पुणेरी कट्टा- पुतळ्यावर काढला राग!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 07:00 AM2018-11-25T07:00:00+5:302018-11-25T07:00:04+5:30

पुणे शहरात प्रवेश करताच आपण कोणत्याही रस्त्यावरून जा, आपणास अनेक पुतळे दिसतात.

angry on the statue! | पुणेरी कट्टा- पुतळ्यावर काढला राग!

पुणेरी कट्टा- पुतळ्यावर काढला राग!

Next

-अंकुश काकडे- 
पुणे शहरात प्रवेश करताच आपण कोणत्याही रस्त्यावरून  जा, आपणास अनेक पुतळे दिसतात. अर्थात, अनेक पुतळे असे आहेत, की ते थांबून चबुतऱ्यावर काय लिहिले आहे ते वाचल्याशिवाय समजत नाही. आजमितीस महापालिकेकडे २० पूर्णाकृती, तर २५ अर्धपुतळ्यांची नोंद आहे. याशिवाय, खासगी संस्थांमध्ये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये असलेल्या पुतळ्यांची नोंद नाही. काही पुतळ्यांतील व्यक्तींची जयंती अथवा पुण्यतिथी याचीदेखल महापालिकेकडे नोंद नाही. शहरातील काही महत्त्वाचे पुतळे जे महापालिकेने बसविले, त्यांचीदेखील नोंद महापौर कार्यालयाकडे दिसत नाही. त्यात इंजिनिअरिंग चौकातील शंकरराव मोरे, बालगंधर्वजवळील आचार्य अत्रे; एवढेच काय राणी लक्ष्मीबाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची, तसेच बालगंधर्व रंगमंदिरातील पुतळ्याचीदेखील नोंद दिसत नाही.
पूर्वी एखादा राष्ट्रीय पुरुष, नेता यांचे स्मारक म्हणून शहरात पुुतळे उभारले जायचे, त्याची योग्य ती निगा राखली जायची, पावित्र्य राखले जायचे, संरक्षणाची योग्य ती काळजी घेतली जाई. शहर लहान होते; त्यामुळे पुतळ्यांची संख्यादेखील मर्यादित होती. एखादी संस्था पुतळा करीत असे, तो महापालिकेकडे सुपूर्त करीत असे. पुढे महापालिकेतर्फे तो शहराच्या योग्य त्या चौकात, उद्यानात किंवा योग्य त्या ठिकाणी बसविला जाई. अनेक वेळा पुतळा १० हजार रुपयांचा, पण चौथºयाचा खर्च लाखो रुपयांचा; शिवाय तेथे विद्युत व्यवस्था, कंपाऊंड वगैरे खर्च वेगळाच. पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर महापालिका त्याची सर्व व्यवस्था करीत असे. चौक सुशोभित करण्यासाठी म्हणून काही ठिकाणी वेगळे पुतळे असे केले जात. त्यात कोर्टाजवळील चौकातील कामगाराचा पुतळा, येरवडा चौकातील शेतकरी दाम्पत्याचा पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील स्वातंत्र्यसंग्राम स्मृतिस्तंभ आहेत. पण या सर्वांत पुण्यात लक्ष वेधणारा राधेचा पुतळा जो सध्याच्या रिगल हॉटेलसमोरील चौकात होता. राधेच्या कळशीतून कारंज्यातून पडणारे पाणी आणि त्याचे तुषार जाणाºया-येणाºयांना सुखद अनुभव देत होते. पुढे वाहतुकीच्या कारणास्तव तो हलविण्याचा निर्णय झाला; पण पुणे येथे वादाला हेही कारण पुरे होते. अनेकांनी तो हलविण्यास विरोध केला. शेवटी एका मध्यरात्रीतून तो तेथून हलविण्यात आला. पुढे पुढे हे असे पुतळे उभारण्याचे प्रस्थ वाढत गेले. रस्तारुंदीत, वाहतुकीस अडथळा होणारा पुतळा हलविण्यासंदर्भात ज्यांनी पुतळा दिला त्या समितीची, संबंधित व्यक्तीची संमती घेणे आवश्यक. मग काय, काही ठिकाणी त्या पुतळ्याच्या नातेवाइकांची मतभिन्नता आडवी येते; पण काही पुतळे हलविण्यासंदर्भात काही कुटुंबीयांनी निश्चित सहकार्य केले. त्याचा जरूर उल्लेख करावा लागले. त्यात माजी महापौर बाबूराव सणस यांच्या कुटुंबीयांनी दिलेली संमती, टिळक रोडवरील वसंतदादांचा पुतळा हलविण्यासंदर्भात वसंतदादांच्या कुटुंबीयांनीदेखील लगेच संमती दिली, दीप बंगला चौकातील प्रमोद महाले यांचा पुतळा हलविण्यासाठी महाले कुटुंबीय लगेच पुढे आले. महापालिकेसमोर असलेला विणेकरी भाऊसाहेब बहिरट यांचा पुतळा हलविण्यास अतुल बहिरट कुटुंबीयांनी कुठलीच