Ganesh Festival 2019 : माझ्या कलेचा अधिपती...!

By बाळकृष्ण परब | Published: September 1, 2019 10:44 AM2019-09-01T10:44:59+5:302019-09-01T10:45:28+5:30

मूर्तिकार म्हणजे केवळ व्यावसायिक, असा एक समज रूढ होऊन गेलेला आहे, पण सर्वच कलाकारांना हा नियम लागू पडत नाही. मूर्ती घडविता घडविता त्यांचे अद्वैत निर्माण होत जाते. हा भावबंध गहिरा असतो. हे गहिरेपण व्यक्त करणारा हा लेख...

Artical on Ganeshotav to create idol of Ganesh | Ganesh Festival 2019 : माझ्या कलेचा अधिपती...!

Ganesh Festival 2019 : माझ्या कलेचा अधिपती...!

Next

बाळकृष्ण परब 

गणपती बाप्पाचा सर्वाधिक सहवास लाभतो तो गणेशमूर्तीकारांना. अशाच भाग्यवानांपैकी मी एक. खरं तर गणपतीच्या मूर्ती बनवणं हा आमच्या कुटुंबाचा परंपरागत छंद! व्यावसायिकतेपेक्षा आवड म्हणून जपलेला. गावातील सर्वात जुन्या गणपतीच्या चित्रशाळेचा वारसा आणि मागच्या चार पिढ्या बाप्पांच्या सेवेत असल्याने माझ्यावरही मूर्तिकलेचे संस्कार नकळतपणे झाले. लहानपणी ओबडधोबड मूर्ती घडविणाऱ्या हातांना बाप्पांच्या सुबक मूर्ती बनविण्यापासून डोळ्यांची आखणी करण्यापर्यंतचे वळण कधी लागले ते समजलेही नाही. या कलेने मला प्रसिद्धीपासून ते गणपती बाप्पांच्या आशीर्वादापर्यंत बरेच काही दिले.

साधारणत: आषाढी एकादशीपासून गणपतीची लगबग सुरू होते. नागपंचमीपर्यंत गणपतीसाठी पाट येतात, तसेच आपल्या आवडीप्रमाणे मूर्तीची मागणी केली जाते. कुणाला सिंहासनावर बसलेला, कुणाला अष्टविनायक तर कुणाला बालगणेश, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. तळकोकणात चिकण मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची प्रथा असल्याने गणपतींसाठी माती आणण्यापासून सुरुवात होते. ही माती मळण्यापासून ते मूर्ती घडविण्यामधला आनंद काही औरच असतो. सुरुवातीला मूर्तीचा पाया घातला जातो. पुढे मूर्तीचा एक-एक भाग आकारास येतो. शेवटी बाप्पांचे मुखकमल घडवून झाल्यावर साजिरी सुंदर मूर्ती समोर उभी राहते. साध्या मातीच्या गोळ्यामधून निर्गुण निराकाराची सगुण साकार झालेली ती मूर्ती पाहिल्यावर भान हरपून जाते.

हळूहळू विविध रूपांतील गणेशमूर्ती शाळेत आकार घेतात आणि चित्रशाळा बाप्पांनी भरून जाते. कृष्ण जन्माष्टमीपर्यंत शाळेतले मातीकाम पूर्ण होते आणि बाप्पांना रंग देण्याची लगबग सुरू होते. बाप्पांच्या घडणीमध्ये रंगकाम हा महत्त्वाचा टप्पा असतो. पांढºया रंगापासून सुरु वात होते. मग बाप्पांच्या देहावर रंग चढवला जातो आणि ‘सिंदूर चर्चित ढवळे अंग चंदन उटी खुलवी रंग’ असे बाप्पांचे रूप दिसू लागते. हळूहळू बाप्पांचे सोवळे, शेला, सिंहासन, प्रभावळ यांचे रंगकाम पूर्ण होते. बाप्पांच्या डोळ्यांची रेखणी (आखणी) हे विशेष कौशल्याचे काम असते. रेखणीचे काम पूर्ण झाल्यावर मात्र, त्या मंगलमूर्तीकडे पाहण्याचा आनंद अवर्णनीय असाच असतो. ‘रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी’ अशी भावना तेव्हा मनात येते आणि मोठ्यातला मोठा मूर्तिकारही आपल्या मनातले सर्व भाव विसरून जातो. या विश्वाच्या निर्मात्याने आपल्या हातून आकार घेतलाय या भावनेने मन कृतकृत्य होते आणि दोन्ही हात त्या गणरायाच्या चरणी लीन होतात.

असा महिना - दीड महिना बाप्पाच्या सहवासात आनंदात गेल्यावर त्यांना शाळेतून निरोप देण्याची वेळ येते. चतुर्थीच्या आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे बाप्पांना आपल्या घरी न्यायला मंडळी हजर होते. खास मालवणी शैलीत गाऱ्हाणे घालून झाल्यावर गणपतीची पहिली मूर्ती शाळेतून रवाना होते. मग एकेक करून सारे बाप्पा जातात. अखेर चतुर्थीच्या दिवशी घरचा गणपतीही शाळेतून घरात आल्यावर शाळेत केवळ एखादा जादा गणपती उरतो. महिन्याभराची गजबज सरून शाळा सुनीसुनी होते, पण बाप्पा मात्र जाताना आपण पुढच्या वर्षी पहिल्यांदा येथेच येऊ असे वचन देऊन जातात आणि मनातून ‘गणपती बाप्पा मोरया’ असा उत्स्फूर्तपणे गणरायाच्या नामाचा गजर होतो.

Web Title: Artical on Ganeshotav to create idol of Ganesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.