...पुन्हा पुन्हा आठवतो ‘छावा’!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 05:52 AM2019-04-28T05:52:16+5:302019-04-28T05:52:56+5:30
प्रतिभावंत साहित्यिक ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या खास मावळी लेखणीतून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर साकारलेली महाकादंबरी म्हणजे ‘छावा.’ २८ एप्रिल १९७१ रोजी माजी उपपंतप्रधान आणि जाणते नेते यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते किल्ले प्रतापगडावर भवानी मंदिरात ‘छावा’चे अनौपचारिक प्रकाशन झाले. यंदा ‘छावा’ची चाळिशी पूर्ण होत आहे. त्यानिमित्त मराठीतल्या या उल्लेखनीय साहित्यकृतीविषयी...
- डॉ. सागर देशपांडे
‘छावा’ कादंबरीच्या मलपृष्ठावर या साहित्यकृतीची वैशिष्ट्ये सांगणारा मजकूर आहे. त्यात म्हटले आहे, ‘राजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे.’ ‘छावा’च्या जोरदार स्वागतानं तर ते सिद्ध झालं आहे.
एक-दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफोड करणारा हा सेना धुरंधर ! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे परिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची. अगदी घरचीच ! विखारी विश्वासघातक्यांची !
शंभूकथेशी संबंधित अशा सुमारे ४० गडकोटांची भ्रमंती, ग. दि. माडगुळकर, इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो.नी. दांडेकर, चित्तरंजन कोल्हटकर, कोल्हापूरचे प्रा. पां. ना. कुलकर्णी यांच्याशी वेळोवेळी केलेल्या चर्चा आणि यदुनाथ सरकार यांच्यापासून ते बेंद्रे, डॉ. कमल गोखले, बाबासाहेब पुरंदरे, राजवाडे, शेजवलकर, मु. गो. गुळवणी, प्रा. जयसिंगराव पवार आणि अगदी राम गणेश गडकरी यांचे ‘राजसंन्यास’ देखील... अशा सुमारे ९० ग्रंथांचा, तेही मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चार भाषांमधील; अभ्यास करून मग शिवाजीरावांच्या मावळी प्रतिभेतून ‘छावा’ साकारला. ८५६ पानांची ही कादंबरी वाचताना अक्षरश: अंगावर शहारे येतात.
‘राजा शिवाजीपासून संताजी-धनाजीपर्यंत महाराष्ट्राच्या लोकजीवनात येऊन गेलेल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा कालखंडाचा या कथेद्वारा वेध घेण्याचा एक प्रयत्न मी केलेला आहे,’ अशी ‘छावा’मागील आपली भूमिका सांगताना शिवाजीराव लिहितात, ‘गेली १० वर्षे विचारांच्या असंख्य झरोक्यांतून घेतलेलं शंभूदर्शन सर्व प्रकारच्या उलटसुलट विचारांची चाळण लावून नंतरच मराठी वाचकांसमोर मी ठेवत आहे. शंभूकथेचा हा गोंधळ - चौकस वाचकांंसमोर घालताना लेखक म्हणून मला जाणवलेल्या दोन-तीन मुद्द्यांचा प्रकर्षाने इथे उल्लेख केलाच पाहिजे. त्यातील पहिला म्हणजे संभाजी हा केवळ साधा राजा नाही. तो कविमनाचा, अनेक उलाघालीच्या प्रसंगांतून गेलेला, औरंगजेबाच्या रूपानं ज्याच्यासमोर विशालकाय संकट दत्त म्हणून पुढं उभं ठाकलं आहे असा चिवट जीवनवाद सांगणारा राजा.’
संभाजीराजांचं चरित्र एका महामानवाच्या वाचनात यायलाच हवं होतं. ते म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या, असं नमूद करून शिवाजीराव म्हणतात, ‘खरी ऐतिहासिक कथा ऐतिहासिक संदर्भांच्या पायथ्यावरच उभी करावी लागेल. ते संदर्भही निकोप, अलिप्त मनाने तपासलेले असावे लागतात. जिथं इतिहास मुका होतो तिथं तारतम्यानं त्याला सादवावं लागतं. त्या काळचे रिवाज, बोली भाषा, वस्त्र प्रावरणे, वातावरण या सर्वांना रसरशीत, बोलता जिवंतपणा द्यावा लागतो. सर्वांहून अवघड असतात ती ऐतिहासिक मने. ती फुलपाखरांच्या पंखांगत असतात. हळुवार सावधपणे ती उकलावी लागतात.’ ‘छावा’ वाचत असताना आपला इतिहासच जणू वर्तमानकाळात घडत असल्याचा भास होऊ लागतो. आमचे खरे शत्रू आज सीमेवर भारतीय जवानांचे आणि निष्पाप नागरिकांचे मुडदे पाडताहेत, मोर्चाच्या वेळी मुंबईतल्या आझाद मैदानावर आया-भगिनींचे, पोलीस अधिकारी महिलांचे विनयभंग होत आहेत. लाचखोरी, भ्रष्टाचार, बलात्कार करणारे, जाती-पाती धर्माच्या नावावर दहशत माजवणारे शिरजोर होत आहेत. खरं म्हणजे हे आपल्या सर्वांचे शत्रू आहेत.
मराठ्यांचा इतिहास अशा शत्रूंचा नि:पात करण्यासाठी उभ्या भारत देशाकरिता लढणं हाच आहे. तीच मराठ्यांची महाराष्ट्राची खरी ओळख आहे. दुर्दैवाने आज नेमकी हीच ओळख विसरून आपल्यातले अनेक जण आपापसात लढत बसले आहेत.
आता खरी गरज आहे या महाराष्ट्राने उभ्या भारताला जगात महासत्ता बनवण्यासाठी पेटून उठण्याची, तीच आपली खरी ओळख असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे पुण्यस्मरण करायचे ते यासाठी!