आनंदी गोपाळ : चरित्रपट की चारित्र्यहननपट?; खरी आनंदी वेगळीच होती!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 11:45 AM2019-03-31T11:45:30+5:302019-03-31T11:50:32+5:30
कपोलकल्पित प्रसंगांची उतरंड रचून कृत्रीम रित्या नाट्य फुलविण्याच्या नादात व्यक्तिचित्रणाकडे दुर्लक्ष झालं आहे.
>> अंजली कीर्तने
३१मार्च १८६५ रोजी महाराष्ट्रामधील पुणे नगरीत एका विलक्षण स्त्रीचा जन्म झाला. ती स्त्री म्हणजे पहिल्या भारतीय स्त्री-डॉक्टर आनंदीबाई जोशी. आज त्यांचा एकशे चौपन्नावा जन्मदिवस आहे. एकोणिसाव्या शतकात स्त्री-शिक्षण हे महापातक होतं. समुद्रोल्लंघन केल्यास प्रायाश्चित्त घ्यावं लागत होतं. ‘न स्त्रीम् स्वातंत्र्यमर्हति’ हे घोषवाक्य केवळ उच्चारण्यापुरतंच नव्हतं. ते अभिमानानं प्रत्यक्षात उतरवलं जात होतं. अशा सनातनी काळात आनंदी अमेरिकेत जाऊन डॉक्टर झाली. पती गोपाळराव यांनी तिला खंबीर आधार दिला. या कर्तृत्ववान स्त्रीनं भारतीय स्त्रियांसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडून दिले. दीड शतकांनंतरही आनंदीची ही मनोज्ञ यशोगाथा मनाला भुरळ पाडते. तिच्या वाट्याला अवघं २१-२२ वर्षांचं आयुष्य आलं. पण ती आज एकविसाव्या शतकातही जिवंत आहे. तिच्यावर कादंबरी, नाटक, लघुपट, दूरदर्शन मालिका निर्माण झाली. कोणी एकपात्री प्रयोग केले तर कोणी तिच्या चरित्राचं अभिवाचन केलं. स्वप्न पाहणाऱ्यांची आणि ती प्रत्यक्षात उतरवू पाहणाऱ्यांची आनंदी प्रेरणा बनली. वादळात फडफडणाऱ्या ज्योतीनं कित्येक मनं प्रज्ज्वलित केली.
आनंदीबाईंची जीवनकथा किती प्रेरक आहे, याचा अनुभव मी माझ्या वैयक्तिक जीवनात घेतला आहे. १९९१ साली मी आनंदीच्या चरित्रावर संशोधन करण्यासाठी अमेरिकेतील तिच्या कॉलेजात अभ्यास करत होते. त्या वेळी अशोक गोरे आणि त्यांचे स्नेही विराज सरदेसाई यांच्या मदतीनं मी पोकीप्सीच्या दफनभूमीतील आनंदीची समाधी शोधली. आनंदीला अमेरिकेत माहेरघर देणाऱ्या थिओडोसिया कार्पेटर यांची ही माहेरची दफनभूमी. आनंदीच्याच अंतिम इच्छेनुसार तिचा रक्षाकलश इथे पुरला गेला. मरणानंतरही तिला तिच्या लाडक्या मावशीजवळ राहावंसं वाटत होतं. माझा शोधयात्रेतला तो अपूर्व दिवस, माझं जीवन बदलणारा ठरला. आनंदीचं हे चिरविश्रांतिस्थान पाहताना आपण आनंदीबाईंवर लघुपट करावा, अशी प्रेरणा मनात निर्माण झाली. हेच स्वप्न उराशी घेऊन मी भारतात परतले. चरित्रलेखनाआधी मी लघुपट केला. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. सर्वोत्कृष्ट लघुपटाचं पारितोषिक मिळालं. अमेरिकेतील बाल्टिमोरच्या मराठी अधिवेशनात तो दाखवला गेला. आजही त्या लघुपटाला मागणी आहे. त्यामुळे माझी उमेद वाढली. लघुपटासारख्या समर्थ माध्यमानं मला झपाटून टाकलं. गेली २५ वर्षं अनेक विषयांवर मी संशोधनपर लघुपट केले आहेत. आज मी जी काही आहे ती आनंदीमुळेच. ती भेटली नसती तर लघुपट माध्यम मला गवसलंच नसतं.
