इकडे आड तिकडे विहीर
By admin | Published: May 6, 2014 05:01 PM2014-05-06T17:01:27+5:302014-05-06T17:06:29+5:30
अनेक दशके सत्तेवर पूर्ण नियंत्रण असलेल्या लष्कराच्या हातून ही सत्ता निसटल्यावर मॉर्सी-विरोधाचं निमित्त पुढे करून लष्कराने सत्ता खेचून परत आपल्याकडे घेतली आहे.
अनेक दशके सत्तेवर पूर्ण नियंत्रण असलेल्या लष्कराच्या हातून ही सत्ता निसटल्यावर मॉर्सी-विरोधाचं निमित्त पुढे करून लष्कराने सत्ता खेचून परत आपल्याकडे घेतली आहे. याला ‘लोकशाहीची जागतिक पातळीवर जपणूक करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या’ अमेरिकेचा विरोध नाही! ‘इकडे आड, तर तिकडे विहीर’ अशी इजिप्तवासीयांची अवस्था झाली आहे.
इजिप्तमध्ये २0११च्या सुरुवातीला हुकूमशहा राष्ट्रपती होस्नी मुबारक यांच्या विरोधात सुरू झालेल्या निदर्शनांचा शेवट काही आठवड्यांमध्येच मुबारक यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यात आणि पळ काढण्यात झाला. यामुळे इजिप्तमध्ये ‘अरब क्रांती’ झाली आणि कधी नव्हे ते तिथे लोकशाही शासनव्यवस्था प्रस्थापित होण्याची चिन्हेही दिसायला लागली. इजिप्तच्या लष्कराने देशाची सूत्रे तात्पुरत्या स्वरुपात आपल्या हाती घेतली आणि काही महिन्यांनी नव्या राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक घेण्याची घोषणा केली. २0१२च्या मे-जून महिन्यामध्ये झालेल्या निवडणुकीत मुबारक यांच्या विरोधात असलेल्या ‘मुस्लिम ब्रदरहूड’ या संघटनेच्या राजकीय पक्षाचा नेता असलेल्या मोहंमद मॉर्सी यांची अगदी निसटत्या फरकाने इजिप्तचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली.
मॉर्सी यांनी सुरुवातीला इजिप्तला प्रगतिपथावर नेण्याचं धोरण स्वीकारले असल्याचे चित्र निर्माण झाले असले, तरी ते फसवे ठरले. लवकरच मॉर्सी यांनी हुकूमशाही धोरण पत्करले. इजिप्तच्या लोकसंख्येपैकी फक्त एक टक्का लोक शिया पंथीय आहेत. त्यांनी शिया पंथीयांची कत्तल करायचा फतवा काढणार्या धर्मगुरूला जवळ केले. तसेच, सीरियामध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धामध्ये सरकारच्या विरोधात लढत असलेल्या गटांना सहकार्य करण्याचे धोरण जाहीर केले.
इजिप्तच्या राज्यघटनेमध्ये बदल करून आपल्याकडे सर्वाधिकार घेण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. यामुळे जनतेच्या मनात मॉर्सी यांच्याविषयी असलेल्या आशेची जागा तिरस्काराने घेतली. ३0 जून २0१३ या दिवशी म्हणजे मॉर्सी यांच्या राष्ट्रपतिपदाच्या कार्यकालाला बरोबर एक वर्ष झाले त्या दिवशी इजिप्तमधील जनता परत एकदा रस्त्यांवर उतरली आणि मॉर्सी यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली. मॉर्सी यांनी त्याला दाद न दिल्याने इजिप्तच्या लष्करानेच मॉर्सी यांना पायउतार होण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली.
