‘अमेरिकन ड्रीम’ कधीही विझणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 06:01 AM2020-11-08T06:01:00+5:302020-11-08T06:05:01+5:30

अमेरिकेची दारं बंद झाल्यासारखं अधूनमधून वाटू शकेल; पण हा देश आपल्या मूळ मूल्यांपासून हटणार नाही, हे नक्की!

‘American Dream’ will never go out! | ‘अमेरिकन ड्रीम’ कधीही विझणार नाही!

‘अमेरिकन ड्रीम’ कधीही विझणार नाही!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘माणूस’ म्हणून इथल्या लोकांच्या दु:खांशी, अडचणींशी मी अधिक जवळचं नातं जोडू शकलो. इथे अमेरिकेत मी एक बिलेनिअर उद्योगपती वगैरे असलो, तरी अगदी तारुण्यापर्यंत मी हलाखी पाहिलेली आहे, गरिबीचा अनुभव मी घेतला आहे.

- डॉ. श्री ठाणेदार

मी उच्चशिक्षणासाठी म्हणून अमेरिकेत आलो १९७९ साली, म्हणजे आता एकेचाळीस वर्षं झाली माझ्या या देशातल्या वास्तव्याला! मी भारतातून येताना माझ्या आईने-इन्नीने दिलेले मध्यमवर्गीय संस्कार घेऊन आलो. परिस्थितीची जाण, हलाखीतून बाहेर पडण्यासाठी झुंज देण्याची अपरिहार्यता आणि हे सारं करताना मनावर दाटून येणाऱ्या निराशेची, वाटेतल्या खाचखळग्यांची पर्वा न करता आपण आपल्या हिमतीवर आपली वाट शोधण्याची, तयार करण्याची जिद्द; ही सगळी पुंजी मी भारतातून येतानाच घेऊन आलो होतो.

अमेरिकेने मला संधी दिली. माझ्या प्रयत्नांना साथ दिली. अडथळे होतेच; पण ते कुणाला नसतात? या देशात मी माझं ‘अमेरिकन ड्रीम’ साकारू शकलो. कल्पनातीत असं यश मिळवलं. अपयशाच्या खड्ड्यात पुन्हा फेकला गेलो, त्यातून बाहेर येऊन आणखी नवी उंची गाठण्याची शक्यताही मला याच देशात मिळाली. माझ्या दत्तक देशाबाबतची कृतज्ञता म्हणून यापुढचं आयुष्य अधिक संपत्ती-निर्माणाच्या कामात न घालवता अमेरिकन समाजाप्रतिची आपली जबाबदारी निभावण्याची उत्कट इच्छा, ही माझ्या राजकारण प्रवेशाची खरी प्रेरणा आहे!

अमेरिकेच्या मिशिगन या राज्याच्या प्रतिनिधी सभागृहात डेट्रॉईट शहराच्या थर्ड डिस्ट्रीक्ट या मतदारसंघाचा प्रतिनिधी (स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह) म्हणून मी निवडून आलो आहे. म्हणजे भारताच्या संदर्भात सांगायचं तर आमदार! या शहरात मी तसा अलीकडेच राहायला आलो. माझ्या मतदारसंघात भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांची संख्या अगदीच नगण्य आहे. इथे धनिकांबरोबरच मध्यमवर्गीय अमेरिकन आणि गरिबांच्या दाट वस्त्या आहेत. डेमोक्रेटिक पक्षाची प्रायमरी जिंकून ( अंतिम निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी इथे पक्षातल्या प्रत्येक इच्छुकाला लोकांच्या मतदानाला सामोरं जावं लागतं) मी प्रचार सुरू केला; आणि काही काळातच कोरोनाची महामारी सुरू झाली. मागोमाग लॉकडाऊन! अमेरिका हा एरव्ही कितीही तंत्रसंपन्न देश असला तरी निवडणूक काळात इथे ‘डोअर नॉकिंग’ची - म्हणजे शब्दश: घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संपर्काची पद्धत आहे. मी माझ्या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली तेव्हा खूप प्रश्न होते : मी इथे राहाणाऱ्या बहुतांश लोकांसारखा दिसत नाही, माझ्या इंग्रजीला अजूनही भारतीय ॲक्सेंट आहे; या लोकांना मी ‘त्यांचा माणूस’ आहे असं का वाटेल?

- आणि अवघ्या काही महिन्यांनंतर तब्बल ९३ टक्के मतं मिळवून मी या मतदारसंघातून निवडून आलो आहे!

