पुराणप्रवास
By admin | Published: June 10, 2016 04:33 PM2016-06-10T16:33:36+5:302016-06-10T16:33:36+5:30
साहित्यातून मूळ प्रवासाच्या ऐतिहासिक हकीकतीसोबत तत्कालीन भौगोलिक, सामाजिक परिस्थितीचं, श्रद्धांचं एकत्नित चित्नही मग निगुतीने पुढच्या पिढय़ांर्पयत पोहोचवलं गेलं
Next
>डॉ. उज्ज्वला दळवी
(लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये वास्तव्याला होत्या. ‘मानवाचा प्रवास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.)
ही वाट दूर जाते
पूर्वीच्या काळी दूरचा प्रवास सामान्यांसाठी सोपा नव्हताच.
देवादिकांच्या, राजा-महाराजांच्या रम्य प्रवासकथांबद्दलही लोकांना प्रचंड कुतूहल!
लोकांच्या शिळोप्याच्या गप्पांमध्येही देव, राक्षस, यक्षकिन्नर होते.
अशा कथांची देवाणघेवाण झाली.
त्यात आख्यायिकांची भर पडत गेली.
त्यावेळच्या साहित्यातून मूळ प्रवासाच्या ऐतिहासिक हकीकतीसोबत तत्कालीन भौगोलिक, सामाजिक परिस्थितीचं, श्रद्धांचं एकत्नित चित्नही मग निगुतीने पुढच्या पिढय़ांर्पयत पोहोचवलं गेलं.
'भयभीतांच्या जथ्याने टाहो फोडला, ‘पुढे सागर, मागे सैनिक, जायचं कुठे? आता आम्ही या वाळवंटात हकनाक मरणार! त्यापेक्षा गुलामगिरी काय वाईट होती?’
सहा लाख हिब्रू लोकांना इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवून मोझेस त्यांना त्यांच्या हक्काच्या भूमीला घेऊन चालला होता. ते रक्तसमुद्रापाशी पोचले आणि मागून इजिप्तचं सैन्य त्यांचा माग काढत तिथे येऊन ठेपलं. मोझेसने फक्त हात वर केला आणि देवाच्या कृपेने रक्तसमुद्र दुभंगला. पाऊलवाट झाली. तिच्यावरून सहा लाख हिब्रू सागरापार पोचले. पाठलाग करणारं इजिप्तचं सैन्यही त्या सागरवाटेवर घुसलं. एकाएकी ती वाट बंद झाली आणि सगळं सैन्य सागराने पोटात घेतलं.’
बायबलमधला हा प्रसंग बाळकृष्णाच्या अंगठय़ाच्या स्पर्शाने दुभंगलेल्या यमुनेच्या पात्राची आठवण करून देतो. जगभरातल्या धार्मिक-पौराणिक कथांमध्ये तशी विविध अद्भुत प्रवासवर्णनं आहेत. त्या जुन्या काळात दूरचा प्रवास सर्वसामान्यांसाठी सोपा नव्हता. देवादिकांच्या, राजा-महाराजांच्या दूरदेशींच्या प्रवासांच्या रम्यकथांबद्दल त्यांना कुतूहल वाटे. म्हणूनच पुरातन काळापासून शेकोटीच्या भोवती, शिळोप्याच्या गप्पांमध्ये तशी आख्यानं घोळून-रंगवून सांगितली गेली. त्यांच्यात देव, राक्षस, यक्षकिन्नर होते. भाविकांच्या श्रद्धेला भावणारी धार्मिक पार्श्वभूमी होती. शेजारपाजारच्या गावांत तशा कथांची देवाणघेवाण झाली. सांगणा-यांच्या कल्पनाशक्तीनुसार त्यांच्यात उपाख्यानांची-आख्यायिकांची भर पडत गेली. नैमिषारण्यातल्या ज्ञानयज्ञात शौनकादिक ऋषींनी सूत-पितापुत्रंकडून अठरा पुराणांच्या गोष्टी ऐकल्या. तशा सा-या साहित्यातून त्या मूळ प्रवासाच्या ऐतिहासिक हकीकतीसोबत त्यावेळच्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीचं, चालीरितींचं, समजुतींचं आणि श्रद्धांचं एकत्रित चित्र निगुतीने पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचवलं गेलं. त्यातूनच ओडिसीसारखं एखादं महाकाव्य जन्माला आलं.
