अल मदीना

By admin | Published: May 10, 2014 06:11 PM2014-05-10T18:11:30+5:302014-05-10T18:11:30+5:30

कावाफीने स्थलांतरित लोकांच्या संदर्भात जे वास्तव त्याच्या कवितेत मांडलंय, तेच दिग्दर्शकाने आपल्या चित्रपटात नेमकं दाखवलंय. युसरी नस्रल्लाहाचा ‘अल मदीना’ या कवितेतूनच त्याला स्फुरला आहे. कविताच एखाद्या चित्रपटाची प्रेरणा असावी, तिनेच कथाशय पुरवावा, हे फारच क्वचित घडतं.

Al Madina | अल मदीना

अल मदीना

Next

- अशोक राणे

 
कावाफीने स्थलांतरित लोकांच्या संदर्भात जे वास्तव त्याच्या कवितेत मांडलंय, तेच दिग्दर्शकाने आपल्या चित्रपटात नेमकं दाखवलंय. युसरी नस्रल्लाहाचा ‘अल मदीना’ या कवितेतूनच त्याला स्फुरला आहे. कविताच एखाद्या चित्रपटाची प्रेरणा असावी, तिनेच कथाशय पुरवावा, हे फारच क्वचित घडतं. 
 
 
कैरो शहर, फळं, फुलं आणि ताज्या भाज्यांनी खचाखच भरलेला रंगीबेरंगी बाजार. विक्रेते आणि गिर्‍हाइकांची तशीच खचाखच गर्दी.
सभोवतालच्या गल्ल्याही माणसांनी आणि फळं, फुलं, भाज्यांनी ओसंडून वाहणार्‍या. त्यातच काही ताज्या मटणाची दुकानं. रक्तमांसाचा खच आणि दुकानादुकानांत लोंबकळत ठेवलेली जनावरांची धडे. विकणार्‍यांची आणि विकत घेणार्‍यांची एकच धांदल.. कोलाहल टिपेला गेलेला. त्या कोलाहलातही ‘अलीऽ अलीऽऽ’ अशी हाक स्पष्ट ऐकू येते. हाका मारणारा वृद्धही दिसतो. तो असतो भाजीविक्रेता. दुकानात उसळलेली गर्दी त्याला आवरत नाही आणि म्हणून तो अलीला हाका मारतोय. अली त्याचा मुलगा. तो तिकडे खाटकाच्या दुकानात त्याचे हिशेब ठेवण्याचे काम करतोय.
खरं तर त्याने वडिलांना त्यांच्या कामात मदत करायला हवी. आयुष्यभर भाजीचं दुकान चालवीत संसाराचा गाडा हाकीत ते थकलेत. तरुण पोराने आता हा सारा डोलारा सांभाळावा अशी त्यांची कुठल्याही सर्वसामान्य बापासारखी अपेक्षा आहे. ते असतील इतर अनेक सर्वसामान्य बापांपैकी एक; पण अली नाही सर्वसामान्य.. आणि आज जरी परिस्थितीने तो तसा असला तरी भविष्यात तसा असणार नाही. कारण त्याला नट व्हायचंय.. आणि तेही शक्यतो हॉलिवूडला जाऊन..! नाहीच जमलं तर गेला बाजार त्याला युरोप तरी गाठायचंच आहे; म्हणून तो खाटकाकडे काम करून पैसे जमवतो आहे. घरच्या व्यवसायात मिळून-मिळून स्वत:चे किती पैसे मिळणार..
अलीच्या घरात किंवा वस्तीतही कसलंही कलेबिलेचं वातावरण नाही. त्याच्यातच ते कुठून आणि कसं आलं याचं सर्वांनाच नवल वाटतं आहे. नवल आणि चिंताही. दोघांना विशेष. एक त्याचे वडील आणि दुसरी त्याची प्रेयसी. तिलाही वाटते, की त्याने वस्तीतील इतरांप्रमाणेच बाजारात बसावं, धंदा करावा आणि इतरांसारखा संसारही करावा. शिवाय वडिलांनी आयुष्यभर खपून एवढं दुकान थाटलंय ते कुणासाठी? हे सगळे सोडून हे नट व्हायचं काय खूळ घेतलंय डोक्यात कुणास ठाऊक!