तिलाही मॉर्सी यांनी भीक न घालताच लष्करानं त्यांना अटक केली आणि सत्ता आपल्या हाती घेतली. मॉर्सी यांच्या कार्यकालात लष्करप्रमुख असलेल्या अब्दुल फताह अल-सिसी यांनी आपल्या हातच्या एका बाहुल्याला इजिप्तच्या राष्ट्रपतिपदावर तात्पुरते बसवले. या घटनाक्रमाचा सुरुवातीला अमेरिका आणि युरोपीय देश यांनी धिक्कार केला. लोकशाहीच्या मार्गांनी निवडून न आलेल्या मॉर्सी यांना पदच्युत करून इजिप्तच्या लष्कराने देशाचा कारभार स्वत:कडे घेण्यामुळे देशात अनागोंदी माजेल, असे मत अमेरिकेने व्यक्त केले.
मॉर्सी यांच्यावरचा खटला सुरू राहिला. त्यांना पाठिंबा देत असलेल्या मुस्लिम ब्रदरहूड संघटनेभोवती अल-सिसी यांनी पाश आवळले. मॉर्सी यांच्या सर्मथकांपैकी ५२९ जणांना २0१४च्या मार्च महिन्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मुस्लिम ब्रदरहूड संघटनेला विरोध करत असलेल्या सौदी अरेबियाला यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि सौदी राजवटीने इजिप्तमध्ये मोठय़ा प्रमाणावर पैसे ओतायला सुरुवात केली. अर्थातच, यामुळे इजिप्तमधल्या सर्वसामान्य लोकांचे आयुष्य काहीच सुधारले नाही. इजिप्तमध्ये बव्हंशी लोक दररोज दोन अमेरिकी डॉलर्स इतकाच खर्च करू शकतात, इतकी त्यांची खराब अवस्था आहे. अजूनही दररोज कैरोमध्ये आणि इतरही अनेक शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि त्यांची संख्या वाढतच चालली आहे. लुटालूट, अफरातफर, स्त्रियांवर अत्याचार अशा गोष्टींना ऊत आला आहे.
अर्थातच, यामुळे इजिप्तला मोठय़ा प्रमाणावर परकीय चलन मिळवून देणार्या पर्यटन व्यवसायावर प्रचंड विपरीत परिणाम झाला आहे. २0१0मध्ये एक पर्यटक सरासरी ८५ अमेरिकन डॉलर्स इजिप्तमध्ये खर्च करत असे. आता तो आकडा ६७ डॉलर्सवर आला आहे. तसंच, २0१0मध्ये एकंदर १४.७0 कोटी पर्यटकांनी इजिप्तला भेट दिली होती, तर २0१३मध्ये हा आकडा घसरून १३.८0 कोटींवर आला, असं इजिप्तचे पर्यटनमंत्री हिश्ॉम झाझू म्हणतात.
इजिप्तमध्ये तब्बल १४ टक्के बेकारी असल्याचे अधिकृत सरकारी आकडेवारीच सांगते. म्हणजेच बेकारीचा खरा दर याहून जास्त भयंकर असणार, हे नक्की. कहर म्हणजे इजिप्तमधल्या बेकार लोकांपैकी एकूण ६९ टक्के जण १५ ते २९ या वयोगटातले आहेत! म्हणजेच तरुणाईमधली बेकारी हाताबाहेर गेली आहे. साहजिकच हिंसाचार, दिशाहीनता हे प्रकार शिगेला जाऊन पोहोचले आहेत.
