अजिंठा पुन्हा साकारताना...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 06:41 PM2018-02-10T18:41:16+5:302018-02-11T07:16:30+5:30
जागोजागी पोपडे निघालेले, रंग उडालेला तरीही अजिंठा चित्रशिल्पांनी आजही भारून जायला होतं. युनेस्कोच्या ‘जागतिक वारसा’ स्थळांत नोंद असली तरी येत्या शंभर वर्षांत यातलं किती शिल्लक उरणार, या प्रश्नानं मी अस्वस्थ झालो. विद्यार्थिदशेतच ठरवलं, अजिंठ्याचं वैभव पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हेच आता आपलं जीवितकार्य! २७ वर्षं झालीत या गोष्टीला. जगभरातले संदर्भ तपासले, ३५ हजार किलोमीटरचा प्रवास केला... एक चौरस इंच कामाचा खर्च १५ हजार रुपये! एकूण काम साधारण दहा लाख चौरस इंच. इतक्या वर्षांत आत्ताशी जेमतेम दीड टक्का काम झालंय!
- प्रसाद पवार
नाशिकच्या कलानिकेतन महाविद्यालयात शिकत होतो तेव्हाची, १९८९ ची गोष्ट. अजिंठा चित्रशैली अभ्यासत होतो. बौद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी फिरणाºया भिक्खूंकरिता वर्षावासाची सोय म्हणून वाघूर नदीच्या सप्तकुंडाच्या प्रवाहाजवळ नालेच्या आकारात या गुंफा बांधल्या गेल्या. दूध, शेण, डिंक, तांदळाचे तूस, भस्म असे घटक एकत्र करून, त्याचा गिलावा गुंफेतील दगडांवर देत कलाकारांनी केवळ भिंतींवर नाही तर छतांवरही चित्रं काढली आहेत. ही चित्रं निव्वळ कुणाच्या कल्पनेतून उमटलेली नाहीत, तर बौद्ध तत्त्वज्ञानाचा संदेश आणि त्यावेळचं जनजीवन विविध कथांद्वारे त्यात उमटलं आहे. - म्हणजे ‘अजिंठा शिल्प’ फॅण्टसी नाही! दोन हजार वर्षांपूर्वीच्या काळातील राजेरजवाडे, गावाची रचना, मनोरंजनाची साधनं, घरं, वास्तुरचना, प्राणी व निसर्ग जीवन यातलं प्रत्येक सूक्ष्म इथे टिपलं गेलं आहे. राजमहालातील हंड्या, झुंबरं, पडदे त्यातल्या रंगसंगतीसहच नव्हे तर कापडांच्या प्रकारापोतांसह दिसतात. यात चितारलेल्या प्रसंगात बुद्धाच्या जातककथांचे संदर्भ सापडतात. केवळ अद्भुत म्हणता येईल हे सगळं! हे सगळं मानवनिर्मित असल्यामुळं लयाला जाणार हे स्वाभाविक. त्यामुळे ते टिकवण्यासाठी निजामाच्या काळात वॉर्निश नि अलीकडच्या काही वर्षांमध्ये सीमेंट वापरून त्याची डागडुजी करण्यात आली हे दुर्दैव! आज पोपडे नि रंग उडालेल्या या चित्रशिल्पांनीही भारून जायला होतं. इतकी प्रगत व दीर्घकाळ टिकणारी रंगलेपनाची पद्धत व शैली बघून अवाक् व्हायला होतं. आज युनेस्कोनं ‘जागतिक वारसा’ म्हणून हे ठिकाण यादीत घेतलं असलं, तरी येत्या शंभर वर्षांत त्यातलं किती शिल्लक उरणार या प्रश्नानं मी त्यावेळी तीव्र अस्वस्थ झालो. विद्यार्थिदशेत होतो, तरी मनानं कौल दिला की अजिंठ्याचं वैभव पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्ग शोधायचे हेच आता आपलं जीवितकार्य!
