अन्नपूर्णेच्या अफगाणी लेकी

By admin | Published: June 10, 2016 03:26 PM2016-06-10T15:26:42+5:302016-06-10T15:40:39+5:30

काबुली पुलाव, पिस्त्यापासून बनवलेली खास मिठाई गुश-इ-फिल.. अशा वेगवेगळ्या पदार्थाची चव आता दिल्लीकरांच्या जिभेवर रेंगाळायला लागलीये

Afghani lekhi of Annapurna | अन्नपूर्णेच्या अफगाणी लेकी

अन्नपूर्णेच्या अफगाणी लेकी

Next
>अमृता कदम
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
 
काबुली पुलाव, गुश-इ-फिल..
अशा पदार्थाची चव आता 
दिल्लीकरांच्या जिभेवर 
रेंगाळायला लागली आहे.
या अफगाणी डिशेस कुठल्याही 
शेफ्स किचनमधून बाहेर पडत नाहीत, तर अफगाणी महिला स्वत:च त्या तयार करतात.
परिस्थितीमुळे परक्या देशात 
आश्रय घ्यावा लागलेल्या या महिलांनी उपजीविकेसाठी हा व्यवसाय सुरू केला.
दिल्लीकरांच्या तो चांगलाच 
पसंतीला उतरतोय.
 
चवीत बदल म्हणून बाहेर जेवायचं ठरवलं, तर आपण चटकन पंजाबी, मुघलाई, चायनीज, इटालियन पदार्थाचा विचार करतो. अगदीच शौकीन खाणारे असतील तर थाई, मेक्सिकन किंवा कॉण्टिनेण्टल पदार्थही आपल्या यादीत येतात. पण आवर्जून आज एखादी ‘अफगाणी’ स्पेशल डिश खाऊया, असं कोणीही म्हणत नाही. मुळात अफगाणिस्तानची स्वत:ची अशी काही खाद्यसंस्कृती असेल, हेच आपल्या खिजगणतीत नसतं. कारण आपल्याला त्या देशातल्या आक्रमकांचा इतिहास आणि सध्याचे तालिबानी वास्तव याच गोष्टींची माहिती असते. पण सध्या दिल्लीकरांची हळूहळू अफगाणी मेन्यूशीही ओळख व्हायला लागलीये. 
काबुली पुलाव, पिस्त्यापासून बनवलेली खास मिठाई गुश-इ-फिल.. अशा वेगवेगळ्या पदार्थाची चव आता दिल्लीकरांच्या जिभेवर रेंगाळायला लागलीये. हे वाचून जर दिल्लीच्या एखाद्या पॉश भागात खास अफगाणी पदार्थासाठी एखादं नवं रेस्टॉरंट सुरू झालंय का, असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण तसं काही नाहीये. या अफगाणी डिशेस कुठल्याही शेफ्स किचनमधून बाहेर पडत नाहीत, तर अफगाणिस्तानातल्या महिलांच्या हातून तयार होताहेत. ‘इल्हम’ या नावाने प्रसिद्ध होत असलेली केटरिंग सर्व्हिस सात निर्वासित अफगाणी महिला मिळून चालवत आहेत. परिस्थितीमुळे परक्या देशात आश्रय घ्यावा लागलेल्या या महिलांनी खरं तर उपजीविकेचं साधन म्हणून हा व्यवसाय सुरू केला. पण अल्पावधीतच दिल्लीच्या अनेक भागात त्यांची टेक-अवे सर्व्हिस लोकप्रिय झाल्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे.
दिल्लीतल्या जंगपुरा भागातल्या भोगल मार्केटमध्ये त्यांचा पत्ता शोधत शोधत एका गल्लीतल्या अपार्टमेंटमध्ये पोहचले. या जुन्या इमारतीतल्या छोटय़ाशा फ्लॅटमध्ये त्यांचं काम सुरू होतं. एवढय़ा उष्म्यातही नखशिखान्त पोशाख आणि काही जणींनी तर आपला चेहराही झाकलेला. दोघीजणी मिळून काबुली पुलाव बनवत होत्या. एकजण खजुराची बर्फी संपल्याचं सांगत होती. सात जणींशिवाय त्या छोटय़ाशा जागेत अजून काही जणांची गर्दी जमली होती. तोडक्या-मोडक्या हिंदीत त्या बायका सगळ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न करत होत्या. पण शेवटी त्यांचे प्रयत्न तोकडे पडत होते, तेव्हा त्यांच्या मदतीला अठरा-एकोणीस वर्षाची तरतरीत झोहान आली. बारावी झालेली ही मुलगी त्यांच्यासाठी दुभाष्याचे काम करते. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेताना जाणवलं की, हाताला असलेली चव हा त्यांच्यातला एकमेव समान धागा नाही. आयुष्यात भोगाव्या लागलेल्या दु:खानेही त्यांना एकत्र आणलं होतं. 
झया गुल ही पस्तिशी ते चाळिशीच्या दरम्यानची चार मुलांची आई. तालिबान्यांच्या हल्ल्यात नवरा गमवावा लागल्याने तिला आपला देश सोडून भारतात गेल्या सहा वर्षापासून निर्वासित म्हणून राहावं लागतंय. माहेरी अत्यंत श्रीमंती भोगलेल्या झियासाठी आता त्या दिवसांच्या आठवणीच विसावा बनल्या आहेत. फरहदचा नवरा पोलिसांत होता. तालिबानशी झालेल्या चकमकीत तो शहीद झाला. आणि फरहदवर निर्वासित होण्याची वेळ आली. सकिना (नाव बदललं आहे) ही पेशाने शिक्षिका. तिच्या नव-याचं तालिबान्यांनी अपहरण केलं. त्यानंतर ती सुरक्षेच्या कारणामुळे भारतात आली. तिचा नवरा जिवंत आहे की नाही, हेसुद्धा तिला माहीत नाही. नसीमा, झाकिया यांच्याही कहाण्या अशाच होत्या. 
दिल्लीत अफगाणिस्तानातून आलेल्या निर्वासितांची संख्या दहा हजारांपेक्षाही जास्त आहे, तर जवळपास साडेतीन हजार अफगाणी हे भारतात आश्रयाच्या प्रतीक्षेत आहेत. असुरक्षितता, हिंसाचार, अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे हे लोक आपला देश सोडून भारताकडे येतात. कारण इथल्या वातावरणाशी जुळवून घेणं त्यांना फार कठीण जात नाही. दिल्लीतल्या लाजपतनगर, जंगपुरा भागात अनेक अफगाणी लोक राहताना दिसतात. 
 
