कार, मोबाइलवरच्या सगळ्या ‘ऑफर्स’ गायब?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 06:04 AM2021-09-12T06:04:00+5:302021-09-12T06:05:14+5:30
येत्या काळात अचानक महागाई वाढेल, टंचाई वाढेल अन् मागणीवर परिणाम होईल... असं काही संकट येऊ शकतं याची आपल्याला जाणीवही नसेल; पण ते सध्या घोंगावत आहे. वाढणारही आहे. अधिक गंभीर होणार आहे.
- पवन देशपांडे
कोरोनाव्यतिरिक्त आणखी एक संकट सध्या उद्योगांवर आलं आहे आणि कालांतरानं ते आपल्यासारख्या ग्राहकांवर कोसळणार आहे. तेही महागाईच्या रूपात. म्हणेज मोबाइल महाग होतील. कारच्या किमती वाढतील. इतर इलेक्ट्रॉनिक्सवरच्या सगळ्या ऑफर्सही निघून जातील... काय असेल याचं कारण?
याचं कारण आहे, चीप शॉर्टेज!!
- मोबाइलसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कारसारखी अनेक वाहने यांच्यामध्ये छोट्या-छोट्या चीप वापरल्या जातात. त्याची सध्या मोठ्या प्रमाणात टंचाई आहे.
कशामुळे टंचाई?
- कोरोना आणि लॉकडाऊन हे एक मोठे कारण त्यामागे आहे.
- या काळात उद्योग बंद असल्याने उत्पादन घटले.
- चीपसाठी लागणाऱ्या इतर छोट्या उपकरणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे.
- माल वाहतूक महागली आहे.
परिणाम काय होतोय?
१. मोबाइलचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे मोबाइलची मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण होत आहे. त्यामुळे मोबाइलवर मिळणाऱ्या सवलती कमी होतील.
२. नवीन मोबाइल लाँच होण्याचे प्रमाण घटणार आहे. रिलायन्स जिओनेही सध्या नवीन मोबाइलचे लाँच पुढे ढकलले आहे. असेच अनेक कंपन्याही करू लागल्या आहेत.
३. कारचे उत्पादन ऑगस्टमध्ये घटले आहे. त्यामुळे मागणी असूनही कार उत्पादकांना कारची डिमांड पूर्ण करत येत नाही. कारचे वेटिंग वाढले आहे. त्यामुळे सेकंडहँड गाड्यांची विक्रीही वाढल्याचे दिसते.
----------------------
- १३ टक्के एवढी कार विक्री भारतात घटली आहे. जगातही हेच प्रमाण आहे.
१० टक्के एवढी मोबाइलची विक्री गेल्या तिमाहीत वाढलेली दिसत आहे. मात्र, येत्या काळात उत्पादन घटेल. परिणामी, विक्रीही घटू शकते.
- ३२२७ कोटी रुपये एवढी उलाढाल जागतिक चीप मार्केटची (सेमीकंडक्टर) आहे.
चीप तयार करण्यात कोणत्या देशाचा वाटा सर्वाधिक?
६३% तैवान
१८% दक्षिण कोरिया
८% चीन
१३% इतर
वाहनांच्या चीपसाठी वेटिंग टाइम
आधी - ८ ते १२ आठवडे
आता - ३६ ते ४२ आठवडे
(सहायक संपादक, लोकमत)
pavan.deshpande@lokmat.com