नुकताच आनंदीगोपाळ हा चित्रपट येऊन गेला. त्यातील श्रेयनामावलीत विशेष आभारात माझं नाव घातलं आहे. त्यामुळे अनेकांचा असा समज झाला की हा चित्रपट माझ्या संशोधनावर आधारित आहे. अथवा माझा यात सहभाग आहे. परंतु माझा या चित्रपटाशी काहीही संबंध नाही. माझ्या संशोधनावर हा चित्रपट आधारित नाही. माझ्या नावाचा उल्लेख करताना मला कळविण्यात आलं नव्हतं वा परवानगीही घेतली नव्हती. तेव्हा या चित्रपटातील चुकांना, उणिवांना व विपर्यस्त चित्रणाला मी जबाबदार नाही, हे मी जाहीरपणे सांगू इच्छिते.
सध्या लोकप्रिय वा इतिहासप्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक चित्रपट अथवा बायोपिक्सचं अमाप पीक आलेलं आहे. चित्रपट हे सर्वदूर पसरणारं, प्रभावी माध्यम आहे. आजकाल वाचनापेक्षा अवलोकन जास्त प्रमाणात होतं. लोकं जे पाहतात त्यावर विश्वास ठेवतात. चरित्रात्मक लघुपट ही एक जोखमीची आणि गंभीर स्वरूपाची सांस्कृतिक जबाबदारी आहे. पात्राच्या चरित्राचं, व्यक्तिमत्त्वाचं, चारित्र्याचं व काळाचं भान राखून, सत्याशी प्रतारणा न करता, घटनाप्रसंग पुनरुज्जीवित करणं अपेक्षित असतं. चरित्रात्मक लेखन व लघुपटनिर्मिती करताना मी हे पथ्य पाळलेलं आहे. कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली आणि काल्पनिकतेच्या अतिरेकामुळे आनंदी गोपाळ या चरित्रपटात मनमानी बदल केले आहेत. त्यातून चारित्र्यहनन झालं आहे. पात्रांविषयी चुकीचे संदेश गेले आहेत. ही बाब दुर्लक्षिण्यासारखी नाही. त्याला वाचा फोडणं हे संशोधक म्हणून माझं कर्तव्य आहे.
कपोलकल्पित प्रसंगांची उतरंड रचून कृत्रीम रित्या नाट्य फुलविण्याच्या नादात व्यक्तिचित्रणाकडे दुर्लक्ष झालं आहे. आनंदी, तिचे वडील गणपतराव, कार्पेंटरमावशी आणि अमेरिकेतील तिचे स्नेहीजन यांच्यावर अन्याय झाला आहे. गणपतराव हे स्त्रीशिक्षणाच्या बाजूनं होते. यमुना उर्फ आनंदी ही तल्लख बुद्धीची आहे, याचं भान पहिल्यांदा त्यांनाच आलं होतं. घरच्या मंडळींचा विरोध असतानाही त्यांनी तिला शिकवलं. त्यांच्या घरी येणं-जाणं असलेल्या गोपाळरावांशी जर तिचं लग्न झालं तर ते तिला धडाडीनं शिकवतील असा त्यांचा कयास होता. लग्नापूर्वीही गोपाळरावांनी तिला शिकवलं होतं. ही माहिती खुद्द आनंदीनंच अमेरिकेतील तिची मैत्रीण कॅरोलीन डॉल हिला दिली होती. परंतु चित्रपटात गणपतरावांना स्त्रीशिक्षणाचे विरोधक ठरवलं आहे. आनंदीला शिक्षण देण्यापासून गोपाळरावांना परावृत्त करताना चित्रपटातील गणपतराव म्हणतात, ‘‘कुलवंतांच्या घरात मुलींना शिकवणं शोभेल का? स्त्रीचा महत्त्वाचा गुण म्हणजे संसारदक्षता.’’ आनंदीचे वडील जसे होते तसे का रंगवले नाहीत? असा अन्याय करणं अत्यंत गैर आहे. आनंदी आणि तिचे वडील यांतील नातं अतिशय मधुर आणि त्या काळातील बापलेकींच्या नात्यापेक्षा वेगळं, अधिक मनमोकळं होतं. गणपतराव हे काळाच्या पुढे गेलेले होते. मग त्यांना परंपरावादी ठरविण्याचं कारण काय?
