तुम्ही खरंच चांगले व्यक्ती आहात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 06:02 AM2021-04-18T06:02:00+5:302021-04-18T06:05:06+5:30
आपण कसे आहात? म्हणजे चांगले? वाईट? तुम्हाला काय वाटतं? खरं तर प्रत्येकाला आपण चांगलेच आहोत असं वाटत असतं, पण हे ठरवायचं कसं?
लोकमत न्यूज नेटवर्क-
आपण कसे आहात? म्हणजे चांगले? वाईट? तुम्हाला काय वाटतं? खरं तर प्रत्येकाला आपण चांगलेच आहोत असं वाटत असतं, पण हे ठरवायचं कसं?
कनेक्टिकट युनिव्हर्सिटीमधील तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर, मानसशास्त्रज्ञ प्रोफेसर पॉल ब्लूमफिल्ड यांनी त्यासाठी काही सोपी उदाहरणं दिली आहेत. आणि सांगितलंय... ठरवा आता तुम्हीच..
पहिलं उदाहरण- ऑफ ड्यूटी असलेले दोन अग्निशामक कर्मचारी आणि हातात काठी असणारा एक ज्येष्ठ नागरिक,, रस्त्यानं जात असतात. रस्त्यावरुन जात असताना दुसऱ्या मजल्यावरुन अचानक कोणी तरी ओरडलं, वाचवाऽऽ वाचवाऽऽ तिधेही वर पाहतात तर त्या इमारतीला आग लागलेली असते.
ड्यूटीवर नसलेले अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या दृष्टीने नैतिकता कोणती? योग्य कृत्य कोणतं?
अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी लगेच इमारतीत धाव घेऊन तिथल्या लोकांना वाचवायचा प्रयत्न करणं.. आणि ज्येष्ठ नागरिकाच्या दृष्टीनं त्यानं त्वरित अग्निशामक दलाला फोन करुन आगीची घटना आणि स्थळ सांगणं...
दोघांनीही वेगवेगळ्या कृती केल्या तरी ते नैतिकतेला धरुन आणि योग्य होईल. ते चांगले व्यक्ती ठरतील.. समजा, या दोन्ही ठिकाणी तुम्ही असता, म्हणजे अग्निशमन कर्मचारी किंवा वृद्ध गृहस्थ... तर तुम्ही काय केलं असतं?
दुसरं उदाहारण- पॉल ब्लूमफिल्ड म्हणतात, आता रोज काही आपल्याला अशा घटनांना सामोरं जावं लागत नाही, आपण समोर असतानाच नेमकी कुठे आग लागेल असंही नाही, पण रोजच्या जीवनात आपण कसे वागतो, त्यानुसार आपला चांगुलपणा ठरतो.
समजा, तुमच्या नऊ वर्षांच्या मुलाला घेऊन तुम्ही एखाद्या प्राणीसंग्रहालयात गेला आहात. तिथे आठ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत प्रवेश आहे, पण त्यापुढे वय असलेल्यांना मात्र तिकिट आहे. तुम्ही काय कराल? मुलगा आठच वर्षांचा आहे, असं सांगून त्याला फुकट मधे घ्याल, कि रीतसर त्याचं तिकिट काढाल?...
आणखी एक उदाहरण- थोडंसं नाजूक आणि गुंतागुंतीचं. समजा, तुमच्या बहिणीचं लग्न झालेलं आहे, पण त्याचबरोबर तिचं प्रेमप्रकरणही चालू आहे.. ब्लूमफिल्ड विचारतात, अशा वेळी तुम्ही काय कराल? तुमचा प्रतिसाद कसा असेल? तुम्ही बहिणीला परावृत्त कराल, मेहुण्याला सांगाल कि गप्प बसाल?
- सोपं नाहीच या प्रश्नाचं उत्तर. त्यात नैतिक काय आणि अनैतिक काय, हेही कदाचित नेमकेपणानं सांगता येणार नाही, पण अशा प्रसंगी तुम्ही जे, जसं वागता, त्यावरच तुमचा चांगुलपणा ठरत असतो..
ब्लमफिल्ड म्हणतात, ठरवा आता तुम्हीच.. तुम्ही कसे आहात? चांगले, वाईट, तटस्थ, सर्वसामान्य कि आणखी काही?..