अखेर विक्रांत मोडीत

By admin | Published: October 25, 2014 01:43 PM2014-10-25T13:43:41+5:302014-10-25T13:43:41+5:30

‘विक्रांत’ मोडीत निघू नये म्हणून जनआंदोलनही झाले; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे पराक्रम गाजवलेली विक्रांत आता कायमची नाहीशी होईल हे खरे; परंतु या पराक्रमाच्या स्मृती चिरंतन जतन व्हायला नकोत का?

After all, Vikrant broke | अखेर विक्रांत मोडीत

अखेर विक्रांत मोडीत

Next

- विनायक तांबेकर 

 
भारत-पाकच्या (१९७१) युद्धात पूर्व पाकिस्तानची कोंडी करण्यापासून ते चित्तगाव, कॉक्स बाजार, खुळना इ. महत्त्वाच्या ठिकाणांवर बॉम्बिंग करण्यापर्यंतची महत्त्वाची कामगिरी आय. एन. एस. विक्रांत या आपल्या नौदलाच्या पहिल्या विमानवाहू नौकेने बजाविली. विक्रमी वेळात जगाच्या नकाशावरून पूर्व पाकिस्तान पुसून टाकण्याच्या लष्कराच्या योजनेला विक्रांतने भरपूर योगदान दिले. ते विक्रांत आता दिसणार नाही. 
विक्रांत आपण ब्रिटिश नौदलाकडून (आधीचे नाव हक्यरूलिस) ४ मार्च १९६१ रोजी विकत घेतले. त्या वेळेस भारतीय नौदलाकडे एकही एयर क्राफ्ट कॅरियर नव्हते. भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम किनार्‍याचे (सुमारे ५ हजार कि.मी.) सर्मथपणे संरक्षण करण्यास कमीत कमी दोन एयर क्राफ्ट कॅरियर्स हवीत. म्हणून त्या वेळचे पंतप्रधान पं. नेहरू यांच्या प्रयत्नांनी विक्रांत भारतीय नौदलात आले. १९६५च्या भारत-पाक युद्धात विक्रांतवरील अधिकारी आणि नौसैनिकांनी केलेल्या कामगिरीबद्दल २ महावीरचक्र आणि १२ वीरचक्र या बहाद्दरांनी मिळवली. लष्करी इतिहासात ‘न भूतो न भविष्यति’ अशी घटना १९७१ च्या युद्धात घडली. ती म्हणजे ९0 हजार पाकिस्तानी सैनिक आणि अधिकार्‍यांनी भारतीय सैन्यदलासमोर शरणागती पत्कारली.
पाकिस्तानी जनरल ए. ए. के. नियासी यांची शरणागती आपले जनरल जे. एस. अरोरा यांनी जाहीरपणे स्वीकारली. त्यानंतर हे जहाज भारतीय नौदलात सेवा बजावीत होते. परंतु, कालर्मयादा, जहाजावरील उपकरणे, इंजिन्स यांचा सेवाकालावधी याचा विचार करून ३१ जानेवारी १९९७ ला ‘विक्रांत’ नौदलातून नवृत्त झाले. आता या ७00 फूट लांब, १२८ फूट रुंद आणि एका वेळेस ११00 सैनिकांना सामावून घेणार्‍या जहाजाचे करायचे काय? जगाच्या नौदल इतिहासात अशी जहाजे लिलावाद्वारे मोडीत काढली जातात. परंतु आपल्याकडील इतिहासप्रेमी आणि जागृत लोकांनी विक्रांत मोडीत काढण्याऐवजी त्याचे संग्रहालयात रूपांतर करावे अशी मागणी केली. त्या मागणीला जन आंदोलनाचे स्वरूप आले आणि ‘विक्रांत बचाव’ मागणी जोरात पुढे आली. त्यामुळे त्या वेळेच्या महाराष्ट्र सरकारने विक्रांतवर नौदल संग्रहालय करण्याची जबाबदारी स्वीकारली. संग्रहालयात ठेवण्यास लागणार्‍या गोष्टी, वस्तू, इतिहास, छायाचित्रे इत्यादी सर्व बाबी नौदलाने पूर्ण केल्या. संग्रहालयाचा कर्मचारीवर्ग, स्वच्छता व देखभाल इ. गोष्टींची खर्चीक जबाबदारी महाराष्ट्र सरकारने स्वीकारली. विक्रांत कफ परेडजवळील समुद्रात उभे करण्यात आले होते. परंतु, भेट देणार्‍यांची सुरक्षितता हा मोठा प्रश्न होता. दर शनिवारी व रविवारी हे नौदल संग्रहालय लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध असे. परंतु, विक्रांतच्या देखभालीचा खर्च वाढतच होता. हे संग्रहालय पुढे ८ वर्षे चालू होते; परंतु विक्रांतची परिस्थिती खालावत होती. कारण आतील सर्व गोष्टी ४0-५0 वर्षांपूर्वीच्या होत्या. 
