अमेरिकन सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:33 AM2019-06-09T00:33:21+5:302019-06-09T00:37:03+5:30
कोल्हापूरचे किरण कर्नाड सपत्नीक अमेरिकेस गेले असून, त्यांचे तिथे काही कालावधीसाठी वास्तव्य आहे. आपल्या दौऱ्यात त्यांनी अमेरिकन लोकांच्या विचारसरणीचे आणि राहणीमानाचे केलेले वर्णन त्यांच्याच शब्दांत.... आठवड्यात शुक्रवारी अर्धा दिवस, तर शनिवार आणि रविवारी पूर्ण दिवस सुट्टी असते. आम्ही इथे
- किरण कर्नाड , डेटन, न्यू जर्सी
कोल्हापूरचे किरण कर्नाड सपत्नीक अमेरिकेस गेले असून, त्यांचे तिथे काही कालावधीसाठी वास्तव्य आहे. आपल्या दौऱ्यात त्यांनी अमेरिकन लोकांच्या विचारसरणीचे आणि राहणीमानाचे केलेले वर्णन त्यांच्याच शब्दांत....
आठवड्यात शुक्रवारी अर्धा दिवस, तर शनिवार आणि रविवारी पूर्ण दिवस सुट्टी असते. आम्ही इथे २४मे रोजी आलेल्या आठवड्यात तर सोमवारी २७मे रोजीही अमेरिकेत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांसाठी ‘मेमोरिअल डे’ (शहीद दिन)ची खास सुट्टी होती. अमेरिकन हा आपल्या कामाला जेवढे महत्त्व देतो, तेवढेच महत्त्व आपल्या कुटुंबीयांना देतो. त्यामुळे अशा सुट्ट्यांमध्ये तो इतर सर्व कामे बाजूला ठेवून कुटुंबीयांसाठी वेळ देतो. यंदाचा हा ‘वीकएंड’ मोठा असल्याने अमेरिकनांसाठी एक पर्वणी होती.
आम्हालाही समीर, अनुजाच्या मित्रांकडे अशाच एका पार्टीसाठी बोलाविले होते. त्यामुळे मुलांबरोबर आम्हीही दोघे होतो.... गाड्याबरोबर नळ्याचीही यात्रा...! ‘विकएंड’बद्दल सांगायचे असे की, अशा सुटीच्या वेळी बहुतेक नोकरदार अमेरिकन्स आपल्या कुटुंबीयांसमवेत आपल्या मोठ्या गाडीत (व्हॅन) किंवा यासाठी असलेल्या खास ‘जोडगाडीत’ कोल्ड्रिंक्सचे के्रटस्, थर्मोकोलचे मोठे आईसबॉक्स, फुटबॉल, बेसबॉल, एक-दोन छोट्या बोटी, खुर्च्या, एक-दोन छोट्या बाईक्स, चिकन वा फिश, गॅस शेगडी, टेंटचे सामान, आदी घेऊन दूरदूरवर जातात. येथे अमेरिकेत जंगलांना आणि हिरवळींना अजिबात ‘वानवा’ नाही! इथे रस्त्याच्या कडेला दूरदूरवर इतक्या मऊशार हिरवळी पसरलेल्या असतात की, या गालिचात पूर्णपणे लपेटून जावे असे वाटते.
याशिवाय प्रत्येक शंभर-दीडशे फुटांवर मस्तपैकी मुबलक प्रमाणात छोटी-छोटी जंगले असून, या जंगलांमध्ये छोटी-छोटी सरोवरेही (पाँडस्) आहेत. याठिकाणी ही प्रवासी मंडळी थांबतात. बच्चे कंपनी आणलेल्या खेळतात, तर अमेरिकन नवरा-बायको सोबत आणलेल्या छोट्या गॅसवर स्वयंपाक करतात. सोबत आलेले आजी-आजोबा त्यांना मदत करतात वा चक्क छोट्या-छोट्या नावेने सरोवरात विहार करतात. तोपर्यंत गॅसवर चिकन तयार होते. इथे अमेरिकेत अनेक रेडिमेड पदार्थ मिळतात. त्यामुळे सगळा स्वयंपाक करण्याची जरुरी नाही. या रेडिमेड गोष्टी तेलात तळल्या की खाण्यासाठी तयार...!
अमेरिकेची मंडळी शीतपेयाबाबत मात्र अगदी माहीर...! त्यांना पदोपदी ही शीतपेये लागतात. त्यामुळे सोबत कोल्ड्रिंक्सचा अक्षरश: के्रट नेला जातो. याबरोबरच भरपूर बर्फ असलेले थर्मोकोलचे आईसबॉक्स असतात. या बर्फात ही शीतपेये वा बीअरच्या छोट्या बाटल्या कायम थंड राहण्यासाठी ठेवल्या जातात. अमेरिकन माणूस हा व्यसनी नाही; त्यामुळे आठवडाभर तो कधीच मद्य घेत नाही. मात्र, आॅफिसमध्ये दैनंदिन काम करताना त्याच्या टेबलावर तुम्हाला सॉफ्ट ड्रिंक्सची बाटली दिसेल. हा अमेरिकन सिगारेटचा मात्र अतिशौकीन आहे. आॅफिसमध्ये तो सिगारेट ओढत नाही; नव्हे तशी परवानगी नाहीच.. पण अर्ध्या तासाने लहर आली तर असे दोघे-तिघे गटागटाने बाहेर येऊन झुरके मारताना दिसतात. अमेरिका जरी अत्यंत स्वच्छतेची भोक्ती असली तरी सिगारेटची थोटकी मात्र मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेली दिसत होती; हे मला प्रकर्षाने जाणवले.
इकडे लंच तयार झाल्यानंतर सोबत आणलेल्या वाईन, व्हाईट रम, बीअर, क्लब सोडाच्या घोटाबरोबर चिकन फिशचा स्वाद घेतला जातो. विकएंडमुळे येथे मद्य घेतले जाते. पुरुषांबरोबर काहीवेळा महिलाही मद्य घेतात. धूम्रपानही करतात. यात या सर्वांना कोणतीही गोष्ट निषिद्ध मानली जात नाही. किंबहुना एखादा याचा आस्वाद घेत नसेल तर मात्र ‘आश्चर्य’ व्यक्त केले जाते. भोजन झाल्यानंतर व्हॉलिबॉल, फुटबॉल, क्रिकेट, बायकिंग, आदी खेळ खेळले जातात. बºयाचवेळा अमेरिकन्स टेंटस् लावून दिवसभर इथेच राहतात. तसे इथे जंगली श्वापदांचे वा सरपटणाºया प्राण्यांचे अजिबात भय असत नाही. दिसलीच तर असंख्य हरणे व ससे.