ती संधी मिळेल तेव्हा त्याला समजावते. बरं नट व्हायची हौस आहे, तर ती कैरोतल्या नाटकातून, सिनेमातून लहान-सहान भूमिका करून भागते आहेच ना. ती त्याला परोपरीने पटविण्याचा प्रयत्न करते; परंतु तो आपला हेका सोडत नाही. बापाने तर बोलणंच टाकलंय. काय तुझ्या मनाला येईल ते कर असाच पवित्रा त्यांनी घेतलाय.. अर्थातच नाइलाजाने! कुणाला काय वाटते आणि आपल्याबाबत कोण काय विचार करतो, याकडे अली पार दुर्लक्षच करतो.. आणि वाट पाहत राहतो पुरेसे पैसे जमण्याची! 
दिवसा खाटकाकडे काम, इतर वेळात नाटक, सिनेमात लहान-सहान कामं आणि रात्री त्याच्या खोलीतल्या भिंतीवर लावलेल्या रॉबर्ट डी नीरोच्या भल्याथोरल्या पोस्टरसमोर स्टाइलबाज अभिनयाचा रियाझ.. हा त्याचा दिनक्रम! आणि हो, रोज त्या पोस्टरमधल्या डी नीरोला बजावल्यासारखं किंवा सावध केल्यासारखं विशिष्ट शैलीत सांगणं,
‘‘येतोय मी..’’
आणि मग एकदाचा तो दिवस उजाडतो. सर्वांनी अखेरचा म्हणून त्याला परावृत्त करण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडीत तो घरदार, वस्ती, गाव, देश सोडून निघतो. थेट पॅरिस गाठतो. हॉलिवूड नाही, तर युरोप त्याने ठरवलेलंच होतं. कुठे कैरो आणि कुठे पॅरिस! त्याच्या पंचतारांकित स्वप्नांना वास्तवात आणणारी तशीच पंचतारांकित भूमी. प्रथमदर्शनातच गारूड करणारं शहर ते; परंतु अलीचं भान सुटत नाही. त्याला नेमकी जाणीव आहे, की तो भटकंतीला निघालेला पर्यटक नाही. त्याला त्याचं ध्येय गाठायचंय. तो अगदी पहिल्या दिवसापासून त्याच्या स्ट्रगलला सुरुवात करतो. या स्टुडिओपासून त्या स्टुडिओकडे घिरट्या घालू लागतो. जिथे कुठे शूटिंग चालू असेल तिथे जातो. जमेल तेवढय़ा लोकांना भेटत राहतो. बोलतो. आपली नट म्हणून ओळख पटावी; म्हणून त्यांच्यासमोर काय-काय करून दाखवतो. तिथल्या इंडस्ट्रीचे लोक काहीशा वैचित्र्यपूर्ण नजरेने त्याच्याकडे पाहतात. काही तोंडदेखलं बोलतात. घडत काहीच नाही. कसलंही काम मिळत नाही. पोत्यामागून पोती भरून आणलेला उत्साह, उमेद क्रमाक्रमाने संपत येते.. आणि साठवणीतला पैसाही! उपासमारीची वेळ येते.. अशातच एक जण त्याला भेटतो. सिनेमात काम देण्याची तयारी दाखवतो; परंतु त्या बदल्यात काही अपेक्षा बाळगतो. अलीला त्यात काहीच वावगं वाटत नाही. कारण यामुळे त्याचं नट व्हायचं स्वप्न पूर्ण होणार असतं. त्याला फक्त इतकंच करायचंय. रोज बॉक्सिंगच्या आखाड्यात उतरायचं आहे आणि रोजचं नवनव्या बॉक्सरकडून हार पत्करायची आहे. त्या बदल्यात पैसे तर मिळणारच; परंतु सिनेमात कामही मिळणार..