जानेवारी-फेब्रुवारी २0१३ मध्ये महाराष्ट्र शासनाने यापुढे या विक्रांत संग्रहालयावर खर्च करणे अशक्य असल्याचे कळविल्याने नौदलाच्या पश्‍चिम विभाग मुख्यालयाने (मुंबई) विक्रांत मोडीत काढण्याची शिफारस केंद्राकडे केली. केंद्राने ती मान्य केली. त्यामुळे डिसेंबर २0१३ मध्ये विक्रांतचा लिलाव करण्याचे ठरले. त्यास ‘विक्रांत बचाव’ संघटनेतर्फे किरण पैंगणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थगिती मागितली. परंतु उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली. अर्जदारांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. तोपर्यंत एका खासगी कंपनीने तब्बल ६३ कोटी रुपयांची बोली बोलून विक्रांत विकत घेतले. नंतर ते जहाज तोडणीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरातमधील अलंग येथे न्यायचे होते. परंतु कोर्टामुळे ते काम स्थगित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी विक्रांतबाबत ‘जैसे थे’ ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला. आणि नंतर दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर ‘विक्रांत वाचवा’ संघटनेची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे आता विक्रांत मोडीत निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या कंपनीने हे जहाज विकत घेतले, ते ६ सप्टेंबर २0१४ रोजी विक्रांतच्या तोडफोडीस सुरुवात करून जून २0१५ पर्यंत पूर्ण करणार होते. म्हणजेच २0१५ नंतर विक्रांत दिसणार नाही. आपणाला याचे दु:ख होईलच; परंतु नौदलाने दुसरे नवीन ‘विक्रांत’ तयार केले असून, ती अत्याधुनिक विमानवाहू नौका ‘विक्रांत’ २0१७ पर्यंत आधुनिक विमानासह भारतीय नौदलात दाखल होईल. ही आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. हे नवीन विक्रांत संपूर्ण भारतीय बनावटीचे असून, विमाने मात्र रशियाकडून घेण्यात आली आहेत. त्यामुळे ‘विक्रांत’ गेले तरी नवे ‘विक्रांत’ आहे.
आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू एकदा म्हणाले ‘‘विक्रांत इकडे आणून सोडा, आम्ही करतो त्यावर संग्रहालय’! त्यावर पुढे झाले काहीच नाही. विक्रांतच्या बाबतीत जे काही घडले ते पाहता असे घडायला नको होते इतकेच वाटते. यानिमित्ताने विशाखापट्टणम येथील आय.एन.एस. कुरसुरा या पाणबुडीवरील संग्रहालयाची आठवण आल्यावाचून राहत नाही. तेथे पाणबुडीवर संग्रहालय आहे. विक्रांत पाणबुडीच्या १0 पट मोठे आहे. येथे होऊ शकले नाही; पण पाणबुडीवर झाले का व कसे? याचा नौदलातील सेवारत व नवृत्त तज्ज्ञांनी विचार करावा. पराक्रमाच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, असा प्रयत्न तरी नक्की व्हायला हवा. 
(लेखक निवृत्त कर्नल आहेत.)

Web Title: After all, Vikrant broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.