कारण? - ‘माणूस’ म्हणून इथल्या लोकांच्या दु:खांशी, अडचणींशी मी अधिक जवळचं नातं जोडू शकलो. इथे अमेरिकेत मी एक बिलेनिअर उद्योगपती वगैरे असलो, तरी अगदी तारुण्यापर्यंत मी हलाखी पाहिलेली आहे, गरिबीचा अनुभव मी घेतला आहे. घरात नळाला पाणी येत नाही; तेव्हा घरातल्या सगळ्यांची होणारी कुचंबणा काय असते हे मी माझ्या भारतातल्या घरात पाहिलेलं होतं... प्रथम पत्नीच्या अकाली निधनानंतर दोन लहानग्या मुलांचा एकट्याने सांभाळ करण्याची तारांबळ मी निभावलेली आहे.. माझ्या पूर्वायुष्याची ही कहाणी माझ्या मतदारांशी मला जोडून गेली, कारण? ही अमेरिका असली, तरी जगाला दिसते त्या ‘श्रीमंत’ अमेरिकेचा हा तुकडा नाही. माझा मतदारसंघ अमेरिकेतल्या गरिबांचा आहे. इथे मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे, कचरा आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे, रात्री-बेरात्री रस्त्यावर उसळणाऱ्या दंग्यांचा प्रश्न आहे आणि इथल्या रस्त्यावर खड्डेही पुष्कळ आहेत. या लोकांचं ‘अमेरिकन ड्रीम’ पूर्णत्वाला नेण्यासाठी आता मला काम करायचं आहे.

गेल्या चार वर्षांतला अमेरिकेचा बदलता स्वभाव अवघ्या जगाला बुचकळ्यात पाडणारा, निराश करणारा होता, हे मी जाणतो. हा देश दारं बंद करून घेतल्यासारखा वागतो आहे. आत्मकेंद्री आणि संकुचित विचारांनी अमेरिकेचा ताबा घेतला आहे. अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालामध्येही हा देशव्यापी ‘दुभंग’ दिसून येतो, त्याबद्दल अन्य विचारी जनांप्रमाणेच माझ्याही मनात खंत आहे; पण या देशाने सर्व प्रकारच्या विचारांना नेहमीच वाव दिलेला आहे. विचारांच्या लढाया अमेरिकेला नव्या नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांची संपूर्ण कारकीर्द या लढाईतच अमेरिकेने व्यतीत केलेली आहे. या वादग्रस्त कालखंडानंतर आता जो बायडेन सत्तारूढ होतील याबाबत माझ्यातरी मनात या घडीला संभ्रम नाही. त्यांची वाट अर्थातच सोपी नसेल; पण असा दुभंगाचा कालखंड अमेरिकेत या आधीही येऊन गेलेला आहे. वरवर चित्रं बदलत असल्याचं अनेकदा दिसलेलं आहे, पण अनुभव असा की या देशाच्या मुळातली लोकशाही मूल्यं अत्यंत पक्की आहेत. त्या मुळांपासून हा देश ढळत नाही, आणि तेच अमेरिकेचं सामर्थ्यही आहे!

गेला आठवडाभर सुरू असलेलं अमेरिकन निवडणुकीच्या निकालाचं कवित्व भारतीयांना आश्चर्यजनक वाटणं स्वाभाविक असले, तरी अमेरिकेनं आपली लोकशाही मूल्यं आणि लोकशाहीच्या प्रक्रियेतली पारदर्शिता जपण्यासाठी दिलेली ती किंमत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.

अमेरिकेची दारं बंद झाल्यासारखं अधूनमधून वाटू शकेल, हा देश आत्मकेंद्री बनला असून, जगातल्या कर्तृत्वाला आकर्षून घेण्याची अमेरिकेची क्षमता मंदावली आहे अशीही शंका येईल; पण स्वातंत्र्य-समान संधी-समान हक्क आणि सर्वंकष लोकशाही ही मूल्यं या देशाच्या रक्तात रुजलेली आहेत; ती मंदावलेली दिसली तरी पुन्हा नव्याने उसळी घेतील, आणि ‘अमेरिकन ड्रीम’ कधीही विझणार नाही!

- मी स्वत:च या ‘अमेरिकन ड्रीम’चं जीतंजागतं उदाहरण आहे!

sthanedar@aol.com

(अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील नवनियुक्त स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह)

मुलाखत आणि शब्दांकन : अपर्णा वेलणकर

Web Title: ‘American Dream’ will never go out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.