‘जिंदगी झंड बा, फिर भी घमंड बा’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 01:41 PM2022-02-13T13:41:23+5:302022-02-13T13:42:06+5:30
स्वत:च्या स्मार्टफोनने नेहा सिंग राठोडने ही गाणी शूट करून सोशल मीडियावर अपलोड केली आहेत. ही गाणी जेमतेम दीड ते पावणेदोन मिनिटांची आहेत.
गणेश देवकर, मुख्य उपसंपादक -
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचारात 'खेला होबे' या गाण्यानं वेगळा ठसा उमटविला. तृणमल काँग्रेसनं मिळविलेल्या ऐतिहासिक यशात या गाण्याचंही मोठं योगदान होतं. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतही सध्या 'यूपी में का बा...' या गाण्याचं गारुड दिसतं आहे. हे गाणं कोणत्याही पक्षाचं कॅम्पेन साँग नाही. प्रचारात खोटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्या नेत्यांना हे गाणं, ‘जिंदगी झंड बा, फिर भी घमंड बा’ अशा कठोर शब्दांत जागा दाखवून देतं. त्यामुळंच मतदारांनी हे गाणं उचलून धरलं आहे.
कोरोनाप्रसार रोखण्यासाठी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये निवडणूक आयोगानं मोठ्या सभा घेण्यास अटकाव केला आहे. काही अटींसह डोअर टू डोअर भेटीगाठी आणि व्हर्च्युअल प्रचाराला परवानगी आहे, त्यामुळं या प्रचारात सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना कमालीचं महत्त्व आलं आहे. यातील 'प्रेझेन्स' दिसावा यासाठी सर्वच पक्षांना खास यंत्रणा उभारावी लागली आहे. प्रचारातील आघाडी कायम राखण्यासाठी ना ना क्लृप्त्या लढवाव्या लागल्या आहेत.
पक्षांनी अधिकृत फेसबुक पेज, ट्वीटर हँडल, यू-ट्युब चॅनेल्स बनविली आहेत. राष्ट्रीय नेते, राज्यांतील नेते, मुख्यमंत्रिपदाचे दावेदार, विविध आघाड्यांचे प्रमुख आदींची पेजेस, ट्वीटर हँडल्स, चॅनेल्स सुरू केली आहेत. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समर्थकांचे व्हाटस्ॲप ग्रुप बनविले आहेत. तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांची मजबूत बांधणी असलेल्या पक्षांनी अगदी बूथ स्तरापर्यंत असे ग्रुप बनवले आहेत. या नेटवर्कच्या बळावर पक्षाच्या मीडिया सेंटरमधून पाठवलेला प्रत्येक मेसेज, व्हिडीओ, भाषण आदी शेअर-फाॅरवर्ड-रिट्वीट करताच अवघ्या काही मिनिटात राज्यभर व्हायरल केलं जात आहे. प्रत्येक अपडेट ग्रुप मेंबर्सच्या घराघरात-नातेवाईकांपर्यंत पोहचविली जात आहे.
सोशल मीडियातील प्रचाराचा प्रभावी वापर भाजपनं २०१४, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केला होता. आयटी सेलच्या माध्यमातून उभी केलेली यंत्रणा पक्षाकडे आधीपासून आहे. अशा प्रचाराचा अनुभव असलेला कार्यकर्त्यांचा मोठा संच भाजपकडे आहे. त्यामुळं पक्षानं पाचही राज्यांत व्हर्च्युअल प्रचाराचा बार उडवून दिला. याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी आणि अकाली दलासह इतर पक्षांची यंत्रणा उभारता उभारता मोठी दमछाक झाली.
पक्षाचा जाहीरनामा, आश्वासनं मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी ख्यातनाम संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री, गायकांकडून कँपेन साँग (प्रचार गीत) बनवून घेतली आहेत. या गाण्यांचा मतदारांवर अहोरात्र अक्षरश: मारा केला सुरु आहे. उत्तर प्रदेशात लोककलाकार नेहा सिंग राठोडचे 'यूपी में का बा...' हे गाणं कमालीचं गाजतं आहे. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाचं अधिकृत गाणं नसताना, कुणा बड्या नेत्याचं पाठबळ नसतानाही हे भोजपुरी गाणं प्रचंड व्हायरल होतं आहे. सामान्य मतदारांच्या भावना-अपेक्षा जणू या गाण्यातून प्रतिबिंबित झाल्या आहेत.