‘मी अमेरिकेला एकटी जाईन,’ असा एकदा शब्द दिल्यावर आनंदीबाई त्यावर सदैव ठाम राहिल्या. कधीच मागे हटल्या नाहीत. चित्रपटातील आनंदी मात्र, ‘‘का तुमचा मला अमेरिकेला पाठवायचा हट्ट?’’, ‘‘तुम्ही येणार नसाल तर मी जाणार नाही.’’ अशी विधानं करून अमेरिकेला एकटीनं जायची अनिच्छा सतत दर्शविते. बोटीवर बसेस्तोवर तिची चिडचिड चालू असते. ती भेदरलेली वाटते. गोपाळराव जणू तिच्या मनाविरुद्ध तिला अमेरिकेला पाठवत होते, असा गैरसमज त्यातून निर्माण होतो. हे चित्रण ध्येयनिष्ठ आनंदीला कमी लेखणारं, तिच्यावर अन्याय करणारं आहे. आनंदी अमेरिकेत असताना तिच्या यशामुळे गोपाळरावांच्या मनात मत्सर जागा झाला आणि त्यांनी तिचा परोपरीनं मानसिक छळ केला. तिच्यावर नाही नाही ते आरोप केले. तिची प्रचंड ऊर्जा त्यांची समजूत घालण्यात वाया गेली. याची दखल मात्र या चित्रपटात घेतलेली नाही.
गोपाळराव आनंदीला तपासणीसाठी एका इंग्रज डॉक्टरकडे नेतात हा असाच एक खटकणारा प्रसंग आहे. यातून आनंदीच्या डॉक्टर होण्यामागील मूळ प्रेरणेवरच घाला घातला आहे. या देशाला स्त्रीवैद्यांची जरुरी आहे, कारण स्त्रिया पुरुषांकडून तपासून घेत नाहीत, हे आनंदीला अनुभवातून जाणवतं. मग तीच आनंदी पुरुष डॉक्टरकडून तपासून घेते हे आवर्जून दाखवायचं कारण काय? गोपाळरावांची थोरवी गाण्यासाठीच हा प्रसंग निर्माण केला असावा. हा चित्रपट नक्की कोणाचा आहे? आनंदीचा, गोपाळरावांचा का दोघांच्या सहजीवनाचा? या प्रश्नाचं उत्तर शोधताना पटकथाकाराचा कल गोपाळरावांकडे जास्त झुकला आहे. गोपाळरावांना प्रागतिक दाखविण्याच्या नादात आनंदीकडे दुर्लक्ष झालं आहे. त्यातून चरित्राचा तोल ढळला आहे.
आनंदीच्या लग्नानंतर तिची आजी आणि गोपाळरावांचा भाऊ त्यांच्याजवळ राहात असतात. यांचं रूपांतर गोपळरावांच्या पहिल्या बायकोची आई विमलाबाई आणि त्यांचा मुलगा कृष्णा यांच्यात करण्याचं कारण काय? पात्रांची पार्श्वभूमी बदलणं हा सत्याचा अपलाप आहे. त्यातून काय साधलं? या मुलाला गावकरी पळवून नेतात. त्याची विटंबना करतात. गोपाळराव व त्यांची फौज हातात मशाली घेऊन त्याला शोधायला निघतात. मशालीच का? कंदील का नाहीत? गावातल्या प्रत्येक घरात मशाली होत्या का? दिग्दर्शक सुंदर दिसणाऱ्या शॉटच्या मोहात पडला, असंच म्हणावं लागेल. पण या प्रकारात कथावस्तू भरकटते आहे; नको त्या गोष्टी जागा व्यापत आहेत, याचं भान राहिलं नाही. अलिबागला आनंदी गोपाळ फिरायला गेले असताना ते तिच्यासाठी गजरा विकत घेऊन माळतात आणि आपल्या या कृतीनं चकित झालेल्यांशी जोरजोरात वाद घालत बसतात. हा प्रसंगही नाटकी वाटतो. त्या काळच्या बायका केसात हौसेनं फुलं माळत, हे खरं. पण गजरा विकत घेऊन माळणं हे गरती स्त्रियांचं लक्षण मानत नसत. तेव्हा अलिबागसारख्या खेड्यात, मालाला उठाव नसताना, कोणता वेडा गजरे विकत बसेल?
या जोडप्याला झालेला समाजविरोध सुबक आणि वास्तवपूर्ण प्रसंगातून उभा केला असता तर तथाकथित सिनेमॅटिक फापटपसाऱ्याची गरज भासली नसती. पण त्या दिशेनं प्रयत्नच केला गेला नाही. अनेक काल्पनिक प्रसंगांची कंटाळवाणी लांबण लावून भरपूर फूटेज वाया घालवलं आहे. ती जागा आनंदीच्या जीवनातील अर्थपूर्ण प्रसंगांना दिली असती तर तिचं प्रगल्भ व्यक्तिमत्त्व रेखीवपणे उभं राहिलं असतं.