ओडिसीत ओवलेल्या ग्रीक पुराणकथांत ट्रॉय (सध्याच्या तुर्कस्तानातला भाग) आणि इथाका (सध्याचा ग्रीस) ही दोन शहरं आहेत. ट्रोजन युद्धानंतर त्यातला नायक युलिसिस ट्रॉयहून निघाला आणि तब्बल दहा वर्षांनी इथाकाला पोचला. त्या प्रवासात देवाचा कोप, देवीचं साहाय्य आहेच; शिवाय चेटकिणी, मंतरलेलं गायन, एकाक्ष राक्षस वगैरे अद्भुतरम्य रेलचेलही आहे. टेलेगॉनी या काव्यातला युलिसिसच्या दोन मुलांचा रोमपर्यंतचा प्रवासही रोमांचकारक आहे.
पैगंबरांचा मक्केहून मदिनेला जातानाचा प्रवास तर इतिहासातच नमूद केलेला आहे. त्याच्या दोन हजार वर्षं आधी मोझेसने केलेल्या प्रवासाच्या बायबलमधल्या वर्णनांतही वाळवंटातला रखरखाट, तिथलं अन्नपाण्याचं दुर्भिक्ष्य तीव्रतेने जाणवतं, गुलामांच्या मनोवृत्तीची कल्पना येते. त्याच्याही साडेसहाशे वर्षं आधी बाबिलोनियामध्ये दुष्काळ पडला होता. तेव्हा मोझेसचा पूर्वज एब्राहम बाबिलोनजवळच्या गावाहून निघून इजिप्तला गेला. पण तो वाळवंट टाळून सुजल-सुफल प्रदेशातून गेला. त्या सा-याची हकीकत बायबलमध्ये मिळते.
बौद्ध धर्म तर हिंडत्याफिरत्यांचाच धर्म. जातककथांमध्ये तथागतांच्या अनेक प्रवासांची उदाहरणं देत धर्माचं तत्त्वज्ञान समजावलं आहे.
एस्किमोंच्या कथांमध्ये सुखाच्या शोधात निघालेल्या माणसाला गोठलेल्या नद्या, हिमखंड हे तर लागतातच; पण व्हेल, सील, कॅरिबू हे प्राणी त्याच्याशी बोलतात आणि त्यांचं जिणं माणसाच्या जीवनापेक्षा कसं अधिक खडतर असतं त्याची जाणीव करून देतात. वृक्षराजीने नटलेल्या नॉर्वे-स्वीडन-डेन्मार्कच्या पुराणकथांमध्ये पाताळापासून स्वर्गापर्यंतचे नऊ लोक इग्ग्ड्रासिल नावाच्या प्रचंड वृक्षाने जोडलेले आहेत. तैगाच्या जंगलांजवळच्या सायबेरियाच्या धर्मकथांतही पाताळापासून स्वर्गापर्यंत जाणा-या महावृक्षाला महत्त्व आहे. आपले नारदमुनी जसे त्रैलोक्याचा प्रवास करत तसेच सायबेरियाच्या कथांतले साधूही तिन्ही लोकांत संचार करत. पण नारदमुनी एका ठिकाणाहून अंतर्धान पावले की थेट दुसरीकडे प्रकट होत. सायबेरियन साधूंना मात्र त्या नवलोकगामी महावृक्षावरून चढत-उतरत कष्टानेच मार्ग शोधावा लागे. सर्वसामान्यांनी तसा ‘लोकांतर’ प्रवास केला की वेगळ्याच समस्या उद्भवत. महाभारतातल्या काकुद्मी राजाने उपवर कन्येसह ब्रम्हलोकाचा प्रवास केला. तेवढय़ा काळात पृथ्वीवरची सत्तावीस चतुर्युगं (4क0 कोटी वर्षं) लोटली. त्या कालप्रवासामुळे त्या कन्येचा, रेवतीचा त्या कालावधीनंतरच्या बलरामाशी विवाह झाला. जपानी बौद्धकथेतही देवांच्या महालात जाऊन आल्यामुळे एका व्यक्तीला कालप्रवास घडल्याचा वृत्तांत आहे.
