अर्जेंटिना, मॅराडोना आणि फुटबॉलची झिंग..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 06:03 AM2020-11-29T06:03:00+5:302020-11-30T19:42:20+5:30

लॅटिन अमेरिकेतला सर्वात दिलखुलास आणि रांगडा देश म्हणजे अर्जेंटिना. त्यांचा आवडता खेळही असाच रांगडा. फुटबॉल. त्यांच्यासाठी तो फक्त खेळ नाही, त्यांचा धर्म आहे. त्यासाठी ते अक्षरश: वेडे आहेत. त्याचं श्रेय निर्विवादपणे डियागो मॅराडोनाला...

Argentina, Maradona and the zing of football... | अर्जेंटिना, मॅराडोना आणि फुटबॉलची झिंग..

अर्जेंटिना, मॅराडोना आणि फुटबॉलची झिंग..

Next
ठळक मुद्देफुटबॉलने अंतर्बाह्य न्हावून गेलेल्या ह्या देशात मूल चार वर्षाचे झाले की सर्वप्रथम त्याला फुटबॉलचे धडे द्यायला सुरुवात होते.

- राहुल बनसोडे

ह्या देशात मूल चार वर्षंचे झाले की, सर्वप्रथम त्याला फुटबॉलचे धडे द्यायला सुरुवात होते. उत्तम फुटबॉलपटू होण्यासाठी ह्या मुलांना जास्त वाटही पहावी लागत नाही. वयाच्या अवघ्या नवव्या-दहाव्या वर्षापासून ते प्रोफेशनल टीममध्ये सिलेक्ट होऊ शकतात आणि तिथून राष्ट्रीय पातळीच्या टीम्समध्ये आपले करिअर बनवू शकतात.

अर्जेंटिना. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात डाव्या कोपऱ्याकडे वसलेला एक देश, विपुल निसर्गसंपत्ती आणि दिलदार लोकांनी भरलेला. असे म्हणतात की, इथल्या हवेत कसलीशी जादू आहे ज्यामुळे माणसात सळसळता उत्साह येतो आणि ही सळसळ मग त्यांच्या रोजच्या जीवनात, नाचात, गाण्यात, खेळण्या-बागडण्यात आणि त्यांच्या प्रेमातही दिसून येते.

लॅटिन अमेरिकेतला सर्वात दिलखुलास आणि रांगडा समजला जाणारा देश म्हणजे अर्जेंटिना. आणि ह्या रांगड्या लोकांचा आवडता खेळही असाच रांगडा. फुटबॉल. असोसिएशन फुटबॉल असे पूर्ण नाव असलेला हा खेळ जगातल्या इतर अनेक देशांमध्येही खेळला जातो पण अर्जेंटिनात हा फक्त खेळ नाही तर त्या देशांतल्या लोकांचा मुख्य धर्म आहे. अर्जेंटिनातली शंभरातली नव्वद माणसे फुटबॉलसाठी अक्षरशः वेडी आहेत. मध्यभागी सूर्याचे चित्र असलेला अर्जेंटिनाचा राष्ट्रध्वज आकाशी निळ्या रंगाचा आहे आणि हा आकाशी निळा रंग फुटबॉल आणि त्याच्याशी संबंधित हरेक गोष्टींवरती विखुरलेला दिसतो. प्रत्येकाकडे आपल्या राष्ट्रीय फुटबॉलच्या टीमशी साधर्म्य सांगणारा एक तरी स्काय ब्लू टी शर्ट असतोच, याशिवाय स्पोर्ट्स शुज, किराण्याच्या पिशव्या, लेडीज पर्स, ऑफिसातल्या खुर्च्या, इतकेच काय कोरोनाचा मास्क आणि मिरवणुकीतला गुलालसुद्धा स्काय ब्लू रंगाचाच असतो. फुटबॉलने अंतर्बाह्य न्हावून गेलेल्या ह्या देशात मूल चार वर्षाचे झाले की सर्वप्रथम त्याला फुटबॉलचे धडे द्यायला सुरुवात होते, उत्तम फुटबॉलपटू होण्यासाठी ह्या मुलांना जास्त वाटही पहावी लागत नाही. वयाच्या अवघ्या नवव्या दहाव्या वर्षापासून ते प्रोफेशनल टीममध्ये सिलेक्ट होऊ शकतात आणि तिथून राष्ट्रीय पातळीच्या टीम्समध्ये आपले करिअर बनवू शकतात.

