खराट्याच्या काड्यांचा बाण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 06:11 PM2021-07-17T18:11:45+5:302021-07-17T19:21:05+5:30

आम्ही कसली प्रवीणला खेळाची गोडी लावतोय? तोच आपलं काड्याकुड्यांचा धनुष्यबाण घेऊन खेळत बसायचा. आम्ही ना शाळेत गेलेलो, ना आमच्याकडे स्वत:चं घर, ना शेती. दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करतो. आमचा प्रवीण जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकला. लै मेहनत केली त्यानं.

The arrow of broom stick ... | खराट्याच्या काड्यांचा बाण...

खराट्याच्या काड्यांचा बाण...

Next
ठळक मुद्देतो देशासाठी जिंकून आला ना, की त्याला खांद्यावर घेऊन गावातून मिरवणार बघा आम्ही. त्याला काही दिवस तरी आमच्याजवळ ठेवून घेणार. त्याला गोडधोड करून खाऊ घालणार, मगच त्याला नोकरीला पाठवणार..

संगीता व रमेश जाधव, सरडे (ता. फलटण, जिल्हा सातारा )

(प्रवीण जाधवचे पालक)

आम्ही कसली प्रवीणला खेळाची गोडी लावतोय? तोच आपलं काड्याकुड्यांचा धनुष्यबाण घेऊन खेळत बसायचा. आम्ही ना शाळेत गेलेलो, ना आमच्याकडे स्वत:चं घर, ना शेती. दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करतो. आमचा प्रवीण जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकला. लै मेहनत केली त्यानं. खराट्याच्या काड्यांनी (जनावरांचा गोठा स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारा झाडू) तो धनुष्यबाण खेळायचा. तो स्वत:च त्या काड्यांना दोऱ्या बांधून धनुष्य बनवायचा. शाळेतही तो हेच उद्योग करायचा. मास्तर विकास भुजबळ आणि मास्तरीण शुभांगी भुजबळ यांना कळलं, प्रवीण लै भारी खेळतो, मग त्यांनी त्याला नीट धनुष्यबाण शिकवला. स्पर्धेत भाग घ्यायला लावला. आमच्याकडे पैसे नाहीत आणि गावात सोयी नाहीत. मग भुजबळ मास्तर आणि मास्तरीणच त्याला फलटणला काही दिवस त्यांच्या घरी घेऊन गेले. त्याला चांगला धनुष्यबाण दिला, शिकवला. मग तो स्पर्धाही जिंकू लागला.

भुजबळ जोडप्यानं त्याच्यावर मुलासारखी माया केली. त्याला पुणे, अमरावती.. कुठे कुठे धनुष्यबाण शिकायला पाठवलं. दहा वरीस झालेत तो देशासाठी खेळतोय. नंतर त्याची ऑलिम्पिकसाठी निवड झाली. लै आनंद झाला बघा. आमचा उर भरून आला. तू काय कर आणि काय कर. नको, हे आम्ही प्रवीणला कधीच सांगितलं नाही. आम्हालाच काही कळत नव्हतं तर आम्ही त्याला काय सांगणार? भुजबळ मास्तरांनीच त्याचं सगळं पाहिलं. त्यामुळे आम्हाला काय काळजी नव्हती. तू आता शेती कर. असं काही आम्ही त्याला सांगितलं नाही. त्याला म्हणलं, जे करायचं ते कर. एक दिवस प्रवीण आम्हाला म्हणाला, मी चांगलं खेळतो, म्हणून माझा सैन्यात नंबर लागू शकतो. मी जाऊ का? आम्ही म्हणलं जा आणि तो सैनिक झाला!

प्रवीण दुसऱ्या देशातही जाऊन आला आहे. तिथेपण धनुष्यबाण शिकला. तो घरी नसतोच. धनुष्यबाण शिकायला नाहीतर स्पर्धेसाठी आणि नोकरीसाठी नेहमी बाहेरच असतो. ऑलिम्पिक काय असतं हे आम्हाला माहीत नव्हतं; पण प्रवीण, मास्तर आणि लोकांनी सांगितलं, ती लय मोठी स्पर्धा असते म्हणून. जगातून पोरं खेळायला येतात. तिथेपण तो जिंकून येईल असं वाटतंय.

तो देशासाठी जिंकून आला ना, की त्याला खांद्यावर घेऊन गावातून मिरवणार बघा आम्ही. त्याला काही दिवस तरी आमच्याजवळ ठेवून घेणार. त्याला गोडधोड करून खाऊ घालणार, मगच त्याला नोकरीला पाठवणार..

शब्दांकन - नसीर शिकलगार (फलटण, लोकमत)

फोटो कॅप्शन- प्रवीणचे आई-वडील

Web Title: The arrow of broom stick ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.