आणखी एक पृथ्वी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2014 03:22 PM2014-04-29T15:22:56+5:302014-04-29T15:22:56+5:30
पृथ्वीसारखीच आणखी एक पृथ्वी.? नासाच्या शास्त्रज्ञांनी लावलेल्या या नव्या ग्रहाच्या शोधामुळे अवघ्या जगाच्याच भुवया उंचावल्या आहेत.खरंच, अनादिअनंत ब्रह्मंडात पृथ्वीचंच एक भावंडं सापडलं आहे?
पृथ्वीसारखीच आणखी एक पृथ्वी.? नासाच्या शास्त्रज्ञांनी लावलेल्या या नव्या ग्रहाच्या शोधामुळे अवघ्या जगाच्याच भुवया उंचावल्या आहेत. खरंच, अनादिअनंत ब्रह्मंडात पृथ्वीचंच एक भावंडं सापडलं आहे? ते नक्की आहे तरी कसं? पृथ्वीसारखंच काय-काय आहे तिथं?. या नव्या कुतूहलाच्या अवकाशात डोकावून पाहायलाच हवं..
विश्वात आपण एकटे आहोत काय, हा प्रश्न पुरातनकाळापासून चर्चिला जात आहे. आपल्या सूर्यमालेत तरी फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी आढळते. यामुळे अंतराळातील अब्जावधी तार्यांभोवती असणार्या ग्रहांवर जीवसृष्टी असावी, असे काही शास्त्रज्ञांना वाटते. पण तारे खूप दूर असल्याने त्यांच्याभोवती ग्रह फिरतात की नाही, हे अगदी अलीकडच्या काळापर्यंत ठाऊक नव्हते. मात्र, गेल्या २५-३0 वर्षांपासून अप्रत्यक्षरीत्या जवळ-जवळ १,८00 ग्रहांचा शोध लावला गेला. गेल्याच आठवड्यात अमेरिकन शास्त्रज्ञांनी पृथ्वीसारख्या एका ग्रहाचा ‘केप्लर हवाई दुर्बिणीतून’ वेध घेतला. हा ग्रह सूर्यापेक्षा छोट्या तार्याभोवती फिरत असून, तो तारा हंस तारकासमूहात आहे. प्रथमच शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या आकारासमान दिसणारा ग्रह त्याच्या तार्यापासून काहीशा ‘सूर्य-पृथ्वी’ अंतरावर सापडला आहे. कदाचित या ग्रहावरचे तापमान पृथ्वीसारखे म्हणजे फार जास्त किंवा फार कमी नसल्याने तेथे पाणी व हवा असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता असल्याने शास्त्रज्ञ उल्हसित झाले असून, हा शोध क्रांतिकारक असल्याचे मानले जाते.
अंतराळात दिसणारे तारे आपल्यापासून खूपच दूर असल्याने जगातील मोठय़ात मोठय़ा दुर्बिणीतून त्यांचा छोटा ठिपका दिसतो, त्यांच्या भोवतालचे ग्रह दिसू शकत नाहीत. याचमुळे आकाशात दिसणार्या तार्याभोवती ग्रह आहेत की नाहीत, याचे उत्तर १९९५पर्यंत ठाऊक नव्हते. तारे खूपच दूर असल्याने व त्यांच्याभोवतालचे ग्रह तार्यापेक्षा अब्जावधी पट मंद तेजाचे असल्याने ग्रहांचा वेध घेणे प्रत्यक्षातच नाही तर अप्रत्यक्षरीत्याही अशक्यप्राय होते. प्रत्यक्षात नाही तरी अप्रत्यक्षरित्या ग्रहांचा वेध घेण्याची तंत्रे विकसित करण्याची धडपड काही वर्षे सुरू होती. जेफ मार्सी व पॉल बटलर नावाच्या शास्त्रज्ञांनी ग्रह शोधण्यासाठी ‘रेडिअल व्हेलॅसिटी’चे तंत्र विकसित केले. या तंत्रानुसार एखादा तारा थरथरत (वॉबल) असल्यास त्याभोवती मोठा ग्रह फिरत असून, तो तार्यास गुरुत्वाकर्षणाने खेचून हलवतो, हे सूत्र वापरले गेले. या तंत्राचा वापर करून सर्वप्रथम ऑक्टोबर १९९५मध्ये महाश्व तारकासमूहातील एका तार्याभोवतालच्या ग्रहाचा वेध जीनिव्हा वेधशाळेच्या मेयर व केलॉज यांनी घेतला. हार्वर्ड स्मिथसोनियन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी ‘अधिक्रमणाचा’ वापर करून सर्वप्रथम ग्रहाचा वेध घेतला. या तंत्रानुसार तार्याभोवतालचा एखादा ग्रह जेव्हा तार्यासमोरून जाताना पृथ्वीवरून दिसतो, तेव्हा तार्याचा प्रकाश किंचित कमी होतो. या स्थितीचा म्हणजेच अधिक्रमणाचा (ट्रान्झिट) वापर करून ग्रह शोधता येतात. हेच तंत्र नासाच्या ‘केप्लर अवकाश मोहिमे’मध्ये वापरले जात असून, नवीन ग्रहांचा वेध घेतला जात आहे. गेल्या २0 वर्षांत शोधलेले बहुसंख्य ग्रह हे गुरू व शनी या ग्रहांएवढे किंवा त्यापेक्षा मोठय़ा आकाराचे व वायुमय आढळले. तसेच, हे ग्रह त्यांच्या सूर्याजवळ आढळल्याने तेथे जीवसृष्टी असण्याची शक्यता मावळली. जीवसृष्टी आढळण्यासाठी ग्रह त्याच्या सूर्यापासून काहीशा पृथ्वीसारख्या अंतरावर (हॅबिटेबल झोन) व घन आकाराचा हवा. अगदी अलीकडे पृथ्वीपेक्षा काहीसे मोठे (सुपर अर्थ) ग्रह शास्त्रज्ञांना सापडले आहेत.