एका नव्या उत्साहाने अली एक नवी सुरुवात करतो. गेल्या काही दिवसांतली उपासमार आता संपलेली असते. आता दिवसभर चांगलंचुंगलं खादाडायचं. व्यायाम करायचा. फिल्मी हिरोसाठी कमावलेल्या लवचिक शरीराला बॉक्सरचा तगडेपणा, रासवटपणा आणायचा. रूममध्ये मधोमध लटकवून ठेवलेल्या पोत्याला गुद्दे मारत राहायचे. या फिक्सिंगच्या खेळात रोज हरायचं असलं, तरी खेळ पाहणार्‍यांना आणि त्यावर बेटिंग लावणार्‍यांना आपण अगदीच लुटुपुटुचे गडी वाटता कामा नये, याची तो नीट काळजी घेतो. मालकाला खूश ठेवले पाहिजे; कारण तोच आपल्या भविष्याचं दार दिमाखाने उघडून देणार आहे..
..पण अलीसाठी हे स्वप्नरंजनच ठरतं. दिवसामागून दिवस जातात. आठवड्यामागून आठवडे जातात. रोज प्रतिस्पध्र्याचा मार खाणं, रोज हरणं.. खरं तर त्याचंही त्याला काही वाटत नाही. ते त्याने स्वीकारलेलंच होतं; परंतु मालक सिनेमात काम मिळवून देणार होता, त्या आघाडीवर सगळंच सामसूम. अधूनमधून तो आठवण करून द्यायचा तेव्हा आरंभी ‘चाललेत प्रयत्न.. होईल तुझ्या मनासारखं लवकरच..’ असं समजावणीच्या सुरात सांगणारा मालक नंतर डाफरायलाच लागतो.
‘‘परमुलखातून आलायस. काम आहे ना हाताशी.. मिळतायेत ना चांगले पैसे.. बस्स आता हेच करत राहायचं तरुण आहेस तोपर्यंत.. आलं लक्षात..’’
तसं अलीच्या हळूहळू लक्षात यायलाच लागलं होतं. आता ते स्पष्टपणने कळालं. स्वप्न दूरच राहिलं. आपण माफियाच्या तावडीत सापडलोय, त्याच्या हातचं खेळणं झालोय. तो हादरून जातो; पण काही करून यातून सुटका करून घेतली पाहिजे, हेही त्याला तितक्याच तीव्रतेने जाणवतं. हा रोज-रोजचा पराभव.. ही दररोजची हार संपवली पाहिजे. अलीकडे त्याला कुणाही सोम्यागोम्याकडून ठरवून हार पत्करणं कठीण जात होतं; परंतु ही हार तेवढय़ापुरतीच, म्हणजे फिक्सिंगपुरतीच र्मयादित नव्हती.. ती तर आपलीच हार होती! त्याला जिव्हारी लागतं आणि तो ठरवतो. निसटायचं इथून; पण मालकही सावध असतोच. अलीवर नजर ठेवली जाते. मध्यरात्री तो अंदाज घेत दबल्या पावलांनी निघतो. रूमच्या बाहेर पडतो. इमारतीच्याही बाहेर पडतो आणि जीव खाऊन धावत सुटतो. इकडे माफियाच्या गँगला कळतं तो निसटल्याचं आणि मग सुरू होतो जीवघेणा पाठलाग. अली गल्लीबोळातून धाप लागेस्तोवर धावतो; पण तो अखेर गँगच्या हाती सापडतोच. त्याला बेदम मारलं जातं. हातापायाची हाडं मोडली जातात. हवं तसं तुडवलं जातं. तेवढय़ात कुठून तरी पोलीस व्हॅन येते. गँग पळ काढते. रक्तबंबाळ अलीला हॉस्पिटलात नेण्यात येतं. शस्त्रक्रिया होते. तो बचावतो. पायाने अधू झालेला अली कुबड्यांच्या आणि त्याहीपेक्षा एव्हाना त्याच्यासाठी धावून आलेल्या म्हातार्‍या वडिलांच्या आधाराने हॉस्पिटलच्या बाहेर पडतो. आकाशात उडालेलं विमान दिसतं.. आणि मग वडिलांच्याच आधाराने कैरोला वस्तीत येणारा अली दिसतो. नट होण्यासाठी पॅरिसला गेलेल्या बर्‍यापैकी देखण्या, रूबाबदार अलीची पार रया गेलेली असते. तो कुणाच्याच नजरेला नजर देत नाही. एकदाच फक्त एकदाच नजर कशीबशी क्षणभर वर उचलतो. समोर त्याची प्रेयसी असते. त्याच्या प्रतीक्षेने, काळजीने कोमेजलेली. तिचे डोळे भरून येतात.. हुंदका मात्र ती आतल्या आता दाबते. सावकाश पावले टाकीत अली घरात शिरतो.