यासाठी दोन मार्ग हाती होते. एक, पुरातत्व खात्याची परवानगी घेऊन सगळ्या २९ गुंफांमधली चित्रं व शिल्पं यांचे बारकाईनं फोटो काढायचे. दुसरं म्हणजे, चित्रातील नष्ट झालेला भाग पुनर्निर्मिती करून संवर्धित करायचा. दोन्ही पातळ्यांवर काम सुरू झालं. असंख्य स्केचेस व्हायला लागले. गुंफेतील भिंतीच्या पोतासह हुबेहुब चित्रं रंगवण्याचा प्रयत्न केला तरी कॅनव्हासच्या रेषांचा पोत वगळता येणार नव्हता. शिवाय ही चित्रंही सध्याच्या चित्राबरहुकूम काहीशा भग्नावस्थेतली हाती येत होती. भग्न भागातील चित्राचं मूळ रूप कसं असेल याची संशोधनाआधारे कल्पना करत, त्यानुसार चितारत ते जतन करण्यानं खरं समाधान गवसणार होतं. या प्रक्रियेत काही वर्षं गेली. फोटोग्राफीचं तंत्र उत्तम अवगत असलं तरी गुंफेतले फोटो काढायला मर्यादा होत्या. त्या अर्थात आर्थिकही होत्या. त्यामुळं सगळी जुळवाजुळव होऊन २००९ मध्ये प्रत्यक्ष फोटो डॉक्युमेण्टेशनला सुरुवात झाली. बुद्धाच्या महानिर्वाणानंतर जवळपास सातशे वर्षं कलाकारांच्या असंख्य पिढ्या झपाटून अजिंठा लेणी घडवत होत्या... हा ठेवा, त्यामागचा विचार, समर्पण व झपाटलेपण जाणवून नवा हुरूप यायचा. त्यामुळे पर्यटकांच्या गर्दीत, स्टुलांवर स्टुलं चढवून उंच जागेवरून चार लक्स लाइटइतक्या (म्हणजे एका मेणबत्तीनं वर्तुळाकार मिळणाºया) अपुºया प्रकाशात वर्षाचे ३६५ दिवस वेगवेगळ्या कोनातून फोटो काढत राहिलो. त्यासाठी जुनं रेंज फाइंडर तंत्र वापरलं. उदाहरण सांगतो, एकोणिसाव्या गुंफेतलं ध्यानस्थ बुद्धाच्या चार मूर्तींचं डॉक्युमेण्टेशन करताना बुद्धाची ध्यानमग्न स्थिर बुबुळं टिपण्यासाठी विशिष्ट कोन साधला जायला हवा होता. मग पृथ्वीची प्रदक्षिणा, उत्तर-दक्षिणायन याचा अभ्यास करून विशिष्ट प्रकाश मिळणारा दिवस गाठला नि नेमका परिणाम देणारा फोटो मिळाला. इथली चित्रं इतकी नाजूक अवस्थेत आहेत की आपल्या उच्छ्वासानंही तिचे पोपडे गळून येतील अशी भीती वाटत असायची. पण तरी जवळ जाऊन ती निरखल्याशिवाय व फोटो काढल्याशिवाय त्यातले बारकावे नि कथांचा तपशील कळणार नव्हता. मग त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, निरूपणकार, संशोधक अशा मित्रांची मदत घेणं, बुद्धाच्या आयुष्याबद्दल व त्या काळाबद्दल सांगणारी असंख्य पुस्तकं वाचणं, देशाच्या कानाकोपºयात प्रवास करत तिथले कलाइतिहासाचे संदर्भ पडताळणं हे सुरू झालं. भारतीय संस्कृती आणि तिचे जगभरातील संदर्भ समजून घेण्यासाठी सुमारे पस्तीस हजार किलोमीटर्सचा रस्त्यावरूनचा प्रवास यादरम्यान केला. पुणे विद्यापीठातील पाली भाषा अभ्यास केंद्राचा विद्यार्थी झालो.