या निर्वासितांच्या पुनर्वसनाची जबाबदारी ही वठउफ ची असते. त्यांच्याकडे नोंदणी झाली, रिफ्यूजी कार्ड मिळालं की त्यांना ठरावीक भत्ता देण्यात येतो. मात्र साधारण तीन ते चार हजार रुपयांर्पयत मिळणारा हा भत्ता त्यांच्या उपजीविकेसाठी पुरेसा नसतो. त्यामुळेच त्यांच्या कौशल्याचा वापर करून त्यांचा चरितार्थ चालवण्यासाठी वठउफ ने दिल्लीतल्या ‘अॅक्सेस डेव्हलपमेण्ट’ या एनजीओची मदत घेतली. त्यांच्यासाठी नवीन कोणत्या कौशल्याचा विचार नाही का केला, असा प्रश्न या प्रकल्पाची समन्वयक अदिती सभरवालला विचारला. त्यांना कोणतीही नवीन गोष्ट शिकवण्यापेक्षा त्या काय करू शकतात याचा विचार करून त्यांना लवकरात लवकर त्यांच्या पायावर उभं करण्याची गरज होती, असं अदिती सांगत होती. 
दिल्लीतल्या छत्तरपूरजवळ बारा दिवसांचा हस्तोद्योगांचा बाजार भरतो. ‘दस्तकार बाजार’ म्हणून ओळखल्या जाणा-या बाजारात पहिल्यांदा एक फूड स्टॉल लावायचा ठरलं. जेणोकरून ही नवीन चव दिल्लीकर कशी स्वीकारतील, याचा अंदाजही घेता येईल. यातल्या प्रत्येकीची स्वत:ची अशी ‘सिग्नेचर डिश’ आहे. त्यातूनच पदार्थ ठरवले गेले आणि सर्वचजण कामाला लागले. सप्टेंबर 2015 मध्ये या महिलांनी ‘दस्तकार मेळ्या’मध्ये आपला स्टॉल लावला. लोकांना तर ही नवीन चव आवडलीच; पण या महिलांना एक महत्त्वाचा ‘ब्रेक थ्रू’ही मिळाला. पण हे सगळं इतकं सोपं होतं का? या प्रश्नाचं उत्तर अर्थातच नाही असंच आहे. ‘सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं मिळणा-या भाज्या आणि अफगाणिस्तानातल्या भाज्यांमध्ये फरक आहे. त्यामुळे आम्हाला त्याची सवय करून घ्यावी लागली’ - जिला त्यातल्या त्यात ब-यापैकी हिंदी येतं ती सकिना सांगत होती. त्याचबरोबर पदार्थ किती प्रमाणात बनवायचे याचंही गणित साधत नव्हतं. अफगाणी लोकांच्या खाण्याच्या सवयी आणि आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये बराच फरक आहे. त्यांच्याकडे मिळून रांधलं जातं आणि खूप मोठय़ा प्रमाणात जेवण बनवतात. त्यामुळे ऑर्डरपेक्षा जास्तच बनवलं जायचं आणि मग पदार्थ वाया तर जायचेच आणि पैशांचाही प्रश्न निर्माण व्हायचा. हा प्रश्न पूर्णपणो सुटला आहे, असं अदितीला अजूनही वाटत नाही. 
या सगळ्या जणी इथे रिफ्यूजी म्हणून राहतात. त्यामुळेच त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. सकिनाला तर अजूनही धमक्या येतात. तिच्या झाकलेल्या चेह-यामागचे कारण केवळ परंपरा हे नाहीये, हे तेव्हा जाणवलं. 
वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या सातजणींनी पहिल्यांदाच सुरू केलेला हा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सगळंच आलबेल चालतं असं नाही. व्यवहारात होणारी थोडीशी धुसफूस, हेवेदावेही होतात. तिला जमतीये एखादी डिश बनवायला तर मला का नाही, असाही किरकोळ वाद होतो. पण या कामातून जी ओळख, जो सन्मान मिळतोय तो त्यांना एकत्र बांधून ठेवतोय. 
‘इल्हम’ या नावाचा अर्थ काय असेल, हा विचार इल्हमबद्दल ऐकल्यापासूनच सुरू होता. सकिनाने त्याचा अर्थ प्रगती, पुढे जाणे हा असल्याचं सांगितलं. गटाला हे नावही सगळ्यांनी मिळून दिलं आहे. इल्हममुळे आमची ‘बरकत’ होतीये, हे म्हणताना या सगळ्यांच्या डोळ्यात अभिमान आणि आत्मविश्वास झळकत होता.

Web Title: Afghani lekhi of Annapurna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.