अर्जेंटिनाच्या ह्या फुटबॉलवेडाचे श्रेय कुणा एकट्याला द्यायचे झाल्यास ते निर्विवादपणे ‘डियागो मॅराडोनाला’ देता येईल. ३० ऑक्टोबर १९६० साली विला फिओरीटो शहरातल्या एका झोपडपट्टीत मॅराडोना जन्माला आला, कुठल्याही झोपडपट्टीतली मुले जशी जगतात आणि मोठी होतात तसाच मॅराडोनाही झाला असता; पण नियतीच्या मनात दुसरेच काहीतरी होते. डियागोच्या तिसऱ्या वाढदिवसाला त्याच्या आईवडिलांनी त्याला प्रेझेंट म्हणून फुटबॉल घेऊन दिला. त्या तिसऱ्या वाढदिवसाच्या पहिल्या दिवशी मॅराडोनाने फुटबॉलला मारलेली किक पुढे त्याचे आयुष्य आणि फुटबॉल विश्वाचेही आयुष्य बदलून गेली. वर्षभरातच मॅराडोना फुटबॉल व्यवस्थित खेळायला शिकला, वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत त्याने अनेक ट्रिक्सदेखील आत्मसात केल्या. आपल्या गल्ली आणि शहरात प्रसिद्ध होत असताना आठव्याच वर्षी त्याच्यावर फुटबॉलच्या दिग्गज कोचेसची नजर गेली. लवकरच मॅराडोना अर्जेंटिनो ज्युनिअर्स टीममध्ये दाखला झाला आणि अवघ्या चार वर्षांच्या खेळात त्याने १६७ मॅचेसमध्ये ११५ गोल्स टिपले. पुढे मॅराडोना आंतरराष्ट्रीय मॅचेस खेळू लागला; पण ह्या मॅचेस खेळताना ह्या खेळाचा रांगडेपणा त्याच्या जिवावर बेतू लागला. खेळताना पाय मोडणे, अंगाला दुखापत होणे, रक्ताने टी-शर्ट माखून जाणे असेही प्रकार व्हायला लागलेे; पण लवकरच ही कमालीची बिकट स्पर्धा मॅराडोना जिंकायला शिकला. १९८६च्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये तो अर्जेंटिनाच्या टीमचा कॅप्टन म्हणून खेळला आणि त्याने आपल्या टीमला देदीप्यमान यश मिळवून दिले. त्याचा जगप्रसिद्ध ‘हॅंड ऑफ गॉड’ नावाचा अवैध गोल ह्याच मॅचचा आणि त्या गोलनंतर लगेचच अवघ्या चार मिनिटात केलेला दुसरा जगातला सर्वोत्कृष्ट वैध गोलही ह्याच मॅचचा. १९८६ साली अर्जेंटिनाला वर्ल्ड कप मिळवून दिल्यानंतर मॅराडोनाने अर्जेंटिना ह्या देशाला नवी ओळख मिळवून दिली. तिथून पुढे फुटबॉलच्या मॅचेसही अधिकाधिक चित्तथरारक होत गेल्या आणि मॅराडोनाचा अद‌्भुत खेळ जगातल्या कोट्यवधी लोकांनी आपल्या टीव्ही सेट्सवर अगदी तहानभूक विसरून पाहिला. त्याचा खेळ इतका चांगला होता की, अर्जेंटिनाच्या विरोधातल्या इतर देशांनाही त्याचा खेळ पाहिल्याशिवाय चैन पडत नसे. फुटबॉलचा खेळ जिंकलो तर उत्तमच; पण हरावे तर मॅराडोनाकडूनच असे प्रतिस्पर्धी देशही म्हणू लागले...

आंतराष्ट्रीय खेळामध्ये कमालीचे यश मिळविल्यानंतर मॅराडोना हा अर्जेंटीनातल्या गरीब आणि संघर्ष करणार्‍या लोकांचा आवाज बनला. त्याचे सामान्य असणे जगभरातल्या स्पोर्ट्सफॅनला आपलेसे वाटू लागले. त्याला प्रत्यक्ष न भेटता वा त्याच्याशी कुठलाही संवाद न करता कोट्यावधी लोक त्याला आपल्या आयुष्याचा एक घटक मानू लागले. कित्येकांसाठी मॅराडोना त्यांच्या आईवडिलांपेक्षाही महत्त्वाची व्यक्ती बनला, त्याच्या चहात्यांनी त्याचे मंदीर बनविले आणि त्या मंदीरातला मॅराडोना देव बनला. अर्जेंटीनाच्या सर्व राजकारण्यांनी मिळून त्या देशाला जे काही दिले त्याच्या कितीतरी पट जास्त एकट्या मॅराडोनाने दिले, तेही फक्त आपले शरीर आणि एका फुटबॉलच्या जोरावर.

वयाच्या साठाव्या वर्षी आपल्या रहात्या घरी मॅराडोनाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हे तेच हृदय होते जे प्रत्येक मॅचमध्ये सळसळत्या उमेदीच्या मॅराडोनाला रक्तपुरवठा करीत होते, हे तेच हृदय होते ज्याच्यावर हात ठेउन मॅराडोनाने अर्जेंटीनाला राष्ट्रचेतना दिली होती आणि हे तेच हृदय होते ज्याच्याशी त्याच्या कोट्यावधी चहात्यांचे हृदय जोडले गेले होते. मॅराडोनाचा मृत्यु होउ शकतो हे त्या हृदयांना माहिती नव्हते, ही घटना जेंव्हा प्रत्यक्ष घडली तेंव्हा कोट्यावधी लोकांच्या हृदयातही एक अस्पष्टशी कळ उमटली आणि अतिव दु:खाच्या भावनेने ते ग्रासले गेले. त्याच्या मृत्युनंतर त्याच्या एका चहात्याला नेमके काय वाटते आहे हे विचारल्यानंतर त्याने उत्तर दिले. 'मॅराडोना हा एक जिवंत उत्साहाचे प्रतिक होता. मी अर्जेंटीनातला एक साधासा माणूस आहे. माझ्याजवळ मोठमोठे शब्द नाहीत किंवा कविताही नाही. मॅराडोनाचे जाणे दु:खदायी आहे. 

(लेखक मानववंशशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

rahulbaba@gmail.com

Web Title: Argentina, Maradona and the zing of football...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.