इजिप्तचा ख्यातनाम दिग्दर्शक युसरी नस्रल्लाह याचा ‘अल मदीना’ १९९९ मध्ये मी स्वित्झर्लंडमधील लोकार्नो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाहिला होता. स्थलांतरितांविषयी मला मुळातच एक खास आकर्षण आहे. आपण जिथे जन्मलो, वाढलो, जिथे पिढय़ान्पिढय़ा आपलं वास्तव्य आहे, आपली मुळं रुजलेली आहेत, ती भूमी सोडून पल्याडच्या कुठल्या तरी प्रदेशात निघालेल्याच्या मनाशी त्याक्षणी एकच भावना अतिशय तीव्र स्वरूपात असते.. त्या तिथे पलीकडे सारं कसं छान-छान आहे.. ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साईड.. परंतु हे स्वप्नरंजन खरं ठरतं का..? इथून उपटलेली मुळं तिथे रुजली का..? या प्रश्नांमागे माझ्या मनाशी कुठलाच निराशावादी वा सिनिक विचार नाही. कुतूहल मात्र जरूर आहे आणि ते पुरविण्याचं, त्यातून नेमकं वास्तव जाणवून देण्याचं काम ‘अल मदीना’सारख्या कितीतरी चित्रपटांनी केलं. या चित्रपटांनी या वास्तवाचे अनेक कंगोरे दाखविले.
ग्रीक कवी कॉन्स्टटीन कावाफी याच्या एका कवितेतील दोन ओळी सर्वप्रथम पडद्यावर येतात आणि मग सुरू होते कुण्या एका अलीची तसेच त्याच्यासारख्या अनेक अलींची प्रातिनिधिक कहाणी. ती ओळ असते, 
तुझंच गाव तुझा पाठलाग करीत राहील..
भाषांतर मी कधी करीत नाही; परंतु या चित्रपटाच्या, एकूणच स्थलांतरित लोकांच्या संदर्भात या कवितेचं मोल मला विशेषत्वाने जाणवलं म्हणून हे एक स्वैर भाषांतर.
तू म्हणालास, जाईन मी दूरच्या देशा..
शोधीन नवे किनारे मला सापडेल नवे गाव..
माझ्या या गावाहून सुंदर..! पण;
तुला नवा देश सापडणार नाही
नवा किनारा तुझ्या हाती लागणार नाही
तुझंच गाव तुझा पाठलाग करीत राहील
कुठलीही वाट तुला कुठे नेणार नाही
तू कुठेही गेलास तरी तू पोहोचशील
पुन्हा-पुन्हा त्याच गावात..
थोडं स्वत:ला बदललंस तरच..
कावाफीने स्थलांतरित लोकांच्या संदर्भात जे वास्तव या कवितेत मांडलंय, तेच दिग्दर्शकाने आपल्या चित्रपटात नेमकं दाखवलंय. युसरी नस्रल्लाहाचा ‘अल मदीना’ या कवितेतूनच त्याला स्फुरला आहे. कविताच एखाद्या चित्रपटाची प्रेरणा असावी, तिनेच कथाशय पुरवावा हे फारच क्वचित घडतं. ‘अल मदीना’ हे त्यातलं खूपच चांगलं उदाहरण आहे.
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे 
व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)

Web Title: Al Madina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.