युतीसह आघाडीचेही हुश्श!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:34 AM2019-04-13T00:34:46+5:302019-04-13T00:35:39+5:30
भिवंडीत दिग्गज बंडखोरांची माघार : नव्या समीकरणाचा फायदा कुणाला?
भिवंडी : सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे आणि विश्वनाथ पाटील या दोन्ही दिग्गजांनी शुक्रवारी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने युतीसह आघाडीचेही गणित काहीसे सोपे झाले आहे. विश्वनाथ पाटील हे थेट भाजपच्या तंबूत जाऊन बसले आहेत, तर शस्त्र टाकूनही बाळ्यामामांनी भाजपविरोधी सूर आळवणे सुरूच ठेवले आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच बंडाचे वारे वाहत होते. शिवसेनेचे बाळ्यामामा म्हात्रे यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी दिल्लीपर्यंतची सूत्रे हलवली; पण उपयोग झाला नाही. काँग्रेसने शेवटच्या क्षणी का होईना, पण सुरेश टावरे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. दुसरीकडे, काँग्रेस नेते विश्वनाथ पाटील हेदेखील पक्षाच्या उमेदवारीसाठी देव पाण्यात बुडवून होते; मात्र त्यांच्याही पदरी निराशाच आली. दोन्ही दिग्गजांनी अखेर अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. शुक्रवारी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोघांनी माघार घेतल्याने आघाडीसह युतीनेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शिवसेनेचे बाळ्यामामा म्हात्रे यांनी भाजप युतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात रणशिंग फुंकले होते. बंडखोरी केल्याने शिवसेनेने त्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टीही केली. त्यांची उमेदवारी युतीसाठी त्रासदायक, तर आघाडीसाठी फायद्याची ठरली असती. आता त्यांनी माघार घेतल्याने युतीचे नुकसान होणार नसले, तरी आघाडीला फायदाही होणार नाही. आपण निवडणूक रिंगणात नसलो, तरी कपिल पाटील यांना आपला विरोध राहीलच, अशी भूमिका बाळ्यामामांनी जाहीर केली आहे; मात्र प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात नसल्याने त्यांच्या विरोधाची धार कितपत तीव्र राहील, याबाबत राजकीय वर्तुळात शंका उपस्थित होत आहे.
विश्वनाथ पाटील हे काँग्रेसचे नेते असले, तरी त्यांनी फडकावलेला बंडाचा झेंडा आघाडीसोबतच युतीसाठीही धोक्याचा ठरण्याची शक्यता होती. पाटील हे कुणबीसेनेचेही नेते असून, या समाजाचा भिवंडी मतदारसंघातील टक्का दुर्लक्ष करण्याजोगा नाही. कुणबी समाज हा भाजप-सेनेचाही मतदार आहे. त्यामुळे पाटील यांची बंडखोरी आपल्यासाठीही सोयीची नसल्याचे भाजपने हेरले. त्यामुळेच थेट मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून पाटील यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, पाटील यांनी आपली अपक्ष उमेदवारी मागे घेऊन महायुतीला पाठिंबा जाहीर केला.
दोन्ही दिग्गजांचे बंड आता शमले असले, तरी निवडणुकीच्या घोडामैदानात बदललेल्या समीकरणाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी युतीसोबतच आघाडीलाही नव्याने व्यूहरचना आखावी लागणार आहे.
भिवंडीतही आता थेट लढत
ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण या उर्वरित दोन लोकसभा मतदारसंघांचे चित्र आधीपासूनच स्पष्ट होते. ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात, तर कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात लढत होणार आहे. आता भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रे आणि विश्वनाथ पाटील यांनी माघार घेतल्याने या मतदारसंघातही भाजपचे कपिल पाटील आणि काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्यात दुरंगी सामना रंगणार आहे.