हिमाचलाच्या पायथ्याशी जन्मलेले पांडव अंतिम प्रवासालाही पर्वत चढून गेले. नाईलच्या काठावरच्या इजिप्शियन राजांचे आत्मे अंतिम सफरीसाठी दिव्य जहाजातून लव्हाळ्यांच्या अनादिअनंत स्वर्गबेटाकडे जात. छांदोग्य उपनिषदातला सत्यकाम जाबाल जंगलात राहिला. त्या वनप्रवासातल्या तपश्चर्येमुळे सत्यकामाला ब्रम्हज्ञान प्राप्त झालं. चार हजार वर्षांपूर्वीच्या सुमेरियन पुराणकाव्यातला गिल्गामेश हा शहरी नायक. त्याचं एण्डिकू हे वनवासी प्रतिरूप होतं. एण्डिकू गिल्गामेशला भेटायला शहरात आला, त्यांची दोस्ती झाली. एण्डिकूच्या मृत्यूनंतर मित्रविरहाने व्याकुळलेला गिल्गामेश अमरत्वाच्या शोधात शहर सोडून वनात गेला. तिथल्या अनोळखी, अनिश्चित वातावरणात, अंधारात चाचपडत वणवण फिरताना त्याला शहाणपण लाभलं. परिपक्व माणूस आणि न्यायी राजा बनून तो शहरात परतला. कधी कधी तर ठिकठिकाणच्या पुराणकथांमध्ये आश्चर्यकारक साधम्र्य दिसून येतं. महापुराने झालेल्या जगबुडीत देवमासा-नौका यांच्यातून प्राणिमात्रंना वाचवणा-या महात्म्याची गोष्ट तर जगातल्या अनेक देशांच्या-धर्मांच्या-जमातींच्या पुराणकथांत आहे.
तशा प्रवासपुराणांचा ठेवा जगभरातल्या प्रत्येक संस्कृतीने जपलेला आहे. जेव्हापासून माणूस हिंस्र पशूंबद्दलच्या भयाने किंवा माणसांच्याच विक्षिप्त वागणुकीने गोंधळला किंवा कधी अस्तित्वाबद्दल कुतूहलाने विचार करायला लागला तेव्हापासून त्याच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तशा कथा निर्माण झाल्या असाव्या. त्यांनी जागोजागच्या लोकसमूहांची संस्कृती घडवली. धर्माच्या उदयापूर्वीपासून त्या कथांनी मानवाला नीतिधर्माचा, सदाचरणाचा मार्ग दाखवला. कथा मनोरंजक करायला वास्तवकथनात कल्पनांची म्हणजेच खोटय़ाची भर पडली. पण चिरंतन सत्याच्या वाटेवर ज्ञानाचा प्रकाश पाडायचं काम त्या खोटय़ामुळेच अधिक प्रभावीपणो होऊ शकलं.
आपल्या रामायण-महाभारतातही प्रवास आहेच. सर्वात अधिक प्रवास केला तो अर्जुनाने. इतर पांडवांसारखा तो हिमालयाहून हस्तिनापुरात, मग द्वैतवनात आणि तिथून मत्स्यदेशी विराटाच्या राजधानीत गेलाच; पण त्याशिवाय तो प्रायश्चित्त म्हणून बारा वर्षं प्रवासात राहिला, जरासंधाच्या वधाच्या वेळी मगधाला जाऊन आला, राजसूय यज्ञाच्या वेळी उत्तरेकडच्या राज्यांत फिरला, इंद्राकडून अस्त्रं मिळवायला स्वर्गापर्यंत जाऊन आला. भारतीय युद्धानंतरच्या अश्वमेधाच्या घोडय़ाबरोबरही अर्जुनच भटकला. श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबयांना द्वारकेहून इंद्रप्रस्थाला न्यायचं कामही अर्जुनानेच केलं. त्या सा-या भटकंतीच्या कथनात उत्तर आणि मध्य भारताची तपशीलवार नोंद आहे. रामायणात अयोध्येपासून दंडकारण्य-पंचवटी-पंपा सरोवर, तुंगभद्रेजवळची शबरीची झोपडी, सुग्रीवाची किष्किंधा नगरी ते थेट लंकेर्पयतची वाटचाल आणि परतताना पुष्पक विमानातून दिसणारी तीच स्थळं असं दुहेरी दृष्टिकोनातून प्रवासवर्णन कथेच्या ओघात घडलं आहे.