आडकाठी केली नाही. शनिवारवाड्यासमोर असलेला काकासाहेब गाडगीळ यांचा पुतळा हलविण्यालाही गाडगीळांच्या कुटुंबीयांनी संमती दिली आहे. (पण, खरं म्हटलं तर त्या ठिकाणी पुतळा बसवू नये, दुसरी कुठलीही जागा पाहा, असं खुद्द कै. विठ्ठलराव गाडगीळ यांचं मत होतं; पण त्या वेळी एका आमदारानं आग्रहानं मत मांडलं, नाही तिथंच पुतळा बसवायचा येथून रोज हजारो पुणेकर जातात, त्यांना काकासाहेबांचं दर्शन होईल.) काकासाहेबांचा अर्धपुतळा टिळक रोडवरही आहे. तेथे हा पूर्णाकृती पुतळा बसवावा, असा एक प्रस्ताव आहे. सातारा रस्ता, लक्ष्मीनारायण चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा वाहतुकीला अडथळा येतो म्हणून विनातक्रार हलविला गेला. 
पुतळा बसविण्याबाबतही काही अंधश्रद्धा आहे. एका नेत्याचा अर्धपुतळा दक्षिणेकडे तोंड करून होता; त्या चौकात कायम अपघात होत. कुणीतरी सांगितले, पुतळ्याचे तोंड पूर्वेकडे करा. झालं! महापालिकेला लाख-दीड लाखांचा भुर्दंड. पुतळ्याचे तोंड पूर्वेकडे केले; पण अपघातांचे प्रमाण कमी न होता वाढतच गेले. वडील आणि मुलगा दोघांचेही पुतळे पुणे शहरातच पाहावयास मिळतील. ज्ञानेश्वर पादुका चौकात शेटीबा काळूराम कुसाळकर यांचा पुतळा, तर गोखलेनगर येथे त्यांचे वडील काळूराम तमन्ना कुसाळकर यांचा पुतळा.  
काही पुतळ्यांची जागा निवडतानाही चुका केल्या गेल्या. कै. वसंतराव नाईकांचा पूर्णाकृती पुतळा कृषी महाविद्यालय चौकात उभारला आहे. वास्तविक, वसंतराव नाईक हे हरित क्रांतीचे प्रणेते. त्यांचा पुतळा समोरच कृषी  महाविद्यालयात उभारणे योग्य ठरले असते; पण राजभवन रस्त्यावरून अनेक अति महत्त्वाच्या व्यक्ती जातात तेव्हा तो रस्त्यावरच हवा, असा आग्रह राज्याच्या तत्कालीन मुख्य सचिवांनी धरला. त्यामुळे स्थानिक प्रशासन काही करू शकले नाही. आज तो पुतळा जाणाºया-येणाºयांच्या लक्षातदेखील येत नाही. एकदा पुतळा उभारला, की वर्षातील दोन दिवस त्याचे स्मरण; बाकीचे ३६३ दिवस पुतळ्याचे नातेवाईकही तिकडे फिरकत नाहीत.
पुतळ्यांवरून अनेक वेळा वाददेखील झाले आहेत. हा पुतळा एवढा मोठा का? आमचा पुतळा छोटा का? असेही वाद या पुणे शहराने पाहिले आहेत. लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविण्यावरून झालेला वाद, संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा मध्यरात्रीत संभाजी बिग्रेडने काढलेला पुतळा. शहरातील बहुतेक पुतळे हे ब्राँझचे आहेत; फक्त मंडई येथील लोकमान्य टिळकांचा एकमेव पुतळा हा संगमरवरी आहे. पुणे शहरातील सर्व पुतळे एकत्र करून एखाद्या उद्यानात उभे करावेत, असा एक प्रस्ताव महापालिकेत एका सभासदाने दाखल केला होता; पण तो 
एकमताने नामंजूर 
झाला. विशेष म्हणजे, ज्यांनी प्रस्ताव दिला त्यांनीदेखील नंतर त्याला विरोध केला.

पण, अनेक पुतळे अशा ठिकाणी बसविण्यात आलेत, की ते कुणाच्याच लक्षात येत नाहीत. तेथे प्रकाशयोजना नाही; त्यामुळे त्याचा गैरफायदा दारू पिण्यासाठी काही लोक करीत. असाच एक प्रकार टिळक रोडवर विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा पुतळा होता तेथे एका रात्री ११-१२च्या सुमारास एक जण दारू पिऊन पुतळ्यास शिव्या देत होता (चिपळूणकरांनी काय त्याचं घोडं मारलं होतं कुणास ठाऊक?). पण, नेमके त्याच वेळेस तत्कालीन महापौर कै. नामदेवराव मते तेथून जात होते; त्यांनी ते पाहिले. त्यांनी लगेच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढे न्यू इंग्लिश स्कूलने तो पुतळा थोडा शाळेच्या आवारात घेतला. 

( लेखक सामाजिक कार्यकर्ते आहे )

Web Title: angry on the statue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.