फटाका भाजपचा, दिवाळी प्रहारची!
By किरण अग्रवाल | Published: October 31, 2021 11:10 AM2021-10-31T11:10:54+5:302021-10-31T11:11:23+5:30
Akola Jilha Parishad : भाजपनेही यात बेरजेचे राजकारण केल्याचे पाहता वंचित सोबतच महाआघाडीनेही सावध पावले टाकणे गरजेचे बनले आहे.
भाजपच्या उघड आशीर्वादाने ‘प्रहार’ला अकोला जिल्हा परिषदेतील पदार्पणातच सभापती पदाची संधी मिळून गेली. सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीला यामुळे धक्का बसलाच, परंतु प्रहारला राज्यातील सत्तेचे बोट धरू देणाऱ्या महाआघाडीलाही काटशह दिला गेला, ही आगामी राजकीय समीकरणांची नांदीच ठरली तर आश्चर्य वाटू नये.
अकोला जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीतील यशापाठोपाठ पहिल्यांदाच निवडून गेलेल्या ‘प्रहार’च्या एकमेव सदस्याला सभापती पदाचीही संधी लाभल्याने यंदाची दिवाळी या संघटनेसाठी चैतन्यदायी ठरली आहे, पण वंचित बहुजन आघाडीला सभापती पदापासून वंचित ठेवण्यासाठी महाआघाडीसह भाजपने स्वतःहून प्रहारचा उंट आपल्या तंबूत आमंत्रित करून घेतल्याने आगामी काळात हे सामीलकीचे राजकारण आणखी कोणते फटाके उडवू शकेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
अकोला जिल्हा परिषदेच्या दोन सभापती पदांसाठी झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला रोखण्यात अन्य सर्व पक्षीयांना यश आल्याची बाब सत्ताधारी ‘वंचित’साठी धोक्याची घंटा वाजवणारी आहेच, परंतु याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे प्रहारला पाठबळ पुरवून सभापती पदाची संधी मिळवून देणारी भाजप विरोधकांच्या गोटात शिरून आपल्यासाठी नवा भिडू शोधण्याच्या काटशहचे राजकारण करण्यास सिद्ध झाल्याचे संकेतही मिळून गेले आहेत. राज्याच्या सत्तेत सोबत असलेल्या प्रहारच्या उमेदवारासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येणे स्वाभाविक होते, परंतु भाजपनेही यात बेरजेचे राजकारण केल्याचे पाहता वंचित सोबतच महाआघाडीनेही सावध पावले टाकणे गरजेचे बनले आहे.
अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकीत कुटासा गटात प्रहारने भाजपसोबत हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीला पराभवास सामोरे जावे लागल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केल्याने मोठा गहजब झाला. त्यामुळे अगदी मंत्रिपद सोडण्याची भाषा बच्चू कडू यांनी केली, परंतु सभापती पदाच्या निवडीत त्याच उमेदवाराला भाजपने थेट पाठिंबा देऊन मतदान केल्याने मिटकरी यांच्या आरोपात तथ्य होते हेच जणू स्पष्ट होऊन गेले म्हणायचे. भाजपच्या फटाक्यावर प्रहारने दिवाळी साजरी करण्याचा हा प्रकार म्हणूनच राष्ट्रवादीला किंवा एकूणच महाआघाडीसाठी धोक्याचा संकेत देणारा ठरावा, कारण आज भाजपने फटाका फोडल्याने मिठाई खाणारी प्रहार भविष्यात कोणाकोणाचे तोंड कडवट करेल याचा अंदाज बांधता येऊ नये.
मुळात पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव करून प्रहारचा उमेदवार निवडून आला असतानाही राष्ट्रवादीसह महाआघाडीने या उमेदवारास सभापतीपदाची उमेदवारी देणे जितके विचित्र, तितकेच त्याला भाजपने पाठिंबा देणे महाविचित्र. अर्थात राजकारणात हे चालतच असते. कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो की मित्र. जिल्हा परिषदेत प्रथमच चंचुप्रवेश मिळविलेल्या प्रहारला तातडीने सभापतीपदाच्या माध्यमातून सत्तेची संधी देणे हा ‘वंचित’ला दूर ठेवण्याचा, आजच्यासाठी अगर फक्त जिल्हा परिषदेपुरता राजकारणाचा भाग नसून; आगामी राजकारणाच्या दृष्टीने कूटनीतीचा भाग ठरावा. जि.प. अध्यक्ष उपाध्यक्षासह सभापतीपदाच्या यापूर्वीच्या निवडणुकीत भाजप तटस्थ राहिल्याने वंचितला त्याचा लाभ मिळाला होता. यंदा भाजपने निर्णायक भूमिका निभावून वंचितला तर धक्का दिलाच, परंतु आपल्या तंबूत शिरून आम्हीही राजकारण करू शकतो, असा संदेश महाआघाडीलाही दिला. अशात प्रहारने दिवाळी साजरी करून घेणे स्वाभाविकच होते.
सारांशात, आणखी सहा-आठ महिन्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या दुसऱ्या आवर्तनाच्या निवडीप्रसंगी या आजच्या बेरजेची उजळणी होऊ शकेल. अर्थात, तेव्हाही असेच घडेल असे खात्रीने म्हणता येऊ नये, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कोणत्याही पक्षाला काहीही वर्ज्य नसते, हेच यातून अधोरेखित व्हावे. साऱ्यांनी मिळून दिवाळी गोड करण्याचा हा प्रकार आहे, फक्त दिवाळीनंतर कोणाचे फटाके फुटतात हेच आता पाहायचे.