या चित्रांच्या रिस्टोरेशनचं काम म्हणजे सगळा रंगाचा चमत्कार. चित्रांवर परावर्तित होणारा प्रकाश आणि त्यामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम ॠतूनुसार बदलतो. यामुळे काम करताना एक फोटोग्राफर, चित्रकार म्हणून रंगशास्त्र व प्रकाशाचा प्रतिसाद समजून घेत माझा कामाचा आराखडा बदलत नेणं मला भागच होतं. काळाच्या ओघात चित्रातून नाहिसा झालेला भाग सगळ्या संदर्भासह संगणकावर पुनर्जीवित करणं हे काम तर फारच थकवणारं व कसोटी पाहणारं होतं. फोटोशॉपवर सर्रास काम करणाºया किंवा तंत्र माहिती असणाºयांना वाटतं की चित्राच्या निखळलेल्या भागात संगणकावर पॅच मारता येणं हे चुटकी वाजवताक्षणी करण्याइतकं सोपं काम आहे. किंवा जगात कुठंतरी याची प्रतिकृती उपलब्ध असेल त्याची नक्कल करायची! मात्र इथले मिसिंग पॅच जगात कुठेच नाहीयेत. कुठलाच संदर्भ जगात उपलब्ध नाहीये.
डिजिटली काम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक फोटो व स्केचेसवरून चित्रांचं इंचांमध्ये नेमकं मोजमाप करण्यानंच पक्का आराखडा करता येणं शक्य होतं. ते अतिशय अवघड काम होतं. ते संपवल्यावर मी जेव्हा माझ्या संगणकाच्या खोलीत बसायचो तेव्हा ठरवायचो की बाबा, आज मला किती इंचाचं काम संपवायचं आहे? त्यावेळी भवतालच्या सगळ्या गोष्टीतून ‘मायनस’ होत मी दोन हजार वर्षांपूर्वीच्या चित्रकारानं त्यावेळी काय विचार केला असू शकतो यात मग्न होऊन जायचो. चित्रकारानं कुठलं टूल, कुठल्या रंगाची पॅलेट, कशा तºहेची हार्मनी दाखवलीय, त्याला सांगायचं नेमकं काय आहे याचा विचार करत राहायचो. त्यावेळी त्या चित्रकाराला जो ‘टेक्स्ट’ दिलेला आहे त्याच्याशी व्हिज्युअली कनेक्ट करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. टेक्स्ट म्हणजे भाषा, ती साहित्यिकही असू शकते, पण केवळ त्यावर चित्र बनू शकत नाही. ‘शिबी नावाचा एक राजा होता. तो खूप लोकप्रिय होता. त्याच्याकडे मंत्रिमंडळ होतं. लोकांचा तो आदर करायचा. मंत्रिमंडळाचा आदेश तो मानायचा’ हे जर चित्रात लिहायचं आहे तर वेगवेगळ्या फॉर्म्सचा वापर केला जातो. या ओळी दृश्य स्वरूपात करायच्या तर राजा दाखवावा लागतो, त्याचं सिंहासन, दरबार, त्याची उंची वस्त्रं, मंत्रिमंडळ, त्यांची त्या-त्या दर्जाप्रमाणे आसनं व वस्त्रं. सिंहासन लाकडाचं आहे की धातूचं, की जडजवाहिरे वापरून केलेलं? मागच्या बाजूचे मंत्रिमंडळातले लोक, त्यात डावंउजवं कोण बसणार, त्यांचे मुकुट नि वस्त्रं कशी असणार हे चित्रकारानं रंगवायचं ठरवलं तेव्हा दोन हजार वर्षांपूर्वीच्या तत्कालीन राजकीय गोष्टींशी नातं ठेवत ते चितारणं त्याला भाग होतं. तो चित्रकार चित्र काढतो तेव्हा त्याचा उच्छ्वास त्या चित्रावर असतो. चित्रकाराचा समाधानाने सोडलेला उच्छ्वास मी श्वास म्हणून घेतला की मग मला हे सगळं समजायला सुरु वात होते. ही प्रक्रि या आहे व अशीच आहे..
पूर्वार्ध
(लेखक फोटोग्राफर आणि चित्रकार आहेत. sendprasadpawar@gmail.com)
(शब्दांकन : सोनाली नवांगुळ)