चित्रपटातील आनंदी बंगाल मेडिकल कॉलेजात जाते म्हणे! कोठून आलं हे स्त्रियांना प्रवेश देणारं बंगालचं कॉलेज? त्या काळी फक्त मद्रास मेडिकल कॉलेजनं अपवाद म्हणून कृपाबाई खिस्ती या मुलीला प्रवेश दिला होता. हे श्रेय बंगालचं नव्हे. शिवाय हिंदुस्तानात शिक्षणाची सोय होती, तर मग आनंदी कशाला अमेरिकेला गेली? बंगालमधील श्रीरामपूर गावी आनंदीनं ‘‘मी अमेरिकेस का जात आहे,’’ या विषयावर अस्खलित इंग्रजीत जाहीर भाषण देऊन, विरोधकांना धीरोदात्तपणे उत्तर दिलं होतं. त्यामुळे विरोधक नरमले. ब्रिटिश मंडळींनी आणि वृत्तपत्रांनी तिचं कौतुक केलं. आनंदीच्या या भाषणातला काही अंश जरी चित्रित केला असता तरी तिचं व्यक्तिमत्त्व झळाळून उठलं असतं.
गोपाळरावांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारून परत हिंदू धर्मात प्रवेश केला, ही घटना आनंदीच्या मृत्यूनंतरची! त्याचा आनंदीशी काहीही संबंध नव्हता. गोपाळरावांनी आनंदीला चर्चमध्ये नेणं, पाद्र्यानं तिला सौभाग्यलेणी उतरवायला लावणं अथवा पदवीदान समारंभात गोपाळरावांनी शिट्टी वाजविणं आणि आनंदी गोपाळांनी मिठी मारणं हा कालविपर्यास आहे. अतिरंजिततेचा कळस आहे. अकारण चुकीचे तपशील वापरून त्यावर कल्पित घटनांचे इमले रचलेले आहेत आणि महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आहे. याचं ठळक उदाहरण म्हणजे आनंदीचं अमेरिकेतील जीवन!
अमेरिका ही आनंदीची कर्मभूमी होती. याच देशात तिचं डॉक्टर व्हायचं स्वप्न साकार झालं. थिओडोसिया कार्पेंटर आणि त्यांचे कुटुंबीय यांनी तिला हक्काचं घर दिलं. मायाममतेनं वागवलं. तिची काळजी वाहिली. तिला शारीरिक, मानसिक, भावनिक आधार दिला. या कुटुंबाप्रमाणेच, कॉलेजच्या डीन बॉडले व आणि अन्य शिक्षिका, मैत्रिणी, कॅरोलीन डॉलसारखी ज्येष्ठ लेखिका यांच्याशी तिचे उत्कट भावबंध जुळले होते. या मंडळींना चित्रपटात स्थानच दिलेलं नाही. कार्पेंटरमावशी फक्त एकदाच दाताच्या दवाखान्यात बसलेल्या दिसतात तेवढ्याच!
महत्त्वाच्या पात्रांना, त्यांच्यातील भावसंबंधांना गाळणं; अनिवार्य प्रसंग हद्द्पार करणं, वस्तुनिष्ठता गमावणं, चरित्रपट करणं ही एक जबाबदारी आहे, याचं भान न ठेवणं आणि उपलब्ध संशोधनाचा उपयोग करून न घेणं यांमुळे चरित्राची अपरिमित हानी झाली आहे. आनंदी गोपाळांचं काम करणाऱ्या अभिनेत्यांनी घेतलेली मेहनत अंगी लागलेली नाही. आनंदीगोपाळांचं जीवन मुळातच प्रासंगिक, सामाजिक, वैचारिक, भावनिक नाट्यानं आणि समरप्रसंगांनी ओतप्रोत भरलेलं आहे. वास्तवाशी इमान राखून चित्रपटनिर्मिती करणं अशक्य नव्हतं. चरित्राचा सखोल अभ्यास न केल्याचे परिणाम चित्रपटाला भोगावे लागले आहेत. त्यामुळे हा चरित्रपट चारित्र्यहननपट बनला आहे.
anjalikirtane@gmail.com
(अंजली कीर्तने या प्रसिद्ध इतिहास संशोधक असून आनंदीबाई जोशी आणि दुर्गा भागवत यांच्यावरील त्यांचे संशोधनपर ग्रंथ आणि लघुपट प्रसिद्ध आहेत.)