अफगाण उम्मीद! क्रिकेटचं तालिबान राजवटीत काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 03:52 PM2021-11-07T15:52:26+5:302021-11-07T15:52:59+5:30

‘चिकन टीम’ म्हणूनच ज्यांच्या क्रिकेटचा जन्म झाला, त्यांच्या क्रिकेटचं तालिबान राजवटीत काय होणार?

Afghan Hope! What will happen to cricket under the Taliban regime? | अफगाण उम्मीद! क्रिकेटचं तालिबान राजवटीत काय होणार?

अफगाण उम्मीद! क्रिकेटचं तालिबान राजवटीत काय होणार?

Next

- मेघना ढोके
(संपादक, लोकमत सखी डिजिटल)

करीम सादिक, जलालाबादमध्ये ते क्रिकेट अकॅडमी चालवतात. जलालाबाद हे अफगणिस्तानचं क्रिकेटकेंद्र. ३०० च्या वर मुलं या अकॅडमीत शिकत. तालिबान अफगाणिस्तानात सत्तेत परतले त्या दिवशीच करीम सादिक यांना फोन लावला. एकच प्रश्न विचारला, ‘अब आगे?’

ते शांतपणे म्हणाले, ‘लगता तो है क्रिकेट को कोई प्रॉब्लम नहीं होगा... हम होपफुल है!’
होपफुल राहण्यापलीकडे तसंही अफगाण क्रिकेट आणि सादिक यांच्या हातात काय आहे? काय होतं?

एकेकाळी ते पाकिस्तानात पेशावरजवळच्या काचा कारा रेफ्युजी कॅम्पमध्ये राहिले. तालिबान अफगाणिस्तानात पहिल्यांदा सत्तेत आले आणि तिथून जीव वाचवत माणसं पाकिस्तानात आली, त्यांपैकीच एक सादिकही. वाढत्या वयात या मुलांनी क्रिकेट आपलंसं केलं, त्याच कॅम्पमधील ताज मलिक यांनी अफगाण क्रिकेटला आणि आपण आंतरराष्ट्रीय टीम म्हणून खेळू शकतो या स्वप्नाला जन्म दिला. रेफ्युजी कॅम्पमध्ये क्रिकेट संघ बांधला. आपण एकदिवस आपल्या देशात जाऊ, आपल्या देशाचा संघ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळू हे स्वप्न त्यांनी रुजवलं. पुढे अफगाणिस्तानात करझाई सरकार आले. रेफ्युजी आपल्या देशात परतले. संघ बांधला. त्यांपैकीच एक करीम सादिक, ते स्वत:ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले; पण ती कारकिर्द अल्पायुषी ठरली.
आता काळाचं चक्र पुन्हा उलट फिरावं तसे तालिबान परतले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कार्यालयाचा तालिबानने ताबा घेतला त्या दिवशीही करीम सादिक यांच्याशी बोलणं झालं. ते सांगत होते, ‘तालिबानचा क्रिकेटला विरोध नाही, आम्हाला आडूनआडून माहिती मिळते आहे की, अफगाणिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतच राहील.. क्रिकेट नाही आता बंद होणार.. उम्मीद तो है..!’
अफगाण क्रिकेटचे जनक ताज मलिक त्याच काळात आजारी होते. त्यांना बोलवत नव्हतं. पुढे काय होणार या विषयावर फार काही बोलले नाहीतच. त्यांचं मौन जास्त भीतिदायक वाटलं होतं. मात्र आयसीसी टी टे्वण्टी वर्ल्ड कप सुरू झाला आणि त्यात अफगाण संघ उतरला.
त्यांचं राष्ट्रगीत वाजलं. कप्तान मोहंमद नबीच्या डोळ्यांत तरळलेलं पाणी साऱ्या जगानं पाहिलं. देश अस्वस्थ काळातून जात असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर तरी अफगाण क्रिकेटचं नामोनिशान असावं, टिकावं म्हणून हा संघ मैदानात उतरला. हार-जितच्या पलीकडे त्यांचं ‘तिथं’ असणंच बोलकं आहेे.