इजिप्तमध्ये १९५२मध्ये ‘पहिली क्रांती’ घडली. पहिल्या फारुख राजाची राजसत्ता उलथवून टाकून महंमद नगिबकडे राष्ट्रपतिपदाची सूत्रे देण्यात आली. गमाल अब्दल नासर हा इजिप्तच्या लष्करामधला कर्नल उपराष्ट्रपती बनला. नासरवर १९५४मध्ये अयशस्वी प्राणघातक हल्ला झाला. त्यामुळे नासरने मुस्लिम ब्रदरहूड संघटनेच्या मुसक्या आवळल्या आणि राष्ट्रपती नगिबला नजरकैदेत टाकले. त्यानंतर पुढची अनेक वर्षे नुसता इजिप्तचा नव्हे, तर सगळ्या अरब राष्ट्रांचा तारणहार म्हणून नासरकडे बघितले जात असे. इस्राईलच्या विरोधात कणखर भूमिका घेण्याचे धाडसही नासरने दाखवले. आता मॉर्सी यांना सत्तेवरून घालवून देणार्या अल-सिसीमुळे इजिप्तच्या नागरिकांना परत एकदा नासरची आठवण झाली आहे. अल-सिसीने ‘दुसरी क्रांती’ घडवलीच आहे, आता अल-सिसी यांनी देशाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी त्यांची मागणी आहे. मुस्लिम ब्रदरहूड संघटनेचा मात्र याला अर्थातच पार विरोध आहे.
अल-सिसी यांनी अत्यंत चलाखीने पावले टाकत आपल्याला सत्तेचा मोह नसला, तरी देशाची परिस्थिती बघता आपल्याला ही जबाबदारी स्वीकारण्यावाचून दुसरा पर्यायच दिसत नसल्याचे मत व्यक्त केले आहे. लवकरच इजिप्तच्या राष्ट्रपतिपदाची सूत्रे आपण ‘नाइलाजाने’ हाती घेऊ, असे संकेत त्यांनी दिले आहेत. तब्बल ‘९८टक्के जनतेची सहमती असलेल्या’ नव्या राज्यघटनेला अल-सिसी यांनी मंजूर करून घेतले आहे. याचा मुख्य हेतू मुस्लिम ब्रदरहूडसारख्या संघटनांना इजिप्तच्या राजकारणापासून कायमसाठी दूर करणे आणि लष्कराचा प्रभाव वाढवणे असा आहे. यामुळे इजिप्तमध्ये जेमतेम एक वर्ष मॉर्सी यांच्या कालखंडात लोकशाहीचे वारे वाहण्याचे चित्र निर्माण झाले असले, तरी नव्याने होस्नी मुबारक यांच्या काळात गेल्यासारखे वातावरण आता दिसते आहे. अल-सिसी यांनी मुस्लिम ब्रदरहूडला ‘दहशतवादी’ संघटना ठरवून तिच्यावर बंदी घातली.
मॉर्सी यांच्या काळात इजिप्त हा देश इराणसारखा कट्टर धार्मिक तत्त्वांवर चालणारा देश व्हायची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे मॉर्सी यांना सत्तेवरून हटवण्याला तसा सर्वसामान्य जनतेने फारसा विरोध केलाच नाही; पण आता इजिप्तच्या लष्कराने सत्ता आपल्याकडे घेऊन पुन्हा लोकशाहीची दारे बंद करून टाकली आहेत, हेही अजिबातच योग्य नाही.
इजिप्तसारख्या देशामध्ये लोकशाही नांदूच शकत नाही, असे स्पष्ट मत अल-सिसी व्यक्त करतात. म्हणजेच लष्करी प्रभावाखालीच हा देश चालला पाहिजे, अशी लष्कराची इच्छा आहे. इतकी दशके सत्तेवर पूर्ण नियंत्रण असलेल्या लष्कराच्या हातून ही सत्ता निसटल्यावर मॉर्सी-विरोधाचे निमित्त पुढे करून लष्कराने सत्ता खेचून परत आपल्याकडे घेतली आहे.
याला ‘लोकशाहीची जागतिक पातळीवर जपणूक करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या’ अमेरिकेचा विरोध नाही! ‘इकडे आड, तर तिकडे विहीर,’ अशी इजिप्तवासीयांची अवस्था झाली आहे. अल-सिसी यांची सत्ता फार काळ टिकणार नाही आणि नव्यानं इजिप्तमध्ये निदर्शनं, तसंच यादवी युद्ध यांच्या ठिणग्या उडतील, असंच चित्र दिसतं आहे.
(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत.)