अमृतशेती

By admin | Published: June 7, 2014 07:07 PM2014-06-07T19:07:08+5:302014-06-07T19:07:08+5:30

शिक्षणसंस्था काढायच्या, त्यातून पैसा कमवायचा, तो राजकारणात वापरायचा. त्याशिवाय या संस्थांमधील कर्मचारी घरचे नोकर असल्यासारखे वापरायचे, असेच आजकाल सुरू आहे. मात्र, यालाही अपवाद असतात. जुन्या पिढीतील अशाच एका नेत्याची गोष्ट.

Amritasheti | अमृतशेती

अमृतशेती

Next

 प्रा. डॉ. द. ता. भोसले

 
जिल्हा पातळीवर बर्‍यापैकी काम असलेल्या, बर्‍यापैकी नाव असलेल्या आणि बर्‍यापैकी मान असलेल्या एका राजकीय नेत्याच्या जीवनात घडलेली ही घटना आहे. त्यांचे नाव आहे आनंदराव पाटील असे. राजकारण, शेती आणि सहकार क्षेत्रांबरोबरच त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून एक शिक्षणसंस्था स्थापन केली. खरे तर एका ध्येयवादी शिक्षकाने स्थापन केलेली, परंतु नंतर बंद पडलेली शिक्षणसंस्था त्यांनी घेतली. जीव ओतून तिचा विस्तार केला. त्यातूनच आता त्यांची पाच-सहा माध्यमिक विद्यालये, एक डी.एड. कॉलेज, दोन कनिष्ठ महाविद्यालये व दोन-तीन वसतिगृहे एवढा शिक्षणविषयक पसारा झाला आहे. अवतीभवती शिक्षणाच्या अमृतभूमीत भ्रष्टाचाराची कीड, वशिलेबाजीचे तण आणि अशैक्षणिक गोष्टींची रोगराई उदंड स्वरूपाची माजलेली असतानाही या आनंदरावांनी मात्र अमृताची शेतीच इमानेइतबारे पिकविली. पुस्तकामध्येही अस्पष्ट होत चाललेले आणि क्वचितच सापडणारे ज्ञान, चारित्र्य, संस्कार आणि उपजत कौशल्यांचा विकास यांचेच ते निष्ठेने पीक घेत गेले. या अमृताच्या शेतीचा स्पर्श आणि गंध त्यांच्याही आयुष्याला लागला असावा. म्हणून निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणारा फौजफाटा म्हणून त्यांनी शाळेकडे पाहिले नाही. 
कसलेही भांडवल न गुंतवता, जोखीम नसलेला व अशा काळात भरपूर नफा देणारा प्रतिष्ठाप्राप्त धंदा म्हणून त्यांनी शाळेकडे पाहिले नाही. बिनपैशांचे चार नोकर कामाला मिळावेत, इशारा करताच गोंडा घोळणारे चार आ२िँं१्रूँं१त पायांजवळ लोळत पडलेले असावेत आणि सकाळी सकाळी अपेक्षा न करता चार नमस्कार आपणाला लाभावेत, या हेतूनेही त्यांनी शिक्षणसंस्थेकडे पाहिले नाही. तालुक्याच्या राजकारणात तारुण्याच्या उन्मादापोटी त्यांचा थोरला सुपुत्र चार वेडीवाकडी पावले टाकतो. कधी कधी या अमृताच्या शेतात घुसून नासधूस करावी असे म्हणतो खरा; पण आनंदरावांनी त्याला ती संधी दिली नाही. त्याला शिक्षणसंस्था म्हणजे फारसे खायला न घालता, भरपूर दूध देणारी, न आटणारी म्हैस वाटते; तर आनंदरावांना माणसाला जगविणारी, जागविणारी आणि जगणं शिकविणारी ज्ञानसरिता वाटते. या जलतीर्थात माणसाने आपल्या नासक्या अपकृत्यांची घाण करूनये, असे त्यांना वाटते. त्यासाठी ते डोळ्यांत तेल घालून आपल्या अमृताच्या शेतीला जपत असतात. 
असा हा सेवा आणि स्वार्थ यांच्यातला सुप्त आणि नि:शब्द वाद सुरू असतानाच आनंदरावांच्या कसोटीचा एक प्रसंग निर्माण झाला, तोही त्यांच्या घरातूनच. त्यांच्याच शिक्षणसंस्थेत शिकून पदवीधर झालेली, त्यांची अतिशय लाडकी असलेली एकुलती एक कन्या अनुराधेचा विवाह नुकताच ठरविला. तारीखही नक्की केली. घरातला हा पहिलाच विवाह असल्याने मोठय़ा थाटामाटाने, लोकांच्या कायम स्मरणात राहील असा दिमाखदार, आपल्या वैभवाला-सार्वजनिक प्रतिष्ठेला शोभणारा आणि प्रतिष्ठा उंचावणारा असा तो असावा, असे आनंदरावांच्या चिरंजीवांना- म्हणजे विक्रमराजांना-वाटत होते. त्यातून त्यांना राजकीय फायदा घ्यावा, असे वाटत होते. राजकारणातला पुढचा प्रवास सुलभ व्हावा, असे विक्रमराजाचे गणित होते. त्यासाठी आपल्या पिताश्रीने पाण्यासारखा पैसा खर्च करावा; या कार्यावर उधळावा, असे त्यांना मनापासून वाटत होते. आणि तो वडिलांकडे सातत्याने आग्रह करीत होता. याउलट, विवाह हा घरगुती मामला आहे. तो धार्मिक आणि संस्कारस्वरूप विधी आहे. तालुका आणि जिल्ह्यातील सर्व मान्यवरांना आमंत्रण दिले तरी; तसेच गोरगरीब आणि जवळच्या नातेवाइकांना आमंत्रित केले तरी, त्याचे स्वरूप, त्याचे पावित्र्य नष्ट होऊ नये, असे त्यांना वाटे. विवाहाच्या माध्यमातून आपल्या श्रीमंतीचे उथळ आणि ओंगळवाणे प्रदर्शन केले, असे कुणाला वाटू नये, ही त्यांची धारणा होती. किती कोटी खर्च केले, यावर विवाहाचे मूल्यमापन होणे त्यांना मान्य नव्हते.