अमेरिकेच्या ‘नासा’ या अवकाश संशोधन केंद्राने पृथ्वीसारखे ग्रह/ ग्रहमाला शोधण्यासाठी मार्च २00९मध्ये अंतराळात केप्लर दुर्बीण सोडली. गेल्या वर्षापर्यंत या दुर्बिणीने हंस व वीणा तारकासमूहांतील दीड लाख तार्यांचे निरीक्षण केले असून, ९५0 ग्रहांचा वेध घेतला आहे. यांतील बरेचसे ग्रह पृथ्वीपेक्षा मोठे व वेगाने त्यांच्या सूर्याभोवती आणि अगदी जवळून फिरत असल्याने त्यांवर जीवसृष्टी असण्याची शक्यता नाही. यांपैकी २0 ग्रह हे त्यांच्या तार्यापासून ‘जीवसृष्टीस आवश्यक असलेल्या अंतरावर’ (हॅबिटेबल झोन) सापडले आहेत. गेल्या आठवड्यातील शोधाला महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण केप्लरने शोधलेला ग्रह पृथ्वीपेक्षा किंचित मोठय़ा आकाराचा असून, तो हॅबिटेबल झोनमध्येच आहे. अनेक शास्त्रज्ञ या नव्या ग्रहाला ‘पृथ्वीचा चुलतभाऊ’ मानतात, कारण हा ग्रह सूर्यासारख्या तार्याभोवती फिरत नसून, तो ‘तांबड्या खुज्या तार्याभोवती’ फिरत आहे. या प्रकारचे तारे आकाशगंगेत विपुल संख्येने असून, नवा ग्रह ज्या तार्याभोवती फिरतो, तो सूर्याच्या निम्म्या आकाराचा व वस्तुमानाचा आहे. या नव्या ग्रहाला ‘केप्लर १८६ एफ’ नावाने ओळखले जात असून, तो तार्यापासून ५.२४ कोटी किलोमीटर अंतरावर आहे.
हे अंतर तार्याच्या हॅबिटेबल झोनमध्येच येते, कारण तारा काहीसा लहान आहे. हा ग्रह पृथ्वीप्रमाणेच दगडधोंड्यांचा असावा व त्यावर पाणी, बर्फ व लोखंडासारखी मूलद्रव्ये असण्याची शक्यता आहे. अर्थात, त्याचे वजन व रचनेविषयी ठाम माहिती नसली, तरी शास्त्रज्ञांना वाटते, की या ग्रहाभोवती घट्ट वातावरण असावे व त्याचमुळे जरी तो तार्यापासून दूर असला, तरी त्यावर बर्फाऐवजी पाणी असावे. याचमुळे या ग्रहावर जीवसृष्टी असेल किंवा जीवसृष्टी उदयाला येण्यास पोषक स्थिती असावी. तांबडे खुजे तारे तसे संथ गतीने त्यांच्यातील इंधन वापरत असल्याने त्यांचे आयुर्मान जास्त असते व यामुळे त्याभोवतालच्या ग्रहावर जीवसृष्टी उत्पन्न होऊन तिची उत्क्रांती होण्यास भरपूर कालावधी मिळू शकतो.
केप्लरचा नवा ग्रह हा त्याच्या सूर्याभोवती १३0 दिवसांत फिरतो. या सूर्याभोवती अजून ४ ग्रह असून, ‘केप्लर १८६ एफ’ हा सर्वांत बाहेरचा ग्रह आहे. हा ग्रह हंस तारकासमूहातील डेनेब तार्याजवळ असून, तो ४९0 प्रकाशवर्षे दूर आहे. इतक्या दूर अंतरावर असल्याने त्याभोवतालच्या वातावरणाचा अंदाज शास्त्रज्ञांना येत नाही. पुढील तीन-चार वर्षांत नासाची ‘टेस व बेब स्पेस’ दुर्बीण अंतराळात सोडली जात असून, त्या दुर्बिणीच्या साह्याने या नव्या ग्रहाकडे प्रत्यक्षपणे पाहता येईल व भोवतालच्या वातावरणाचे पृथक्करण केले जाईल. यानंतरच नवा ग्रह कसा आहे, तेथील वातावरण कसे आहे, तेथे खरोखरच पाणी आहे काय व जीवसृष्टी असण्याची शक्यता कितपत आहे, यावर ठामपणे शास्त्रज्ञ बोलू शकतील. असे असले, तरी केप्लर दुर्बिणीचा हा नवा शोध जीवसृष्टीच्या वेधाकडचे एक मोठे पाऊल म्हणून पाहिले जाईल, हे नक्की.
(लेखक ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आहेत.)