिकाणी प्रस्तावित आहेत. गिधाडांसाठी उपहारगृह असलेला गडचिरोली हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. १९९५ नंतर जन्मलेल्या आजच्या युवकांना गिधाड पाहण्याचे भाग्य लाभले नाही. गिधाडांसाठी तयार केलेल्या उपहारगृहावर मोठ्या प्रमाणात गिधाडे पाहायला मिळतात. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात पर्यटनासाठी किंवा इतर कामाने आलेले पर्यटक हमखास गिधाडांच्या उपहारगृहाला भेट देतात. गिधाडांचे उपहारगृह बघणे पर्यटकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. नजीकचा चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हे व्याघ्रप्रकल्प जगात प्रसिध्द आहे. तसेच गडचिरोली जिल्हा गिधाडांसाठी प्रसिध्द होत आहे. पुढील पाच वर्षात गिधाडांची संख्या एक हजारच्या वर नेण्याचा गडचिरोली वन विभागाचा मानस आहे.
२१ गिधाड मित्रांची चमू कार्यरत
गिधाडांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वन विभागाने २१ गिधाड मित्र नेमले आहेत. हरीयाणा राज्यातील पिंजोरा येथे गिधाड संरक्षण व संवर्धन केंद्र आहे. या ठिकाणी गिधाड मित्रांना जानेवारी महिन्यात गिधाड संवर्धनाविषयी प्रशिक्षण देण्यात आले. गिधाडमित्र ग्रामीण भागात जाऊन नागरिकांमध्ये जागृती करीत आहेत. तसेच आजारी गिधाड आढळून आल्यास त्याच्यावर उपचार करणे, उपहारगृहामध्ये मृत जनावर नेऊन टाकणे आदी महत्त्वाची कामे करीत आहेत. विशेष म्हणजे, ही सर्व कामे गिधाडमित्र अगदी नि:शुल्क करतात. वन विभागाच्या वतीने दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी जागतिक गिधाड जागृती दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गिधाडांबाबत जनजागृती केली जात आहे.
- दिगांबर जवादे