आपल्या अंगभूत सात्त्विकतेच्या आधारे त्यांनी असे ठरविले, की आपल्या शिक्षणसंस्थेतील एकाही शिक्षकाला आणि सेवकाला यासाठी गुलामाप्रमाणे राबवून घ्यायचे नाही. शिक्षणसंस्थेतील एकही वस्तू उदा. खुच्र्या, टेबल, सतरंज्या, भांडी, शोभेच्या वस्तू या विवाहासाठी घ्यायच्या नाहीत. या सोहळ्यासाठी एकाही नोकराकडून प्रेमळ दमदाटी करून सक्तीची वर्गणी गोळा करायची नाही आणि कुणाकडूनही आहेराच्या रूपाने भेटवस्तू स्वीकारायच्या नाहीत. विक्रमराजेंना हे कळताच त्याने कडाडून विरोध केला. वडिलांना भेटून रागाने लालबुंद होत तो म्हणाला, ‘‘ बाबा, हे काय चालवले तुम्ही? तुमच्या इतमामाला शोभणारी; तुमची राजकीय इमेज उंचावणारी गोष्ट आता करायला हवी. सार्‍या राजकीय पुढार्‍यांचा थाटाने सन्मान केला पाहिजे. त्यांना उत्तम भोजन, उत्तम निवास आणि उत्तम सेवा दिली पाहिजे. त्यांना चांगल्या भेटवस्तू दिल्या पाहिजेत. त्यांची स्पेशल सोय केली पाहिजे आणि आपला विवाह असा झाला पाहिजे, की त्याची सार्‍या जिल्ह्यात चार-सहा महिने तरी चर्चा झाली पाहिजे. भेटणार्‍या प्रत्येकाने कौतुकाने शाबासकी दिली पाहिजे. आजकाल विवाह हे असेच करायचे असतात. आता गेला तुमचा जमाना सुताचे हार गळ्यात घालून घेण्याचा.’’
आनंदरावांनी शांतपणे ऐकून घेतले. त्याच्या समाधानासाठी तात्पुरती मान हलविली. आणि घरात आईजवळ भावाने केलेली बडबड ऐकल्याने अस्वस्थ झालेल्या अनुराधाने तिच्या बाबांची भेट घेतली. आनंदरावांच्या शेजारी ती बसताच आनंदरावांनी तिला प्रेमाने थोपटले. ‘‘बोल बेटा, तुला काय हवे?’’ असं त्यांनी म्हणताच अनुराधा त्यांना म्हणाली, ‘‘बाबा, दादा म्हणतो तसा तुम्ही माझ्या लग्नात भपका- थाटमाट करू नका. मला ते अजिबात आवडत नाही. माझे तुम्ही खूप लाड केलेत. माझ्यावरील प्रेमापोटी किंवा आपल्या घरातला पहिला विवाह म्हणून तुम्हाला तो मोठय़ा थाटा-माटात व्हावा, असं वाटणं स्वाभाविक आहे. दादा सांगतो तशी एकही गोष्ट करू नका. लग्नाला येणारे सारेच आपले सन्माननीय असतात. त्यातल्या काही लोकांना स्पेशल ट्रिटमेंट देणे, स्पेशल भेटवस्तू देणे बरोबर वाटत नाही. सारेच आपल्यावर प्रेम करतात. ते प्रेम आहे म्हणून ते लग्नाला येतात. ते काही लग्नाचा थाटमाट बघायला येत नसतात. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती अशी, की हजारो रुपयांचे फटाके व शोभेचे दारूकाम यांवर खर्च करू नका. मंडप आणि स्टेजसाठी खूप खर्च करून सजावट करू नका. नजरेत भरणारं स्टेज महत्त्वाचं नसतं. शिवाय, तुमच्या श्रीमंतीचं ओंगळ दर्शन होईल, असं काहीच करू नका. त्याऐवजी आपल्या वसतिगृहातील मुलांना पोटभर जेवायला घाला. त्यांना गोडधोड खायला द्या. यातला पैसा वाचवून गरिबीमुळे औषधोपचार करता न येणार्‍या आजारी माणसांना तुम्ही स्वखर्चाने औषध पुरवा. अन् आणखी एक माझा हट्ट पुरा करा, नाही म्हणू नका.’’ असं म्हणून ती क्षणभर थांबली. त्यावर आनंदराव म्हणाले, ‘‘सांग, बेटा, सांग, तुझा हट्ट सांग.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘बाबा, माझ्या मैत्रिणीचा विवाहही याच मांडवात करा. ती खूप गरीब आहे. तिची विधवा आई मोलमजुरी करते. म्हणून तुम्हीच तिचेही कन्यादान करा. तुम्हाला डबल पुण्य मिळेल.’’ कमालीचे आनंदी झालेल्या तिच्या बाबांनी लेकीचं मोठय़ा प्रेमानं आपल्या छातीवर मस्तक घेऊन थोपटायला सुरुवात केली. 
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व 
नवृत्त प्राचार्य आहेत.)

Web Title: Amritasheti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.