‘पीडित आदिवासीच नक्षलवाद संपवतील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:04 AM2019-06-02T00:04:31+5:302019-06-02T00:05:54+5:30

दोन वर्षांपूर्वी गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक म्हणून पदभार घेणारे अंकुश शिंदे यांची नुकतीच सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली. या दोन वर्षाच्या काळात पोलिसांच्या आक्रमकतेने गडचिरोलीत नक्षलविरोधी अभियान चांगलेच चर्चेत राहिले. या अभियानाचे यश-अपयश, पुढील दिशा, नक्षलवाद्यांची रणनीती हाणून पाडण्यासाठी सुरू झालेले प्रयत्न यावर शिंदे यांनी ‘लोकमत’शी साधलेला संवाद.

'Aggrieved tribals will end Naxalism' | ‘पीडित आदिवासीच नक्षलवाद संपवतील’

‘पीडित आदिवासीच नक्षलवाद संपवतील’

Next

गेल्या दोन वर्षात तुम्ही नक्षल चळवळीच्या हालचाली जवळून पाहिल्या, त्यात काही बदल होत असल्याचे तुम्हाला जाणवले का?
होय, बदल नक्कीच होत आहेत. नक्षल चळवळ आकुंचन पावत आहे. आदिवासी बांधवांमधील भीतीमुळे नक्षल चळवळीविषयी उत्पन्न झालेली सहानुभूतीची भावना कमी होत आहे. आदिवासी बांधवांपर्यत शासनाबद्दल, शासनांच्या कामांबद्दलची सत्य माहिती पोहचत आहे. त्यामुळे नक्षल चळवळीपासून लोक दूर जात आहेत. परिणामी नक्षलवाद्यांना वारंवार हिंसेचा आसरा घ्यावा लागत आहे. ‘एकाला ठार करा आणि हजारोंच्या मनात भिती पसरवा’ या माओवाद्यांच्या तत्वज्ञानानुसार त्यांनी आजपर्यंत शेकडो आदिवासींचे खून केले. चालूवर्षी २०१९ मध्ये १२ निष्पाप आदिवासी बांधवांना जिवानिशी मारले आहे. आदिवासी तरुण-तरुणींना आता शिक्षणाची आस मोठ्या प्रमाणात लागली आहे. परिणामी नक्षल चळवळीमध्ये सहभागी होण्याचे त्यांचे प्रमाण शून्यावर आले आहे. नक्षल चळवळीतील हा आमुलाग्र बदल या चळवळीला अधोगतीकडे नेणारा ठरत आहे.
नक्षलवादी चळवळीत महिलांची संख्या लक्षणीय आहे, त्याचे कारण काय?
महिलांच्या मानसिकतेचा अभ्यास अनेकांनी केला आहे. त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामध्ये समर्पण, तर्कहीन आस्था जास्त असल्याचे निष्कर्ष आहेत. त्यामुळेच कदाचित या चळवळीत महिलांचे प्रमाण जास्त दिसून येते. नक्षलवाद्यांच्या सांस्कृतिक मंडळद्वारे, विविध नावांनी कार्यरत संस्थांकडून आदिवासींच्या स्थानिक भाषेत वेगवेगळे नाचगाणे, आदिवासी संस्कृतीमधील कार्यक्रम घेवून शासनविरोधाचा आभास निर्माण केला जातो. आदिवासी जनतेला सत्य परिस्थिती माहीत होवू दिली जात नाही. त्यामुळे काही तरु णी त्यांच्या कार्यक्र मातील गाणी आवडल्याने, काही नक्षलवाद्यांचा गणवेशातील रुबाब पाहून, काही तरुणी घरगुती समस्यांमुळे काही नक्षलमध्ये सामील असलेल्या युवकांच्या प्रेमात पडून चळवळीत जातात. मात्र बऱ्याच तरुणींना नक्षल दलममध्ये असलेल्या महिला जबरदस्तीने किंवा गोड बोलून चळवळीतील कामे करण्यासाठी भाग पाडतात. नंतर पोलिसांची भिती दाखवून त्यांना नक्षल दलममध्ये पूर्णपणे सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करतात. नक्षलवाद्यांच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांच्या चळवळीत सहभागी होणाऱ्यांचे प्रमाण मात्र शून्य आहे.
दोन वर्षाच्या कार्यकाळात तुम्ही कोणत्या गोष्टींवर भर दिला, त्याचा काय परिणाम झाला किंवा भविष्यात होईल?
दोन वर्षाच्या कालावधीत मुख्यत्वे आम्ही टीम बिल्डींग, तसेच टीम प्रमुख ते टीममधील सर्व सदस्यांना ध्येयाची जाणिव करुन दिली. त्यासाठी काय करणे आवश्यक आहे व तसे करणेच का गरजेचे आहे याची कल्पना दिली. त्यामुळे टीमला ध्येय व प्रेरणा मिळाली. त्यासाठी नक्षलविरोधी अभियानातील जवानांच्या प्रशिक्षणात आमुलाग्र बदल केला. त्याचबरोबर माहीती गोळा करण्याचे जाळे निर्माण करु न माहिती मिळवण्याचे तंत्र परीणामकारक केले. आक्र मक नक्षलविरोधी मोहिमा राबविल्या, ज्यात मोठे यश मिळाले. आदिवासी नागरिक आणि शासन यांच्यामध्ये नक्षलवाद्यांनी निर्माण केलेला आभास कमी करु न तो मोडीत काढण्यासाठी विविध उपक्रम राबविले. त्यात शालेय विद्यार्थी, तरुण-तरु णी, महिला व शेतकरी यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्र म राबवून त्यांना जवळ आणण्याचा मोठा प्रयत्न झाला.