'सब बा' विरोधात 'का बा?'
उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टी आणि योगी आदित्यनाथ यांच्या निवडणूक प्रचाराचा भर समाजकटकांचा केलेला नि:पात, अपराध-हत्यांमध्ये झालेली घट हे सांगण्यावर आहे तर अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष वाढती बेरोजगारी व कोरोना महामारी हाताळणीत आलेल्या अपयशामुळं गंगेत तरंगत असलेले मृतदेह दाखवण्यावर असतो. ‘यूपी में सब बा’ म्हणजे उत्तर प्रदेश विकासाच्या दृष्टीकोनातून नंबर वन आहे, इथं सर्व काही आहे, अशा आशय असलेलं कॅम्पेन साँग भाजपने निवडणूक प्रचारासाठी लाँच केलं. हे पाच मिनिटांचं गाणं अभिनेते आणि भाजपचे गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी गायलं आहे. हे गाणं लाँच झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी लोककलाकार नेहा सिंग राठोडने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हत्याकांड, हाथरसमध्ये दलित मुलीचं हत्याकांड आदी ज्वलंत समस्या उपस्थित करीत ‘यूपी में का बा?’ असा सवाल उपस्थित केला. तिचं गाणं आतापर्यंत ६३ लाखांहून अधिक युजर्सनी पाहिलं आहे. अखलाख लिंचिंग, गायींची गंभीर स्थिती, वाढती महागाई आणि पेपरफुटीच्या समस्यांवर बोट ठेवणारा या गाण्याच्या तिसरा भाग तिनं पाचच दिवसांपूर्वी लाँच केला. हा भागही १० लाखाहून अधिक लोकांनी पाहिला. जनतेत सर्वाधिक चर्चा याच गाण्याची आहे.
मूळ बिहारची असलेली नेहा लोककलाकार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीवेळीही तिनं 'बिहारमे का बा' गाणं आणलं होतं. ते इतकं गाजलं की तिला उत्तर देण्यासाठी तत्कालीन नितीशकुमार सरकारला गाणं बनवावं लागलं. उत्तर प्रदेशात ‘का बा’ ची क्रेझ सुरु असतानाच तिनं 'चुनाव देख नेता जी प्यार लुटावेंली, भोली जनता के चूना लगावेलीं...' हे गाणं लाँच केलं. या गाण्यांसाठी तिला भाजप समर्थकांकडून प्रचंड ट्रोल केलं जात आहे, ‘सपा’ची एजंट म्हणून हिणवलं जात आहे. परंतु तिचं म्हणणं असतं की, हे गाणं कोणताही नेता किंवा पक्षाविरोधात नाही, निवडणूक काळात खोटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात आहे. हे अधोरेखित करण्यासाठीच ती गाण्याची अखेर ‘जिंदगी झंड बा, फिर भी घमंड बा!’ या ओळीनं करते. सामान्यांना कदाचित हेच जास्त भावलं असावं.
तेरे यार नूं दबन नूं फिरदे सी...
भाजपनं पंजाबमध्ये प्रचारासाठी धार्मिक गाणी निवडली आहेत तर अकाली दलानं नेते सुखबीर सिंग बादल यांची गाणी व्हायरल केली आहेत. आम आदमी पक्षानं मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान यांची गाणी व्हायरल केली आहेत. यासाठी ‘तेरे यार नूं दबन नूं फिरदे सी, पर दबदा किथे ए...’ या लोकप्रिय गीताच्या थीमचा वापर केला आहे. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाइतका प्रभावी प्रचार पक्ष स्थापन करून निवडणुकीत उतरलेल्या शेतकरी नेत्यांना करता आलेला दिसत नाही, असे निरीक्षण चंदिगडमधून निघणाऱ्या 'युगमार्ग' या वर्तमानपत्राचे पत्रकार विकास वर्मा यांनी नोंदविले आहे.