‘अमेरिकन गांधी’- मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 06:00 AM2021-04-04T06:00:00+5:302021-04-04T06:00:07+5:30
अमेरिकन कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून सर्व जगाला ओळख असणारे मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांनी आपल्या जीवनाची सुरुवात वडिलांप्रमाणे धर्मोपदेशक म्हणून केली. मात्र पुढील आयुष्य वर्णभेदविरोधी चळवळीसाठी अर्पण केले.
- एम. जी. बेग
अनेकदा एखादी साधी घटना एखाद्याच्या आयुष्याला अचानक वेगळे वळण देते. डिसेंबर १९५५ मध्ये शहर माँटेगोमेरी येथे रोझा पार्क्स या नागरी चळवळीतील कार्यकर्त्या बसमधून प्रवास करीत होत्या. एक गोरा माणूस बसमध्ये आला. रोझा पार्क्स यांना जागेवरून उठायला सांगू लागला. तेवढ्यातच बस ड्रायव्हरनेही रोझा यांना कायदा सांगून उठण्याचा इशारा केला; कारण ती रांग गोऱ्यांकरिता राखीव होती. मात्र, रोझा पार्क्स यांनी जागेवरून उठण्यास नकार दिला. त्यांना या गुन्ह्याकरिता अटक करण्यात आली आणि १० डॉलरचा दंडही भरावा लागला. कसा कोण जाणे या घटनेचा माँटेगोमेरीत उद्रेक झाला आणि कृष्णवर्णीय लोकांनी ‘बस बायकॉट’ आंदोलनाची सुरुवात केली. अनपेक्षितपणे त्याचे नेतृत्व एका तरुणाकडे आले. त्याने नुकतीच तत्त्वज्ञानात डॉक्टरेटही मिळविली होती. धार्मिक कुटुंबातील हा युवक महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने भारला गेला होता आणि त्याने त्याच मार्गाने लढा द्यायचा निश्चयही केला होता. बहिष्काराच्या नेतृत्वाच्या रूपाने त्याला ती संधी मिळाली होती. त्याच्या अहिंसक लढ्याची परीक्षाच यामुळे होणार होती. त्या बहिष्कार समितीचे रूपांतर माँटेगोमेरी इम्प्रुव्हमेंट असोसिएशनमध्ये झाले आणि अध्यक्षपदी त्या युवकाचीच निवड करण्यात आली. त्या युवकाचे नाव डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर). तेव्हापासून बहुसंख्य कृष्णवर्णीयांचे नेतृत्व त्यांच्याकडे आले ते कायमचेच. अमेरिकन कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून सर्व जगाला ओळख असणारे मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचा जन्म १५ जानेवारी १९२९ रोजी अटलांटा येथील एका गावात झाला. त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात वडिलांप्रमाणे धर्मोपदेशक म्हणूनच केली. मात्र पुढील आयुष्य वर्णभेदविरोधी चळवळीसाठी अर्पण केले. त्याकरिता त्यांना अनेकवेळा तुरुंगातही जावे लागले. बस बहिष्काराच्या प्रकरणानंतर १९५७ मध्ये किंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर्न ख्रिश्चन लिडरशिप कॉन्फरन्स (एससीएलसी) स्थापन केली. तिचे अध्यक्षपद किंग यांच्याकडे सोपविण्यात आले. त्या वर्षी लिंकन स्मारकाजवळ भाषण करताना कृष्णवर्णीयांना मतदानाचा अधिकार हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी घोषित केले.
किंग यांच्या चळवळीचा प्रभाव वाढला तो त्यांनी वॉशिंग्टन येथे काढलेल्या अडीच लाखांच्या विराट मोर्चामुळे. त्या मोर्चात डॉ. किंग यांनी केलेले ‘आय हॅव अ ड्रीम’ हे भाषण जगप्रसिद्ध ठरले. अमेरिकन समाजाचा दृष्टिकोन बदलणाऱ्या किंग यांना वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षीच नोबल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ‘टाइम’ मॅगझिनने त्यांची ‘मॅन ऑफ द इयर’ या सन्मानाकरिता निवड केली होती.
व्हिएतनाममधील अमेरिकन हस्तक्षेपाला किंग यांनी विरोध केला होता. त्यामुळे अनेक उदारमतवादी गोऱ्यांचा पाठिंबा त्यांनी गमावला होता. अशातच मॅफिसमधील कचरा कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी ते तेथे गेले असताना ४ एप्रिल १९६८ रोजी एका गौरवर्णीयाने त्यांची गोळ्या घालून हत्या केली, त्या वेळेस त्यांचे वय केवळ ३९ वर्षांचे होते. एक महान अध्याय अकालीच संपला....
(लोकमत संदर्भ विभाग, नागपूर)