नक्षलग्रस्त भागातील शाळाबाह्य मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या सशस्त्र दूरक्षेत्राच्या (आर्म्स आऊट पोस्ट) ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची केंद्रे सुरू केली. पहील्या वर्षी त्यात २००० मुलांनी सहभाग नोंदविला. त्यांची संख्या यापुढे वेगाने वाढेल. याशिवाय टेलीमेडीसिनची संकल्पना होती, ती लवकरच सुरू होत आहे. अतिदुर्गम भागातील आदीवासी नागरिकांना त्याचा लाभ मिळेल. त्यामुळे साध्यासाध्या आजारासाठी आदिवासी बांधवांची होणारी भटकंती आणि फरफट दूर होईल. एवढेच नाही तर नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील आदिवासी नागरिकांसाठी उपपोलीस स्टेशन, सशस्त्र दूरक्षेत्रांच्या ठिकाणी रेशनिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रस्ताव गडचिरोली पोलीस अधीक्षकांनी पाठविला असून त्यामुळे गरजू नागरिकांपर्यंत पारदर्शकपणे व नियमित रेशन पोहचण्यासाठी मदत होणार आहे.
अतिदुर्गम भागातील आदिवासी मुलांमधील क्रीडा गुण ओळखून त्यांचा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्याचबरोबर प्रो-कबडीसाठी या मुलांची निवड होण्यासाठी पाठपुरावा केला असून येथील मुले लवकरच प्रो-कब्बडी व प्रो-व्हॉलीबॉलमध्ये सहभागी झालेली दिसणार आहेत. अशा विविध उपक्रमांमुळे नक्षलवाद्यांनी शासन व आदिवासी नागरिक यांच्यामध्ये निर्माण केलेला दुरावा संपुष्टात येवून आदिवासी तरु ण वेगाने प्रगती करतील.
गेल्या दोन वर्षात नक्षलविरोधी अभियानाला मिळालेली मोठी उपलब्धी कोणती?
ही उपलब्धी दोन भागात विभागता येईल. त्यापैकी एक म्हणजे सशस्त्र नक्सलविरोधातील यश. गेल्या दोन वर्षात आमच्या टीमने नक्सलविरोधी मोहिमेतील तीव्रता व आक्र मकता वाढविल्याने दोन वर्षात ६४ चकमकीत ७१ नक्षलवादी ठार झाले. त्यात विशेष म्हणजे ५ वरिष्ठ कॅडरचे जहाल नक्षलवादी होते. ५५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. तसेच ४१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. माओेवाद्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई म्हणजे कसनासूर-बोरिया जंगलातील पोलिसांचे सी-६० पथक आणि नक्षलवादी यांच्यात झालेली चकमक. त्यात ४० नक्षलवादी ठार झाले. ही महाराष्ट्राच्या नक्षल चळवळीच्या इतिहासातील ऐतिहासिक कामगिरी होती.
दुसरी उपलब्ध म्हणजे जनजागृती. हे काम अजूनही सुरूच आहे. आदिवासींच्या अधोगतीस नक्षलवादीच कारणीभूत आहेत हे त्यांच्या लक्षात आल्याने आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्तपणे नक्षलवाद्यांनी उभारलेली स्मारके तोडली. त्यांनी लावलेले बॅनर्स जाळले, नक्षलविरोधी रॅली काढून निदर्शने केली. ‘आदिवासी बचाओ, नक्षल भगाओ’चे नारे दिले. हे सर्व पहिल्यांदाच उघडपणे घडले.
नक्षल चळवळ पूर्णपणे संपुष्टात आणणे शक्य आहे का? त्यासाठी काय करावे लागेल?
होय, नक्कीच शक्य आहे. नक्षलवादी हे तीन विभागात काम करतात. १) पार्टी २) फ्रंट संघटना आणि ३) गुरील्ला संघटन. आम्ही मुख्यत्वे जंगलातील सशस्त्र संघटन (गुरील्ला) विरोधात कार्यरत आहोत. त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात पूर्वी पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलेले व सध्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या काळापासून आजपर्यंत अनेक प्रकारे नक्षल चळवळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयोग करण्यात आले आहेत. त्यात नवनवीन सुधारणा सुरूच आहेत. नक्षलविरोधी अभियानात तंत्रविषयक बदलांचा उपयोग, पीडित आदिवासींना सोबत घेवून त्यांच्यात जाणीव, जागृती करून पोलीस यंत्रणेला प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून त्यांच्यासोबत सतत कार्यरत राहणेही महत्वाचे आहे. याशिवाय सध्याच्या विकास कामांचा वेगही असाच चालू ठेवल्यास येणाऱ्या काही वर्षात जंगलातील नक्षलवाद निश्चितच संपुष्टात येईल. नक्षलवादाने पीडित असलेले आदिवासीच नक्षलवाद संपवण्यासाठी पुढाकार घेतील. परंतू जसा दिवा विझण्याआगोदर जास्त फडफडतो, त्याप्रमाणे नक्षलवादीसुद्धा त्यांच्या गनिमी युद्धनितीने गंभीर घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यासाठी पोलीस यंत्रणेने अधिक सतर्क आणि आक्रमक राहणे गरजेचे आहे.

  • मनोज ताजने

Web Title: 'Aggrieved tribals will end Naxalism'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.