पण नव्या समाजमाध्यमी काळात माणसांना चटकन ‘हिरो’ म्हणून पेश करणारे संदेश पटकन व्हायरल होतात. अफगाण संघाला तालिबान सरकारने वाऱ्यावर सोडलं आणि हा संघ कुठल्याही स्टेट सपोर्ट, स्पॉन्सर्सशिवाय वर्ल्ड कप खेळतो आहे. कप्तान नबीने स्वत:च्या पैशातून संघ मैदानात उतरवला, स्पॉन्सर्स जमा केले असे संदेश व्हायरला झाले.

मात्र खुद्द अफगाणिस्तान क्रिकेट असोसिएशनने ट्विट करून जाहीर केलं की, सादिकी ग्रुप आमच्या संघाचे स्पॉन्सर्स आहेत. त्यांनी ४,५०,००० अमेरिकन डॉलर्सची बोली लावत स्पॉन्सर्सशिप मिळविली. नबीनेही क्रिकेट असोसिएशनला मेल करून कळवलं की, माझ्या नावाने फेक मेसेजेस फिरत आहेत.

या साऱ्या वरवरच्या ‘हिरो वर्शिपिंग’पेक्षा मोठी आहे खरंतर अफगाण क्रिकेटची गोष्ट. थरारक आणि अस्तित्वासाठी चिवट संघर्षही करणारी!

पाकिस्तानच्या रेफ्युजी कॅम्पमध्ये चिकन टीम म्हणून ज्या देशाच्या क्रिकेटचा जन्म झाला, पाकिस्तानी स्थानिक लोकांनी ‘चिकन टीम’ म्हणत त्यांची टर उडवली, त्या माणसांनी आपल्या उद्ध्वस्त देशाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर झगडणारं का असेना, पण प्रातिनिधिक रूप म्हणून क्रिकेटकडे पाहिलं.
प्रसंगी कमीपणा घेत पाकिस्तान लीगमध्ये (आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेली) खेळाडू खेळवले. राशिद खानसारखा अफगाण खेळाडू आयपीएल खेळला. भारत सरकारने अफगाण क्रिकेटला हात देत, नोएडामध्ये अफगाणी खेळाडूंना नियमित प्रशिक्षण दिलं.
अफगाणिस्तानच्या संघाला थोडं तरी गांभीर्यानं घ्यावं असं क्रिकेट जगाला वाटू लागणार तेवढ्यात तालिबान परतले.
प्रश्न होताच, की नव्या तालिबान राजवटीत अफगाण क्रिकेटचा बळी जाणार का?
त्याचं उत्तर धूसर का होईना, टी २० स्पर्धेत दिसतं आहे की, तूर्त तरी तालिबान अफगाण क्रिकेटच्या गळ्याला नख लावेल, असं वातावरण दिसत नाही.

अफगाण संघांनी दोन सामने जिंकल्यानंतर तालिबान प्रवक्ता आणि संयुक्त राष्ट्रसंघातील तालिबानचे प्रतिनिधी सुहेल शाहीन यांनी ट्विट करीत अफगाणिस्तान संघाचं अभिनंदनही केलं.

पुढे काय होणार? तालिबान देशांतर्गत क्रिकेट वाढू देईल?

त्याचं उत्तर ना अफगाण क्रिकेटकडे आहे, ना आयसीसीकडे.
आशा आणि उत्तर एकच, जे सादिक करीम सांगतात... ‘उम्मीद तो है!’
‘चिकन टीम’ म्हणूनच ज्या टीमने जन्मापासून हेटाळणी सोसली, त्यांनी उम्मीदची गोष्ट सांगू नये तर दुसरं कुणी?

आणि क्रिकेट... त्याचं तर दुसरं नावच आहे, गेम ऑफ ग्लोरिअस अन्सर्टनिटी!

meghana.dhoke@lokmat.com

Web Title: Afghan Hope! What will happen to cricket under the Taliban regime?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.